अम्फन ठरले बंगालच्या उपसागरातील सर्वात तीव्र चक्रीवादळ  

संशोधन, १९ मे २०२०
पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरातील अम्फन महाचक्रीवादळाची तीव्रता मंगळवारी (१९ मे) कमी होऊन त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले. बुधवारी (२० मे) दुपारनंतर अम्फन पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्या दरम्यानच्या सुंदरबन क्षेत्राला धडकेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, अम्फन हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातील आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ असल्याचे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. चक्रीवादळाची तीव्रता फक्त १८ तासांमध्ये सर्वसाधारण चक्रीवादळापासून महाचक्रीवादळापर्यंत वाढत गेली असून, त्यासाठी बंगालच्या उपसागराच्या पृष्ठभागाचे ३२ ते ३४ अंश सेल्सिअस असणारे तापमान कारणीभूत असल्याचे, बोलले जात आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होऊन महाचक्रीवादळाच्या श्रेणीमध्ये पोचलेल्या चक्रीवादळांमध्ये अम्फनची तीव्रता सर्वाधिक असल्याचे नोंदींमधून समोर येत आहे.
अम्फन मंगळवारी ओडिशातील पारादीप बंदरापासून ५०० किलोमीटर दक्षिणेला होते. ताशी १८ किलोमीटर वेगाने ते उत्तर – वायव्य बंगालच्या उपसागराकडे सरकत असून, २० मे रोजी तीव्र चक्रीवादळाच्या स्वरूपात अम्फन पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळाची तीव्रता अधिक असल्यामुळे जमिनीला धडकल्यावर त्यापासून होणारे नुकसानही मोठे असू शकते.
सुपर सायक्लोन किंवा महाचक्रीवादळ म्हणजे काय?

सर्वसाधारण स्थितीत समुद्रसपाटीवर वातावरणीय दाब १००० मिलीबार असतो. कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये मिलीबारचे आकडे खाली उतरू लागतात. चक्रीवादळ निर्माण झाल्यावर त्याच्या मध्य भागातील दाब ९६० मिलीबार इतका खाली उतरतो; तर त्याच्या केंद्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्यांची गती ताशी ६० ते ९० किलोमीटर इतकी होते. वादळ जर अधिक काळ समुद्रावर राहिले तर दाब आणखी कमी होत जातो, वाऱ्यांचा वेग आणखी वाढतो आणि चक्रीवादळाचा घेरा शेकडो किलोमीटरपर्यंत पसरतो. ‘सुपर सायक्लोन’मध्ये तर दाब ९१० मिलीबार इतका खाली उतरतो. त्याच्या केंद्राभोवती फिरणारे वारे ताशी २५० किलोमीटरचा वेग गाठतात आणि या महाचक्रीवादळाचा घेरा तब्बल दोन हजार किलोमीटरपर्यंत विस्तारतो. प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या अशा महा चक्रीवादळांना टायफून, तर अटलांटिक महासागरात निर्माण होणाऱ्या महा चक्रीवादळांना हरिकेन म्हणतात. हिंदी महासागरात त्यांना सुपरसायक्लोन म्हणतात.

 

लँडफॉल आणि प्रलय

चक्रीवादळ ज्या क्षणाला जमिनीला येउन धडकते, त्याला शास्त्रीय भाषेत चक्रीवादळाचा लँडफॉल म्हणतात. चक्रीवादळाला समुद्राकडून मिळालेली ऊर्जा ही १०० हायड्रोजन बॉम्बपेक्षा अधिक असते. एवढी प्रचंड ऊर्जा धारण केलेले चक्रीवादळ जमिनीवर येताच तीन प्रकारे विनाश घडवू शकते –

१) चक्रीवादळातून वाहणारे प्रचंड वेगाचे वारे वाटेत येणाऱ्या सर्व अडथळ्यांना जमीनदोस्त करायला सुरुवात करतात. लहान घरे, झोपड्यांची वाताहत होते, झाडे उन्मळून पडतात, विजेचे, दूरध्वनीचे खांब पडतात, घराची छप्परे उडून जातात, अनेकदा पक्क्या इमारतींच्या भिंतीही कोसळतात.
२) दुसरीकडे प्रचंड बाष्प धारण केलेले ढग मुसळधार कोसळत असतात. अशा ढगांकडून ५०० मिलीमीटर पेक्षाही जास्त (पुण्यातील हंगामातील सरासरीइतका) पाऊस एका दिवसात कोसळतो. यांमुळे अक्षरशः प्रलय येऊन वाटेत येणारे सर्व काही वाहून जाते.
३) चक्रीवादळ तिसरा फटका समुद्राच्या लाटांमार्फत देते. या लाटांना स्टॉर्म सर्ज म्हणतात. कमी दाब आणि वेगवान वाऱ्यांमुळे लँडफॉलदरम्यान समुद्र किनारपट्टीवर पाच मीटर उंचीच्या लाटा उसळू लागतात. यांमुळे सखल भागात किनाऱ्यापासून एक किलोमीटरपर्यंत पाणी आत येते. समुद्राच्या या पाण्याखाली शेती आल्यामुळे शेकडो हेक्टरची जमीन काही काळ नापीक होते. वादळाच्या या तीनही परिणामांचा थेट फटका बसल्यामुळे माणसांची आणि जनावरांची जीवित हानी मोठ्या प्रमाणात होते. हजारो लोक बेघर होतात, वीज, पाणी, संपर्क यांच्या यंत्रणा कोलमडल्यामुळे अडचणी आणखी वाढतात. वादळानंतर निर्माण होणारे आरोग्याचे, पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे असते. समुद्रावरून जमिनीवर येणारे एक वादळ लाखो लोकांवर थेट परिणाम करते आणि अब्जावधी रुपयांचे नुकसान घडवते.
जमिनीवर आल्यावर मात्र चक्रीवादळाचा जोर झपाट्याने घसरतो. त्याला समुद्राकडून मिळणारे बाष्प आणि ऊर्जा एकाएकी बंद झाल्यामुळे त्याचे टप्प्याटप्प्याने (१२ ते २४ तासांत) डिप्रेशन आणि मग सर्वसाधारण कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होते. त्यासोबत वाऱ्यांचा जोर आणि पावसाचे प्रमाणही कमी होते.
——
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email
Facebook
Twitter