– मयुरेश प्रभुणे
आजच्या युगाला इलेक्ट्रॉनिक युग म्हटले जात असले, तरी माहितीच्या आदान प्रदानासाठी आजही मोठ्या प्रमाणात कागदाचा वापर करण्यात येतो. ज्ञानाचे जतन करणे आणि हस्तांतरण करणे यासाठी कागदाचे महत्व मानवी इतिहासात अग्रस्थानी राहिले आहे. लिखाणाची कला माणसाला ज्ञात झाली तरी, कागदाचा शोध लागेपर्यंत माणसाकडे असणारे ज्ञान सर्वदूर पोहचू शकले नाही. इलेक्ट्रॉनिक युगातही लिखाणासाठी, चित्रांसाठी, छपाईसाठी, वेष्टनासाठी सगळीकडेच कागद अत्यावश्यक असतो. पुस्तके, वह्या अगदी हा लेख आपण वाचत आहात ते वर्तमानपत्र कागदाशिवाय निर्माण होणे शक्य नव्हते. ज्ञानाच्या आणि माहितीच्या देवाणघेवाणीसाठी गेली सुमारे दोन हजार वर्षे कागद हे मुख्य साधन राहिले आहे.
लिखाणाची सुरुवात झाली तिथून मानवी इतिहास सुरु झाला असे मानले जाते. कारण तिथून आपल्याला नेमक्या नोंदींच्या आधारे त्या त्या काळातील घटनांचा मागोवा घेता येतो. कागदाचा शोध लागण्याआधी भारतात कापडावर किंवा हिमालयात उंचावर उगवणाऱ्या भूर्ज किंवा भोज नावाच्या वृक्षाच्या सालींवर लिखाण केले जात असे. भोज वृक्षाचे साल शुभ्र आणि पातळ थरांनी बनले असल्यामुळे तसेच त्यामध्ये तेलाचा अंश असल्यामुळे त्यावर लिखाण करणे सोपे होते. तसेच वर्षानुवर्षे टिकणारे हे साल कागदाप्रमाणे हव्या त्या आकारात कापणे सोपे होते. भारतातील प्राचीन ग्रंथ या भोजपत्रांवरच लिहिले गेले आहेत. कापडावर शाईने लिखाण करून संदेश पाठवण्याची पद्धत अगदी दोनशे वर्षांपूर्वीपर्यंत भारतात अस्तित्वात होती.
पेपर हा इंग्रजी शब्द सायपेरस पेपिरस या गवताच्या प्रकारापासून निर्माण झाला आहे. प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये सायपेरस पेपिरस या गवताच्या धाग्यांचा उपयोग करून कागद बनवला जात असे. तोच शब्द पाश्चिमात्य जगात रूढ झाला आणि आज जगभर वापरला जातो. कागद बनवण्याचे तंत्रज्ञान चीनमध्ये सुरु झाले असे मानले जाते. इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात काई लुन याने कागद बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याचा उल्लेख आढळतो. रेशीमाला स्वस्त पर्याय म्हणून आणि बांबूपेक्षा खूप हलका म्हणून लिखाणासाठी कागद वापरण्याची प्रथा कमी कालावधीत रूढ झाली. चिनी कागदामध्ये तुती, अंबाडी आदी वनस्पतींच्या धाग्यांचा वापर केलेला असे. कागदाचे हे चिनी तंत्र पुढे अरबस्तानमार्गे युरोपपर्यंत पसरले. मध्य युगात पर्शियामध्ये कागद तयार करण्याचे तंत्र मोठ्या प्रमाणात विकसित झाले. कागदासाठी पर्शियन शब्द कागजी असा आहे तेथूनच तो हिंदीत कागज आणि मराठीमध्ये कागद या नावाने रूढ झाला. भारतात सहाव्या शतकाच्या आधी कागद वापरण्यास सुरुवात झाली होती. मात्र, मोगलांच्या आक्रमणानंतर कागदाचे नवे तंत्र भारतभर पसरले आणि कागजी म्हणजे कागद तयार करणाऱ्या कामगारांचे लहान मोठे कारखाने देशभर उभारले गेले.
पारंपरिक कागदामध्ये ज्या वनस्पतींपासून अधिकाधिक धागे मिळू शकतात (तुती, अंबाडी, कापूस आदी) अशा वनस्पतींचा प्रामुख्याने वापर केला जात असे. मात्र पुढे औद्योगिक क्रांतीच्या दरम्यान लाकडाच्या ओंडक्यांचे बारीक तुकडे करून त्यांना उकळवून त्यांचा लगदा धागे काढण्यासाठी केला जाऊ लागला. १८४४ मध्ये फ्रेड्रिक केलर आणि चार्ल्स फेनर्टी यांनी स्वतंत्रपणे कागद तयार करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले. वाफेच्या इंजिनावर चालणाऱ्या गिरणीच्या साह्याने लाकडाच्या ओंडक्यांपासून कागदासाठी लागणारे धागे मोठ्या प्रमाणात आणि कमी कालावधीत काढणे यामुळे शक्य झाले. लाकडाच्या लगद्याला ब्लिचिंग करून पांढरा शुभ्र कागद तयार करण्यात त्यांना यश आले. लाकूड मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे कागद स्वस्त आणि सहजपणे जगभर उपलब्ध झाला.
इंग्रजांचे जगभर राज्य असल्यामुळे हा कागद सर्वत्र सरकारी कामांसाठी, पुस्तकांसाठी वापरला जाऊ लागला. विसाव्या शतकात कागद तयार करण्याची प्रक्रिया आणखी आधुनिक झाली. झाडांची कत्तल कमी व्हावी यासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर आणि तयार कागदाचा पुनर्वापर केला जाऊ लागला त्यामुळे लाकडाचा लगदा पूर्वीपेक्षा फक्त तीस ते चाळीस टक्के वापरणे शक्य होऊ लागले. आजही जगभर ज्ञानाचे आणि माहितीचे मुख्य साधन पुस्तक आणि छपाईची माध्यमे असल्यामुळे कागदाचे महत्व कायम आहे. मात्र, इलेक्ट्रॉनिक युगाची सुरुवात झाल्यापासून कागदाचा अनावश्यक वापर कमी होत आहे. इंटरनेट, ईमेल, एसएमएस, व्हॉट्सअॅप यांमुळे पत्रव्यवहार कागदाचा वापर टाळून सहज शक्य होत आहे. कागदाच्या फाईल्ससाठी लागणारी जागा वाचून सर्व माहिती एका हार्डडिस्कवर साठवणे शक्य झाले आहे. पुस्तकेही पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होऊ लागली असून, किंडलसारख्या नव्या साधनांमुळे मोठे ग्रंथालय अगदी आपल्या खिशात बसेल इतके लहान झाले आहे. भविष्यात कागदाचा वापर आणखी कमी होत जाईल आणि त्यासाठी होणारी वृक्षतोडही कमी होईल. पण जगभर घराघरांत ई साधनांचा प्रसार होईपर्यंत कागदाला पर्याय नाही.
————-