१० मे पासून कोथरूडमध्ये विद्यार्थी, पालकांसाठी विशेष शो
७ मे २०२६
आकाशाची अद्भुत सफर घडवणारे पुण्यातील पहिले डिजिटल तारांगण येत्या रविवारपासून (१० मे) सर्वांसाठी खुले होणार आहे. कोथरूडमधील अभिनव इंग्लिश मिडीयम स्कुलमधील तारांगणाचा लाभ आता सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच शाळा, महाविद्यालयांनाही घेता येईल.
आदर्श शिक्षण मंडळी (एएसएम) संस्थेच्या एरंडवणे येथील अभिनव विद्यालय इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कुल येथे डिजिटल तारांगण जून २०२५ मध्ये सुरू झाले. पहिले वर्ष एएसएमच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी तारांगणाचे उपक्रम राबवण्यात आले. आता उन्हाळी सुट्ट्यांचे निमित्त साधून तारांगणाचे शो सर्वांसाठी खुले करण्यात येत आहेत.
डिजिटल तारांगणाच्या सुमारे ५० मिनिटांच्या शोमध्ये रात्रीच्या आकाशातील तारकासमूह, तारे, ग्रह यांची ओळख आणि खगोलशास्त्रीय फिल्मचा समावेश असेल. १५ जूनपर्यंत मंगळवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी १० ते १ या वेळेत विविध संस्था आणि गटांसाठी शोचे आयोजन करण्यात येईल. संस्थांना किंवा गटांना संपूर्ण शोसाठीची एकत्रित नोंदणी आगाऊ करावी लागेल.
डिजिटल तारांगणाचे सर्वसामान्य नागरिकांसाठीचे शो दर शनिवारी आणि रविवारी सकाळी १० ते १ आणि दुपारी ४ ते ६ या वेळेत आयोजित करण्यात येतील. तारांगणाचे दररोज तीन इंग्रजी आणि दोन मराठी शो आयोजित करण्यात येतील.
अभिनव तारांगणाच्या शोविषयी अधिक माहितीसाठी आणि आगाऊ नोंदणी करण्यासाठी –https://sanshodhan.in/events/
