संशोधन अपडेट: १० जानेवारी २०२०
पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या गुजरातमधील काक्रापार ॲटोमिक पॉवर प्रोजेक्ट ३ (कॅप ३) या अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला रविवारी यशस्वीपणे ग्रीडशी जोडण्यात आले. ७०० मेगावॉट क्षमतेचा हा अणुऊर्जा प्रकल्प ‘प्रेशराइज्ड हेव्ही वॉटर रिॲक्टर’वर (पीएचडब्ल्यूआर) आधारलेला आहे. गेल्या वर्षी २२ जुलैला कॅप ३ ने क्रिटिकॅलीटी (नियंत्रित अणु विखंडन प्रक्रिया) गाठली होती.
‘पीएचडब्ल्यूआर’मध्ये नैसर्गिक युरेनियम हे इंधन म्हणून तर, हेव्ही वॉटर (ड्युटेरियम ऑक्साइड) हे नियंत्रक म्हणून वापरण्यात येते. अणु विखंडनातून निर्माण होणारी उष्णता मोठ्या प्रमाणात वाफेच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या वाफेच्या साह्याने जनित्रे फिरवून त्यांपासून वीजनिर्मिती केली जाते. याआधी भारताने बनवलेले ५४० मेगावॉट इतक्या सर्वाधिक क्षमतेचे दोन पीएचडब्ल्यूआर महाराष्ट्रातील तारापूर येथे कार्यरत आहेत. कॅप ३ च्या यशामुळे आता स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साह्याने अणुऊर्जेची निर्मिती करण्याची भारताची क्षमता आणखी वाढली आहे.
येत्या वर्षभरात काक्रापार येथील कॅप ४ हा प्रकल्पही कार्यरत होण्याची अपेक्षा असून, राजस्थानमधील रावतभाता येथे उभारण्यात येणारे रॅप ७ आणि रॅप ८ हे प्रकल्पही पुढील दोन वर्षांत प्रत्येकी ७०० मेगावॉट क्षमतेने वीजनिर्मिती सुरु करण्याची अपेक्षा आहे. पुढील दहा वर्षांत, म्हणजे २०३१ पर्यंत २१ पीएचडब्ल्यूआरच्या साह्याने (त्यांपैकी दहा स्वदेशी) १५७०० मेगावॉट वीजनिर्मिती करण्याचे भारताचे उद्दिष्ट्य आहे.
——