संशोधन, ११ एप्रिल २०२४
‘देव कण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘हिग्स बोसॉन’चे अस्तित्व वर्तवणारे ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ प्रा. पीटर हिग्स (वय ९४) यांचे बुधवारी (१० एप्रिल) एडिनबरा येथे निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. विसाव्या शतकातील सर्वात प्रभावशाली भौतिक शास्त्रज्ञांमध्ये त्यांची गणना होते.
मूलकणांना वस्तुमान मिळण्यासाठी मदत करणाऱ्या विशिष्ट मूलकणांचे अस्तित्व त्यांनी १९६४ मध्ये वर्तवले होते. त्यांच्या भाकितानंतर ४८ वर्षांनी म्हणजे २०१२ मध्ये ते कण लार्ज हॅड्रॉन कोलायडरमधील (एलएचसी) प्रयोगांत शास्त्रज्ञांना प्रत्यक्ष आढळून आले. या कणांना हिग्स बोसॉन म्हटले जाते. हिग्स बोसॉनचे अस्तित्व सिद्ध झाल्यामुळे प्रा. हिग्स यांना बेल्जीयमच्या फ्रँकॉईस एंग्लर्ट यांच्यासोबत २०१३ मध्ये भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. पदार्थाला वस्तुमान प्राप्त करून देणारे कण म्हणून माध्यमांमध्ये या कणांना देव कण म्हणून संबोधले जाते. मात्र, नास्तिक असणाऱ्या हिग्स यांना देव कण हे संबोधन कधीही पटले नाही.
इंग्लंडमधील न्यूकॅस्टल येथे २९ मे १९२९ ला हिग्स यांचा जन्म झाला. १९५४ मध्ये त्यांनी लंडनमधील किंग्स कॉलेज येथून भौतिकशास्त्रात पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले. १९६० मध्ये ते एडिनबरा विद्यापीठात व्याख्याते म्हणून रुजू झाले. त्या काळात जगभरातील भौतिक शास्त्रज्ञांना मूलभूत प्रश्न भेडसावत होता, विश्वातील सर्व कण मूलतः वस्तुमानरहित असतात, तर त्यांना वस्तुमान कसे प्राप्त होते?
या प्रश्नावर प्रा. हिग्स यांनी एका क्षेत्राची (हिग्स फिल्ड) आणि त्यात तयार होणाऱ्या कणाची (हिग्स बोसॉन) कल्पना मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, वस्तुमानरहित मूलकण (प्रोटॉन, इलेक्ट्रॉन) हिग्स फिल्डच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची त्या फिल्डशी कशी प्रक्रिया होते, त्यानुसार त्या कणांना वस्तुमान प्राप्त होते. फिल्डचा कणांवर जितका प्रभाव अधिक, तितके कणांचे वस्तुमान अधिक. फोटॉन (प्रकाशचे कण) या कणांची हिग्स फिल्डसोबत प्रक्रिया घडत नाही म्हणून ते वस्तुमानरहित असतात. हिग्स बोसॉन कणांनादेखील याच क्षेत्रातून वस्तुमान मिळते. त्याचसोबत हे कण इतर मूलकणांना वस्तुमान मिळण्यासाठी मदत करतात. हिग्स बोसॉन कण किंवा हिग्स फिल्ड नसते, तर आज विश्व जसे आहे, तसे अस्तित्वातच नसते.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रा. हिग्स यांनी वर्तवलेल्या हिग्स बोसॉन कणांना शोधण्याची मोहीम जगभरातील कण भौतिकशास्त्रज्ञांनी हाती घेतली त्यातूनच अब्जावधी डॉलर खर्चून जगातील सर्वात मोठा पार्टीकल ऍक्सिलरेटर असलेल्या लार्ज हॅड्रॉन कोलायडरची (एलएचसी) निर्मिती करण्यात आली. एलएचसीमध्ये विश्वाच्या सुरुवातीच्या काळात अस्तित्वात असलेली प्रचंड ऊर्जेच्या स्थितीची लहान स्तरावरील नक्कल करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ज्यामध्ये दोन विरुद्ध दिशांनी प्रोटॉन सोडून त्यांचा वेग प्रकाशाच्या वेगाच्या जवळपास नेण्याचा प्रयत्न केला जातो. प्रचंड वेगाचे हे प्रोटॉन एकमेकांवर आदळून त्यांची शकले उडतात. त्यातून अतिसूक्ष्म काळासाठी काही कण अस्तित्वात येतात, ज्यामध्ये विश्वाच्या सुरुवातीच्या काळात घडलेल्या घटनांची रहस्ये दडलेली असतात.
याच यंत्रणेमध्ये जुलै २०१२ मध्ये पदार्थाला वस्तुमान प्राप्त करून देणाऱ्या ‘हिग्स बोसॉन’ कणांचे अस्तित्व शात्रज्ञांना दिसून आले. निसर्गातील एक महत्वाचे रहस्य प्रा. हिग्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे उलगडले. भौतिकशास्त्रातील त्यांच्या अजोड योगदानाबद्दल त्यांना नोबेल या सर्वोच्च्च पारितोषिकासह रॉयल सोसायटीचे ह्यूज मेडल, रुदरफोर्ड मेडल, डिरॅक मेडल, वूल्फ प्राईझ आदी प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
—