सूर्योदयाआधी पूर्व क्षितिजावर दोन तेजस्वी ग्रहांचे दर्शन
संशोधन, १२ नोव्हेंबर २०१७
सोमवारी (१३ नोव्हेंबर) पहाटे पूर्व क्षितिजावर शुक्र आणि गुरु हे आकाशातील दोन तेजस्वी ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ आल्याचे दृश्य पाहायला मिळेल. खगोलशास्त्रीय भाषेत या घटनेला युती (conjunction) म्हणतात. शुक्र आणि गुरु एकमेकांपासून फक्त ०.२८ अंश इतक्या कमी अंतरावर येणार असून, असा योग यापुढे थेट २०३९ मध्ये येणार असल्यामुळे ही घटना आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्याची संधी आकाशप्रेमींनी सोडू नये.
शुक्र हा सूर्य आणि चंद्राखालोखाल आकाशातील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. तर, गुरु हा शुक्रानंतरचा तेजस्वी ग्रह आहे. आकाशातील हे दोन्ही तेजस्वी ग्रह सोमवारी पहाटे एकमेकांपासून चंद्राच्या आकारापेक्षाही कमी अंतरावर येणार आहेत. पूर्व क्षितिजावर पाहिल्यास तेजस्वी ग्रहांची ही जोडी आपले लक्ष्य वेधून घेईल. यावेळी -४ मॅग्निट्यूडचा शुक्र डाव्या बाजूला, तर – १.७ मॅग्निट्यूडचा गुरु उजव्या बाजूला दिसेल. ज्यांच्याकडे टेलिस्कोप आहे त्यांना टेलिस्कोपमधून हे ग्रह एकाचवेळी पाहण्याची संधी मिळेल. शुक्र आणि गुरु आपापल्या कक्षांमधून फिरताना आकाशात १३ महिन्यांतून एकदा जवळ येतात. मात्र ही घटना बहुतेक वेळा सूर्यप्रकाशात घडत असल्यामुळे आपल्याला दिसत नाही. सूर्योदयाच्या आधी किंवा सूर्यास्तानंतर संधीप्रकाशात शुक्र आणि गुरुची युती शतकातून काही वेळाच दिसते. येत्या शंभर वर्षांत अशी स्थिती फक्त १३ नोव्हेंबर २०१७ आणि २ नोव्हेंबर २०३९ मध्ये येणार आहे, जेव्हा दोघांमधील अंतर अर्धा अंशांपेक्षाही कमी झाले असेल आणि ही घटना सूर्यप्रकाशाच्या अडथळ्याशिवाय आपल्याला पाहता येईल.
अर्थात हे दोन्ही ग्रह आकाशात आपल्याला इतके जवळ आलेले दिसणार असले, तरी ते प्रत्यक्षात एकमेकांपासून अतिशय दूर आहेत. हे दोन्ही ग्रह आपापल्या कक्षांमधून फिरताना पृथ्वीपासून जवळ- जवळ एका रेषेत येणार आहेत. म्हणून आकाशात त्या दोघांमधील अंतर कमी झाल्याचे आपल्याला दिसून येईल. खालील चित्रामध्ये गुरु- शुक्र युतीदरम्यान सूर्यमालेतील त्यांच्या आणि पृथ्वीच्या स्थानाची नेमकी स्थिती कशी असेल ते आपल्याला स्पष्ट होईल.
संशोधनच्या पेजवर ही दुर्मिळ घटना १३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५:४५ पासून टेलिस्कोपद्वारे लाईव्ह पाहता येईल.
Please follow and like us: