संशोधन रिपोर्ट, ७ ऑक्टोबर २०१८
भारतीय अवकाश संशोधन संस्थेद्वारे (इस्त्रो) अवकाशात पाठवण्यात आलेल्या अॅस्ट्रोसॅटने अवकाशात नुकतीच तीन वर्षे पूर्ण केली. २८ सप्टेंबर २०१५ रोजी अॅस्ट्रोसॅटचे प्रक्षेपण करण्यात आले होते. अवकाशातील एकाच घटकाचे अनेक तरंगलहरींच्या साह्याने निरीक्षण करू शकणारा अॅस्ट्रोसॅट हा इस्रोचा पहिला उपग्रह आहे.
या उपग्रहावर पाच वैज्ञानिक उपकरणे बसवण्यात आली असून, त्यांची निर्मिती देशातील विविध संशोधन संस्था आणि विद्यापीठांच्या पुढाकाराने करण्यात आली आहे. अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (यूव्हीआयटी), सॉफ्ट एक्स-रे टेलिस्कोप (एसएक्सटी), लार्ज एरिया एक्स-रे प्रोपोरशनल काउंटर (लॅक्सपीसी), कॅडमियम-झिंक-टेल्युराईड इमेजर (सीझेडटीआय) आणि स्कॅनिंग स्काय मॉनिटर (एसएसएम) या उपकरणांच्या साह्याने विश्वातील विविध घटकांचे विविध तरंगलहरींवर निरीक्षण करून गुणधर्म अभ्यासण्यात येतात. अॅस्ट्रोसॅटद्वारे काढण्यात आलेल्या काही निवडक छायाचित्रांना इस्रो आणि अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने ‘फोटो ऑफ द मंथ’च्या स्वरूपात प्रसिद्धी देण्यात आली आहे.
Please follow and like us: