गौंधार – मध्यमाहेश्वरजवळ जमिनीखाली १४.२ किलोमीटरवर भूकंपाचे केंद्र
संशोधन प्रतिनिधी: ७ फेब्रुवारी २०१७
—-
सलग ३० सेकंद बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी राजधानी दिल्लीसह उत्तर भारत सोमवारी रात्री (६ फेब्रुवारी) हादरला. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौंधार – मध्यमाहेश्वर जवळ जमिनीखाली १४.२ किलोमीटरवर भूकंपाचे केंद्र असल्याचे युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेने (यूएसजीएस) म्हटले आहे. यूएसजीएसच्या नोंदींनुसार भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल वर ५.६ असून, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदींनुसार भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल वर ५.८ इतकी होती.
सोमवारी रात्री १०:३५ च्या सुमारास दिल्लीसह पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेशच्या भागांमध्ये सलग सुमारे ३० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तराखंडमध्ये धक्क्यांची तीव्रता अधिक होती. भूकंप जाणवल्यानंतर राजधानी दिल्लीमधील अनेक भागांमध्ये नागरीक घराबाहेर आल्याचे दृश्य होते. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत भूकंपामुळे कोणतीही जीवित हानी झाल्याची नोंद झालेली नव्हती. भूकंपाची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन तुकडीने (एनडीआरएफ) तातडीने उत्तराखंडकडे प्रयाण केले.
सेंटर फॉर सिटीझन सायन्सच्या (सीसीएस) ‘सतर्क’तर्फे जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार भूकंप केंद्राजवळील भाग हा आधीपासूनच दरडप्रवण क्षेत्र असल्यामुळे भूकंपामुळे त्या भागांत दरडी कोसळून रस्ते बंद होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दरड कोसळून नदीपात्रात जमा झालेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे येत्या काळात पूरस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने उत्तराखंड सरकारकडे भूकंपाविषयीचा अहवाल त्वरीत मागवला असून, केंद्राकडून आवश्यक ती मदत पुरवली जाईल, असे कळवण्यात आले आहे.
—-
Please follow and like us: