रेनर वाईस, बॅरी सी. बॅरीश आणि किप एस. थॉर्न या तिघा शास्त्रज्ञांना लेझर इंटरफेरॉमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरीच्या (लायगो) निर्मितीसाठी आणि गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध केल्याबद्दल रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसतर्फे मंगळवारी नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. शतकातील सर्वात मोठा शोध मानल्या गेलेल्या गुरुत्वीय लहरींच्या निरीक्षणाला भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळणार याबाबत सर्वांनाच खात्री होती. गुरुत्वीय लहरींच्या शोधामध्ये भारतीय शास्त्रज्ञांचे थेट आणि महत्वाचे योगदान असल्यामुळे यंदाच्या नोबेल पारितोषिकातून भारतीय शास्त्रज्ञांचाही सन्मान झाला आहे.
आईन्स्टाईनने शंभर वर्षांपूर्वी ज्या गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व वर्तवले होते, त्यांचा प्रत्यक्ष शोध घेणे ही अशक्यप्राय गोष्ट मानली जात होती. स्वतः आईन्स्टाईनलाही या लहरींचे अस्तित्व सिद्ध करण्याविषयी शंका होती. मात्र, रेनर वाईस आणि किप थॉर्न यांनी बॅरी सी. बॅरीश या तिघा शास्त्रज्ञांना या लहरी लेझर इंटरफेरॉमीटरच्या माध्यमातून पकडल्या जाऊ शकतात या बाबत विश्वास होता. अवकाशातून येणाऱ्या कोणत्या प्रकारच्या गोंगाटामुळे (नॉइज) आपल्याला या लहरी ओळखता येणार नाहीत याची आकडेमोड रेनर वाईस यांनी १९७४ मध्येच करून ठेवली होती. निरीक्षणांमध्ये हा गोंगाट वगळता आला तर गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध करणे शक्य होऊ शकेल याची त्यांना खात्री पटली. लायगोसारखी यंत्रणा उभारण्यासाठी त्यांनी तब्बल चाळीस वर्षे प्रयत्न केले. अमेरिकेत त्यांच्या प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या लायगोच्या दोन जुळ्या वेधशाळांनी १४ सप्टेंबर २०१५ रोजी प्रथमच गुरुत्वीय लहरींचे निरीक्षण नोंदवून शतकातील सर्वात मोठा शोध लावला. विद्युतचुंबकीय लहरी, न्यूट्रिनो आणि वैश्विक किरणांप्रमाणेच खगोलशास्त्रज्ञांना विश्वाचे नेमके स्वरूप अभ्यासण्यासाठी गुरुत्वीय लहरी हे नवे साधन या शोधामुळे उपलब्ध झाले. विज्ञानाला नवी दिशा देणाऱ्या या शोधासाठी तिघा अमेरिकी शास्त्रज्ञांची नोबेल पारितोषिकासाठी निवड करण्यात आल्याचे निवड समितीने म्हटले आहे.
मात्र, भारतासह जगभरातील वीसपेक्षा अधिक देशांतील एक हजार शास्त्रज्ञांचा या शोधामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे यंदाच्या नोबेल पारितोषिकातून त्यांचाही सन्मान झाला आहे. १९८० च्या दशकापासून आयुकातील प्रा. संजीव धुरंधर यांच्या गटाने समांतरपणे गुरुत्वीय लहरींच्या विश्लेषणाचे तंत्र विकसित केले. वाळवंटातून सुई शोधावी इतकी किचकट प्रक्रिया असणाऱ्या गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व भारतीय शास्त्रज्ञांच्या या तंत्रामुळेच सिद्ध होऊ शकले. यंदाच्या नोबेल पारितोषिकामध्ये भारतीय शास्त्रज्ञाचा समावेश नसला, तरी गुरुत्वीय लहरींच्या शोधामधले भारतीय शास्त्रज्ञांचे महत्वाचे योगदान या पारितोषिकामुळे अधोरेखित झाले आहे.
गुरुत्वीय लहरींच्या शोधामध्ये भारतीयांची छाप
गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या ऐतिहासिक संशोधनामध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये महत्वाची कामगिरी बजावली. या संशोधनात भारतातील ६१ शास्त्रज्ञांचा सहभाग होता. त्यांपैकी ३५ भारतीय शास्त्रज्ञांचा गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या शोधनिबंधात को-ऑथर म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त भारतीय वंशाच्या मात्र परदेशात स्थायिक झालेल्या शास्त्रज्ञांचाही या संशोधनात सहभाग आहे. हे संशोधन फिजिकल रीव्ह्यू लेटर्स या प्रख्यात नियतकालिकत प्रसिद्ध झाले आहे.
संशोधनात सहभागी भारतीय संस्था
गुरुत्वीय लहरींच्या संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘लायगो साईंटिफिक कोलॅबोरेशन’ स्थापन करण्यात आले असून, त्यामध्ये भारतातील नऊ संशोधन संस्थांचा सहभाग आहे. त्यांमध्ये चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टीट्यूट (चेन्नई), इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल सायन्सेस (बेंगळूरू), इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅंड रिसर्च- आयसर (कोलकाता), आयसर (तिरुवनंतपुरम), इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – आयआयटी (गांधीनगर), आयुका (पुणे), रामन रिसर्च इन्स्टीट्यूट (बेंगळूरू), टाटा इन्स्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई), इन्स्टीट्यूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च (गांधीनगर) आणि राजा रामण्णा सेंटर फॉर अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी (इंदौर) या संस्थांचा समावेश आहे.
संशोधन, ३ ऑक्टोबर
नोंद: यंदाच्या नोबेल पारितोषिकांवर विशेष कव्हरेज ‘संशोधन’च्या आगामी अंकात.