संशोधन, २२ नोव्हेंबर २०१७
आपल्या सूर्यमालेबाहेरून आलेला पाहुणा सध्या जगभरातील खगोलशास्त्रज्ञांच्या कुतूहलाचा विषय बनला आहे. खगोलशास्त्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्या सूर्यमालेचा भाग नसणारा लघुग्रह शास्त्रज्ञांना सापडला आहे. अभिजीत ताऱ्याच्या दिशेकडून लाखो वर्षे आणि अब्जावधी किलोमीटरचा प्रवास करीत आलेला हा लघुग्रह पुढील वर्षभर आपल्या सूर्यमालेतून प्रवास करत महाश्व (पेगॅसस) तारकासमूहाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
गेल्या महिन्यात (१९ ऑक्टोबर) हवाई विद्यापीठाच्या पॅन्स्टार्स वेधशाळेमधून अतिदीर्घ कक्षा असणाऱ्या घटकाचा शोध लागला. हा धूमकेतू असावा असा सुरुवातीला अंदाज बांधण्यात आला. मात्र, जगभरातील मोठमोठाल्या टेलिस्कोपच्या साह्याने निरीक्षणे नोंदवल्यानंतर त्याच्याभोवती कोणतेही वायूचे आवरण आढळले नाही. त्यातून हा ४०० मीटर लांबीचा लघुग्रह असल्याचे स्पष्ट झाले. या लघुग्रहाचे निरीक्षण केल्यावर त्याची तेजस्विता (मॅग्निट्युड) त्याच्या परिवलनाच्या कालावधीनुसार दर ७.३ तासांनी तब्बल दहा पटींनी कमी होत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळले. या निरीक्षणावरून लघुग्रहाचा आकार लांबट दंडगोलासारखा असल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. या लघुग्रहाची जितकी रुंदी आहे, तिच्यापेक्षा त्याची लांबी दहापट आहे. लघुग्रहाच्या लांबी- रुंदीचे हे गुणोत्तर आपल्या सूर्यमालेत आढळणाऱ्या कोणत्याही घटकाच्या लांबी- रुंदीच्या गुणोत्तरापेक्षा जास्त आहे. याविषयीच्या नोंदी नुकत्याच नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध झाल्या आहेत.
या लघुग्रहाचे नाव ‘औमुआमुआ’ असे ठेवण्यात आले असून, दूर अंतरावरून आलेला पहिला दूत असा त्याचा अर्थ होतो. लाखो वर्षे आपल्या आकाशगंगेत भटकताना त्याच्यावर प्रारणांचा मारा होऊन हा लघुग्रह लालसर बनला आहे. त्याच्यामध्ये धातूंचे प्रमाण अधिक असावे असा अंदाज आहे. आकाशातील अभिजीत या ताऱ्याच्या दिशेकडून तो आला असून, सध्या त्याचा प्रवास आपल्या सूर्यमालेतून होत आहे. सेकंदाला ३८.३ किलोमीटर या वेगाने सध्या तो पृथ्वीपासून २० कोटी किलोमीटर अंतरावरून (मंगळ आणि गुरूच्या दरम्यानच्या भागातून) दूर जात आहे. पुढील वर्षी मे महिन्यामध्ये गुरु ग्रहाची आणि त्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये शनीची कक्षा ओलांडून हा लघुग्रह महाश्व तारकासमूहाच्या दिशेने मार्गस्थ होईल. आपल्या सूर्यमालेतील ग्रहांच्या कक्षांचे जे सर्वसाधारण प्रतल आहे, त्या प्रतलाशी या लघुग्रहाच्या कक्षेने २० अंशांचा कोन केला आहे. त्यावरूनच हा लघुग्रह आपल्या सूर्यमालेचा भाग नसून, तो दुसऱ्या ताऱ्यावरून आला असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे.
आपली सूर्यमाला सोडून इतर ताऱ्यांभोवतीही घन स्वरूपाचे ग्रह तयार झाले असल्याचा हा पहिला थेट पुरावा शास्त्रज्ञांना मिळाला आहे. त्याच्या रचनेचा अभ्यास करून इतर ताऱ्यांभोवती कशाप्रकारे ग्रह किंवा लघुग्रह तयार होतात याबद्दल शास्त्रज्ञांना माहिती मिळू शकणार आहे. दूर ताऱ्याभोवतीचा लघुग्रह आपल्या सूर्यमालेत स्वतःहून आल्यामुळे बाह्य ग्रहमालांचा अभ्यास करण्याची आयती संधी शास्त्रज्ञांसमोर चालून आली आहे.
—–
Please follow and like us: