मधुमेहींच्या पोटातील सूक्ष्मजीवांमध्ये झालेले बदल अभ्यासण्यात यश
‘संशोधन’ प्रतिनिधी: ५ फेब्रुवारी २०१७
———-
देशाच्या आरोग्यासमोरील मोठे आव्हान असणाऱ्या मधुमेहाचे नेमके कारण शोधून त्यावर परिणामकारक उपचार शोधण्याच्या दिशेने पुण्यातील शास्त्रज्ञांनी महत्वाचा टप्पा गाठला आहे. या संशोधनातून मधुमेह झालेल्या रुग्णांच्या पोटातील सूक्ष्मजीवांमध्ये होणारे बदल अभ्यासण्यात आले आहेत. मधुमेह झाल्यावर निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर नेमके उपचार यामुळे शक्य होणार असून, भारतीयांना होणाऱ्या मधुमेहाच्या कारणांचाही मागोवा घेता येणार आहे.
मायक्रोबियल कल्चर कलेक्शन (एमसीसी), केईएम हॉस्पिटल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाने संयुक्तरित्या हे संशोधन केले असून, त्यामध्ये प्राणिशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ. श्रीकांत भुते आणि प्रा. सरोज घासकडबी, एमसीसीचे संचालक डॉ. योगेश शौचे, केईएमच्या मधुमेह विभागाचे डॉ. चित्तरंजन याज्ञीक यांचा प्रमुख सहभाग आहे. या संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष नुकतेच फ्रंटायर्स इन मायक्रोबायोलॉजीमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. मधुमेह झाल्यावर रक्तातील साखरेच्या प्रमाणात होणाऱ्या बदलासोबत माणसाच्या पोटात अधिवास असणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या संख्येतही बदल घडू लागतो. शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या या सूक्ष्मजीवांमधील बदलामुळे रुग्णाला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
या संशोधनाबाबत डॉ. भुते यांनी महाराष्ट्र टाइम्सला माहिती दिली. ते म्हणाले, ‘केईएम रुग्णालयाच्या मदतीने आम्ही १४ निरोगी, १४ मधुमेहाचे निदान झालेले मात्र उपचार सुरु नसणारे आणि १६ मधुमेहावर उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांच्या विष्ठेचे नमुने तपासले. या अभ्यासातून मधुमेह झालेल्या ज्या रुग्णांवर उपचार सुरु झाले नाहीत, अशांच्या पोटातील सूक्ष्मजीवांमध्ये मोठा बदल झाल्याचे आम्हाला आढळून आले. पोटामधील अन्नातून साखर मुक्त करणाऱ्या फर्मीक्यूट प्रकारातील जिवाणूंचे प्रमाण वाढले असतानाच अन्नपचनासाठी मदत करणाऱ्या बॅक्टेरॉईडिट्स प्रकारच्या जिवाणूंचे प्रमाण मात्र कमी झाल्याचे या अभ्यासात दिसून आले.’
‘फर्मीक्यूटच्या वाढलेल्या प्रमाणामुळे त्यांनी अन्नातून मुक्त केलेल्या साखरेचे प्रमाण आणि त्यातून चरबी वाढत जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. बॅक्टेरॉईडिट्सचे कमी झालेले प्रमाण हे मधुमेहींमधील अन्नपचनात अडथळा निर्माण करू शकते. सूक्ष्मजीवांमध्ये झालेले बदल समजल्यामुळे त्यानुरुप उपचारही भविष्यात शक्य होतील. या अभ्यासात मधुमेहींच्या पोटातील परजीवी आणि बुरशींमध्ये होणारे बदलही अभ्यासण्यात आले आहेत,’ असेही ते म्हणाले.
अशा प्रकारचे संशोधन परदेशातही झाले असून, तेथील मधुमेहींच्या पोटातील सूक्ष्मजीवांमध्ये होणाऱ्या बदलांपेक्षा आपल्याकडील बदल हा वेगळा असल्याचे या अभ्यासातून प्रथमच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतीय मधुमेही रुग्णांवर उपचार करण्यासाठी भारतात झालेल्या संशोधनाचाच यापुढे आधार घ्यावा लागणार आहे.
भारतातील मधुमेहावर स्वतंत्र संशोधनाची योजना
मधुमेह आणि पोटातील सूक्ष्मजीवांचा परस्परसंबंध अभ्यासताना पुण्यातील नमुने जमा करण्यात आले होते. मात्र, भारताच्या विविध प्रदेशातील लोकांचे राहणीमान, तेथील आहारपद्धती निराळ्या असल्यामुळे अशा प्रकारचा अभ्यास देशातील सर्व प्रदेशांसाठी स्वतंत्रपणे करण्याची आवश्यकता ज्येष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांनी व्यक्त केली. मधुमेहामुळे पोटातील सूक्ष्मजीवांमध्ये बदल होतो, की पोटातील सूक्ष्मजीवांमध्ये बदल झाल्यावर मधुमेहाचा धोका वाढतो हे शोधण्यासाठी निरोगी तरुणांच्या एकाच गटाचा पुढील सुमारे पंधरा- वीस वर्षे सतत मागोवा घेऊन त्यांच्या आरोग्याचा अभ्यास करण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.
—-
Please follow and like us: