सायली सारोळकर
रोनाल्ड रॉस : मलेरियाचा शोधकर्ता
सर रोनाल्ड रॉस यांचा जन्म १३ मे १८५७ साली अल्मोरा, नेपाळ येथे झाला. त्यांचे वडील सर कॅम्पबेल रॉस हे ब्रिटिश राजवटीतील भारतीय सैन्यात अधिकारी होते. वयाच्या आठव्या वर्षी त्यांना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले. वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी सेंट बार्थोलोम्यू विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेतले आणि ते भारतात परत येऊन मद्रास मेडिकल सर्व्हिस येथे सर्जन म्हणून रुजू झाले. मद्रास नंतर त्यांनी बर्मा, अंदमान या ठिकाणी काही काळ काम केले आणि परत इंग्लंडला जाऊन ‘सार्वजनिक आरोग्य (Public Health)’ या विषयात डिप्लोमाचे शिक्षण घेतले. त्यावेळी बॅक्टरिओलॉजी हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता.
१८९४ मध्ये सुट्टीसाठी इंग्लंडमध्ये परत आले असता त्यांची भेट सर पॅट्रिक मॅनसन यांच्याशी झाली आणि ते त्यांचे मार्गदर्शक झाले. सर पॅट्रिक मॅन्सन यांनी डासांच्या माध्यमातून हत्तीरोगाची लागण होऊ शकते असा महत्वाचा शोध लावला होता. हाच शोध रॉस यांच्या पुढील संशोधनात महत्त्वाचा ठरणार होता. याचदरम्यात मॅनसन यांनी मलेरिया आणि डास यांचा संबंध असल्याचे एका शोधनिबंधात मांडले. त्यांना खात्री होती कि मलेरियावरील पुढील संशोधन भारतात योग्य प्रकारे होऊ शकते. याच काळात भारतात मलेरिया सर्वत्र पसरलेला होता. मलेरियाची लागण पाणथळ किंवा दलदलीच्या ठिकाणाहून येणाऱ्या दूषित हवेमुळे होते असा त्याकाळी समज होता. काहीअंशी तो बरोबर देखील असला तरी त्याचे खरे कारण येत्या काळात जगासमोर येणार होते.
भारतात परत आल्यानंतर रॉस यांची नियुक्ती सिकंदराबाद येथे झाली. तिथे त्यांनी मलेरिया वरील संशोधन सुरु केले. सर पॅट्रिक मॅनसन हे मार्गदर्शक म्हणून त्यांना मदत करत होते. डासांना पकडायचे आणि त्यांचे डायसेक्शन करून त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांचे निरीक्षण करायचे हे त्याकाळी त्यांचे रोजचे काम होते. अशाप्रकारे त्यांनी हजारो डासांचे निरीक्षण केले. डास उडून जाऊ नयेत म्हणून प्रचंड उकाड्यात ते तासंतास काम करत असत. काही दिवसांनी उटीमधील मलेरियाचा प्रादुर्भाव झालेल्या एका ठिकाणी त्यांचे जाणे झाले आणि तिथे त्यांना अंगावर पांढरे ठिपके असलेले तपकिरी रंगाचे डास आढळून आले. या आधी अभ्यासलेल्या डासांच्या कोणत्याच प्रजातीमध्ये मलेरियाचे पॅरासाईट अर्थात परजीवी आढळले नव्हते.
त्यानंतर सिकंदराबाद येथे परत येऊन त्यांनी या डासांची पैदास सुरु केली. त्या डासांच्या पोटात रॉस यांना मलेरियाचे परजीवी आढळून आले. हाच तो ऍनाफिलीस जातीचा डास! याच दरम्यान त्यांची बदली कोलकाता येथे झाली. कोलकाता येथे त्यांनी पक्ष्यांचा वापर करून पुढील संशोधन केले. १८९८ मध्ये रॉस यांनी सिद्ध केले कि मलेरियाच्या संसर्गामध्ये डास हे मध्यस्थ पोषक अर्थात intermediate host असतात. पुढे त्यांनी असाही शोध लावला कि या परजीवींची वाढ डासांच्या पोटात होते आणि त्यानंतर ते डासांच्या लाळग्रंथीमध्ये साठवले जातात. त्यांच्या या संशोधनात त्यांना त्यांचे भारतीय सहाय्यक किशोरीमोहन बंदोपाध्याय यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विशेषतः मलेरियाच्या रुग्णांना शोधून त्यांना रक्ताचे नमुने द्यायला तयार करणे हे महत्त्वाचे काम त्यांनी केले.
कित्येक वर्षे ज्या आजाराने संपूर्ण मानवजातीला ग्रासले होते, त्या मलेरिया बद्दल इतके महत्त्वाचे संशोधन केल्याबद्दल सर रोनाल्ड रॉस यांना १९०२ मध्ये नोबेल पुरस्काराने तर १९११ साली नाईटहूड देऊन सन्मानित करण्यात आले.
जीवनसत्वांचा शोध
जीवनसत्त्व अर्थात व्हिटॅमिन्सचा शोध हा आरोग्यशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचा शोध मानला जातो. सर फ्रेडरिक हॉपकिन्स आणि क्रिस्तियान आइकमन यांना १९२९ मध्ये ‘जीवनावश्यक पोषक घटकांच्या’ शोधासाठी वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कालांतराने त्यांना व्हिटॅमिन (व्हायटल अमिन्स) असे नाव दिले गेले. अर्थात जीवनसत्त्वांच्या शोधात हॉपकिन्स आणि आइकमन यांच्या आधी आणि नंतरदेखील कित्येक शास्त्रज्ञाचे मोठे योगदान आहे.
जीवनसत्त्वांच्या शोधाच्या आधीचा काळ
फ्रेंच शास्त्रज्ञ फ्रँकॉईस मॅगँडी यांनी पोषक आहाराविषयीच्या संशोधनाचा पाया रचला. १८१६ साली त्यांनी एक प्रयोग केला, ज्यात काही कुत्र्यांना त्यांनी केवळ साखर आणि नायट्रोजन-विरहित अन्नपदार्थ खायला दिले. काही दिवसांनी त्या कुत्रांचे वजन कमी झाले, त्यांना केरायटिस अर्थात कॉर्नियल अल्सर (डोळ्यांच्या कॉर्निया मध्ये दाह निर्माण करणारा आजार) झालेला दिसून आला आणि त्यांचा मृत्यू झाला. ही परिस्थिती अ-जीवनसत्वाच्या अभावाने निर्माण होते आज आपल्याला ज्ञात आहे. तोपर्यंत मानवाला प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि मिनरल्स हे ४ आवश्यक घटक माहित होते. परंतु या प्रयोगातून आपल्याला माहित नसलेले काहीतरी पोषणतत्त्व अस्तित्वात असावे असे त्यांना वाटले.
जर्म थिअरीचा शोध
या नंतरच्या काळात रॉबर्ट कोच या शास्त्रज्ञाने जर्म थिअरी चा शोध लावला आणि वैद्यकशास्त्रात क्रांती घडली. रॉबर्ट कोच आणि लुईस पाश्चर यांनी सूक्ष्मजीव व त्यामुळे होणारे आजार यावर संशोधन केले. त्यामुळे अनेक आजारांची कारणे जगासमोर आली आणि त्यावर उपचार शोधण्यासाठी मदत झाली. अँथ्रॅक्स, मलेरिया, टीबी, कॉलरा, घटसर्प, कुष्ठरोग अशा अनेक आजारांवर या काळात संशोधन सुरू होते. त्यामुळे स्कर्व्ही, बेरिबेरी हे आजार देखील सूक्ष्मजीवांमुळे होत असावेत असा त्या काळी समज तयार झाला.
त्याच वेळी एक डच शास्त्रज्ञ क्रिस्तियान आइकमन बेरीबेरी या रोगावर संशोधन करत होते. अभ्यास सुरू असताना त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या प्रयोगशाळेतील काही कोंबड्यांना बेरीबेरी-सदृश्य एक आजार झाला आहे. त्या काळात, प्रयोगशाळेतील कोंबड्यांना लष्करी रेशनमधून उरलेला तांदूळ दिला जात असे. मात्र ,तांदळाचा स्रोत बदलल्यानंतर कोंबड्या आपोआप बऱ्या झाल्याचे आइकमन यांनी पहिले. थोडी माहिती घेतल्यावर त्यांना कळले की ज्यामुळे कोंबड्या आजारी पडल्या तो पॉलीश केलेला तांदूळ होता आणि आणि पॉलीश न केलेला तांदुळ खाऊ लागताच सगळ्या कोंबड्या आपोआप बऱ्या झाल्या. त्यावरून त्यांनी निष्कर्ष काढला की, पॉलीश न केलेल्या तांदळात असे काहीतरी पोषक घटक होते, आणि याच घटकाच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा आजार होतो. याचा संशोधनासाठी पुढे त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर कॅसिमीर फंक या रसायनशास्त्राने नमूद केले की, अमिनो अम्लाप्रमाणे या पोषक घटकांमध्ये देखील नायट्रोजन असावा. आवश्यक आलेले अमिनो अम्ल, अर्थात व्हायटल कमिन्स म्हणून त्याने त्यांना व्हिटॅमिन्स असे म्हणून संबोधले.
व्हिटॅमिन थिअरी
व्हिटॅमिन्सचे अस्तित्व खऱ्या अर्थाने सिद्ध करणारे शास्त्रज्ञ होते फ्रेडरिक हॉपकिन्स! हॉपकिन्स हे ब्रिटिश जैव रसायन शास्त्रज्ञ होते. त्यांच्या मते आहारामध्ये प्रोटिन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स यांच्या व्यतिरिक्त आणखी काहीतरी महत्त्वाचा घटक होता. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक प्रयोग केला. काही उंदरांना त्यांनी हे सर्व घटक असलेले अन्न खाऊ घातले आणि काहींना त्याचसोबत थोड्या प्रमाणात दूध सुद्धा दिले. त्यांच्या लक्षात आले की, दूध न दिलेले उंदीर हे काही काळाने अशक्त झाले. त्यांनी निष्कर्ष काढला की दुधामध्ये असे काहीतरी आहे जे प्राण्यांच्या वाढीसाठी आवश्यक आहे, त्याला त्यांनी accessory food factors असे नाव दिले. अशा प्रकारे व्हिटॅमिन्सचे अस्तित्व आणि महत्त्व हॉपकिन्स यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले. त्यांच्या या संशोधनामुळे व्हिटॅमिन्स बद्दलच्या अभ्यासाला एक दिशा मिळाली आणि पुढील काळात अनेक शास्त्रज्ञांना त्यावरील संशोधनासाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित केले गेले.
————