अरविंद गुप्ता.. एक अवलिया

संशोधन, २६ जानेवारी २०१८
ज्येष्ठ विज्ञान प्रसारक अरविंद गुप्ता यांना यंदाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि विज्ञान प्रसाराच्या कार्याचा आढावा घेणारा नीलांबरी जोशी यांचा हा लेख.
पूर्व प्रसिद्धी- ‘सॅटेलाईट सायन्स’- दिवाळी २०११ – ‘वैज्ञानिक महाराष्ट्र’
—————————————-

अरविंद गुप्ता.. एक अवलिया 

लेखिका- नीलांबरी जोशी
—————————————–
पुणे विद्यापीठात आयुकामध्ये मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्र आहे. तिथे अरविंद गुप्ता नावाचा अवलिया माणूस राहतो. त्यांना अनेक विशेषणांनी गौरविलं गेलेलं आहे. त्यात त्यांना अनेकदा खेळण्यांचा जादूगार म्हणलं जातं.
जादूगर म्हणजे कबुतराचा ससा करणारा किंवा पत्त्यांची जादू वगैरे करणारा माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो. तसेच खेळणी म्हणजे डोळ्यासमोर येतात ती खेळण्यातील पिस्तुले, बार्बी, मेकॅनो, जिग साॅ पझल असलेले एक भलेमोठे खेळण्यांचे दुकान व तिथे आपल्या खिशाला लागणारी चाट. मुलांना खरोखर या खेळण्यांतून त्यांच्या वाढीसाठी चालना मिळते का, नवीन खेळणे ते किती वेळ खेळतात, खरे तर मुले सतत काहीतरी खुडबुड करून मजेत बऱ्याच गोष्टी शिकत असतात. काचनळ्या. चंचुपात्रे असे विज्ञान साहित्य बरेचदा कपाटात राहते व ते मुलांच्या मनात दहशतच निर्माण करतात.

मुलांना विज्ञानातील तत्वे खेळण्यांतून समजवीत या हेतूने अरविंद गुप्ता सतत कार्यरत आहेत. मुलांसाठी जग हीच एक प्रयोगशाळा आहे व जीवन हीच एक प्रयोगांची मालिका आहे. मुलांना हलती, शिट्ट्या वाजवणारी, टुणटुण उड्या मारणारी खेळणी आवडतात. ती स्वत बनवायला तर फारच आवडतात.
गुप्ताजींच्या अनेक वर्कशाॅप्सचे यश म्हणजे मुले अतिशय आनंदाने विचारतात की, हे बनविलेले घरी घेऊन जायचे का? स्वत बनविलेले खेळणे, वस्तू त्यांना अतिशय प्रिय असते. कागदांच्या घड्यांमधून विविध टोप्या बनवायला एक गोष्टीतून गुप्ताजी सांगतात तेव्हा चिमुकले चेहरे डोळे विस्फारून बघत व करत असतात. हा एक अतिशय हृद्य अनुभव असतो. मुले पाणी प्यायला सुद्धा वर्कशाॅपमध्ये असताना उठत नाहीत असे गुप्ताजींचे सहकारी सांगत होते. घरी असताना दर एक मिनीटाने आईवडिलांचे डोके खाणारे मूल, जे एक तास कशात रमले तर फार झाले असे अनेक आई- बापांना वाटते, त्यांना हा अनुभव किती मोलाचा आहे हे निश्चित कळेल.
सहा वर्षांपूर्वी आमच्या बुकक्लबच्या मिटींगमध्ये एकजण अरविंद गुप्ता यांना घेऊन आले. गुप्ताजींनी तेव्हा त्यांच्या नेहमीच्या खुमासदार शैलीत अनेक कथा सांगितल्या. फर्डिनांड या बेलाची कथा सांगितलेली आजही आठवते. दुसऱ्या दिवशी त्यांना ईमेल पाठवून विचारले की, मी तुमच्या पुस्तकांच्या प्रकल्पासाठी काय मदत करू तर त्यांनी fire of Hiroshima हे पुस्तक अनुवादासाठी पाठवून दिले. अशा प्रकारे त्यांच्यासोबत काही करायची संधी मिळाली.
त्यानंतर पुस्तकांच्या अनुवादांच्या निमित्ताने आयुकामधील त्यांच्या मुक्तांगण विज्ञानशोधिकेत जाणे अनेकदा झाले. वर्षभरात दोनतीन वेळा जाणे होत असे. मुळात पुणे विद्यापीठाचा परिसर अतिशय लाडका, तिथे जाणे हा एक आनंदाचा भाग असतो. त्यात गुप्ताजींकडे जाण्यासाठी निघाले की संपूर्ण वेळ मन भारलेलेच असते. दरवेळेला शोभा भागवत यांनी म्हटल्याप्रमाणे ‘हा खेळण्यांचा जादूगर’ उत्फुल्ल मनाने स्वागत करतो. अनेक माणसांना ते दररोज भेटतात, रोज कित्येकांना ईमेल्स लिहीतात. सर्व माणसांचे वर्णन करताना ते नेहमी त्यांच्या खास उत्तर प्रदेशच्या हिंदीत भरभरून कौतुक करतात.
रोज आपण किती तक्रारी करतो, माणसांच्या गर्दीच्या, भाव वाढीच्या.. पण, गुप्ताजींसारख्या माणसाकडून अजिबात तक्रार न करण्याचा गुण घेण्यासारखा आहे. मुलाखतीदरम्यान ते सहजपणे म्हणाले.. ‘हमे लगता है हम जिंदगीके साथ खेलते है, लेकिन तब जिंदगी हमारे साथ खेल रही होती है.”
अरविंद गुप्ता हे मूळचे उत्तर प्रदेशातील बरेली या गावचे. घर हे पारंपारिक व्यापार करणारं. आई-वडिल दोघेही कधी शाळेत गेले नाहीत. मात्र, आपल्या मुलांनी शिकावं ही आईची इच्छा. आईने मुलांच्या शिक्षणासाठी दागिने विकून पैसे गोळा केले. मुलांना गावातल्या एका ख्रिश्च शाळेत विरोधाला न जुमानता घातले. बारावीला जिल्ह्यात पहिले आल्यानंतर अरविंद गुप्ता यांचे महाविद्यालयीन शिक्षण कानपूर आय.आय.टी. मध्ये झाले. तिथेही त्यांनी चार मित्रांनी मिळून सहयोग ग्रुप स्थापन केला व कामगारांच्या मुलांसाठी opportunity school चालवले.
कानपूरच्या शिक्षणादरम्यान अनिल सदगोपाल यांच्याशी ओळख झाली व टेल्कोमधील दोन वर्षाची नोकरी संपल्यावर ते अनिल सदगोपाल यांच्या होशंगाबाद विज्ञान कार्यक्रमात सामील झाले. आजूबाजूच्या वस्तू वापरून विज्ञान कसे शिकवता येईल असे या कार्याचे उद्दीष्ट होते. काडेपेटीतील काड्या, सायकलच्या ट्यूब अशा एरवी किरकोळ वाटणाऱ्या वस्तूंमधून काड्यांचा मेकॅनो उभा राहिला. आजही आयुकात गेल्यावर आजूबाजूला आपण सहज फेकून देतो अशा वस्तूंमधून बनवलेली विज्ञान खेळणी दिसतात. त्यानंतर ते लाॅरी बेकर यांच्याकडे त्रिवेंद्रमला बिनपगाराच्या नोकरीवर आवड म्हणून राहिले. रोज काड्यांचा मेकॅनो बनवून रस्त्याच्या कडेला उभे राहून विकायचे..  हाच चरितार्थ.
परत मधल्या काळात त्यांनी टेल्कोमध्ये काम केलं. तिथे मन रमेना म्हणून शहाडोल जिल्ह्यात अनुपपूरला गेले. छत्तीसगडमध्ये खाणकामगारांच्या मुलांसाठी दहा शाळा सुरू केल्या. त्याच सुमारास ते ‘मिंतान’ नावाचे एक वृत्तपत्र स्वतच्या हाताने लिहून काढत. त्यांची आई १९८१ मध्ये कॅन्सरने गेली. तेव्हा सर्व सोडून ते तिच्या सेवेसाठी एक वर्ष राहिले होते. आजही सासूबाईंसाठी, बहिणीसाठी त्या आजारी असल्या तर सगळं काम सोडून ते जातात.
त्यांच्या लग्नाचा किस्सा आता अनेकवेळा वाचण्यात आला आहे. त्यांनी एक मजेदार जाहिरात दिली होती. “आयआयटी कानपूरचा इंजिनिअर. पाच वर्षे टेल्कोमध्ये काम केलं आहे. सध्या ट्रेड युनियनचं काम करतो आहे. घटस्फोटीत, विधवा , मुलं असलेली / नसलेली, वय, जात यांची अट नाही. हुंडा वगैरे नको.”
याला प्रतिसाद म्हणून आलेल्या एका पत्राद्वारे त्यांचं सुनीता पंधे यांच्याशी लग्न झालं. मग मुलीच्या जन्माच्या वेळी ते पुण्यात आले. पैसे तर मिळवायला हवे होते. त्यादरम्यान यशपाल यांच्या फेलोशिपखाली त्यांचे ‘खेल खेल में’ हे पुस्तक आले. त्यांच्या पाच लाखाहून जास्त प्रती छापल्या गेल्या. ते १३ भारतीय भाषांमध्ये छापलं गेलं. त्यानंतर चांगल्या पुस्तकांची शिक्षणक्षेत्रातील वानवा लक्षात घेऊन तोत्तोचान, दिवास्वप्न अशी अनेक पुस्तके आपल्याकडे आली. आजही ते सत्र अव्याहतपणे चालू आहे.
१९९० मध्ये दुलारी अरविंद गुप्ता यांची मुलगी ४ – ५ वर्षांची असताना त्यांच्या पत्नीला पीएच.डी. साठी जेएनयूमध्ये दिल्लीला जायचे होते. दुलारीला मिरांबिका शाळेतही जाता येईल या दृष्टीने हे कुटुंब मग दिल्लीला गेले. मिरांबिकाच्या प्रिन्सिपल म्हणाल्या की, ‘दुलारीला एक दिवस येऊ दे, आम्ही तिचं निरीक्षण करून तिच्या प्रवेशाचा ऩिर्णय घेऊ.’ त्यावर गुप्ताजी म्हणाले की, “दुलारीलाही शाळेचं निरीक्षण करू दे.” अमेरिकेत मला अशीच एक घटना आठवते. एक वर्षाच्या मुलाला सुद्धा फुगा घेताना विचारले जाते की, त्याला कोणत्या रंगाचा फुगा हवा आहे. मुलांसाठी हे किती महत्वाचे आहे ते आपण हमखास विसरतो.
या शाळेत गणवेश, प्रार्थना, होमवर्क नाही. मुले आनंदाने खेळतात, स्वतः काय शिकायचे ते ठरविण्याची मुभा असल्याने हिंदीसुद्धा न येणारी मुले चिनी भाषा शिकली. त्यानंतरचे दुलारीचे शिक्षण सरदार पटेल या शाळेत झाले. अनिल अवचटांचे त्यांनी मुलींना कसे वाढविले यावरचा एक लेख वाचला होता. अरविंद गुप्तांवर त्यांनी व सुनीता यांनी दुलारीला कसे वाढविले यावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. ‘मराठी माध्यमात मुलांना घाला,’ असा सार्वजनिक दिंडोरा पिटणाऱ्यांची स्वतःची मुले मात्र इंग्रजी माध्यमात असतात. हा दुटप्पीपणा गुप्ताजींच्या व्यक्तिमत्त्वात किंचितही आढळत नाही. त्यांनी दुलारीला काय शिकायचे, काय आयुष्यात करायचे याचे दिलेले स्वातंत्र्य, तिला दिलेला वेळ, हे आज तिचे विचार परिपक्व आहेत याचा पाया आहे.
दुलारीचे बारावीपर्यंतचे शिक्षण दिल्लीत झाले. त्यानंतर तिने वेल्लोर येथे मेडिकलला प्रवेश घेतला. ती आता परत आपल्याकडे येणार नाही याची जाणीव झाल्यावर गुप्ताजींनी पुण्यात येण्याचा निर्णय घेतला. गुप्ताजींच्या भाषेत सांगायचं तर ते म्हणाले, “मी स्वतः सोळाव्या वर्षी घर सोडलं. आता मुलगी शिकायला जाते आहे, तर परत येणार नाही हे गृहीतच होतं.” पुणेच का, तर त्यांच्या सासूबाई येथे एकट्या राहत होत्या.
पुण्यात आल्यावर ते टिंगरेनगरला राहत होते. जयंत नारळीकरांनी तेव्हा- साधारण जुलै २००३ मध्ये त्यांना पत्र पाठवून आयुकामध्ये येण्यासंबंधी विचारले. गुप्ताजी त्यावेळेला Maus ho Art Spiegelman यांचे पुस्तक भारतीय भाषेत (हिंदी) आणण्यासाठी झटत होते. त्यांनी नारळीकर व नरेश दधीच यांना सांगितले की, मी या पुस्तकाचे काम झाल्यावर दोन महिन्यांनी आयुकामध्ये येतो. प्रश्न जागेचा होता. टिंगरेनगर मधून रोज विद्यापीठात जायची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. त्याच सुमारास पु.ल.देशपांडे यांच्या पत्नी सुनीता देशपांडे यांनी आयुकाला ४० लाख रुपयांची देणगी दिली. त्यातून मुक्तांगण विज्ञान शोधिका उभी राहिली. त्या इमारतीला पुलत्स्य हे नाव नारळीकरांनी दिले आहे. हे सप्तर्षीमधील एका ताऱ्याचे नाव असून, ते आढळपणा सुचवते. तसेच त्यात ‘पुलं’ हे सुद्धा आले आहे.
याच इमारतीसमोर गुप्ताजींची राहण्याची सोय झाली. आॅक्टोबर २००३ मध्ये ते आयुकात आले.
साप्ताहिक सकाळ, २००३ च्या दिवाळी अंकासाठी शोभ भागवत यांनी अरविंद गुप्ता यांची मुलाखत घेतली. ती मुलाखत पुण्यात गुप्ताजींचे स्वागत होण्यास कारणीभूत ठरली. अनेक लोकांनी ती मुलाखत वाचून गुप्ताजींना फोन केले, पत्रे पाठविली, भेटायला गेले. इतका ज्ञानी, तपस्वी असणारा माणूस पुण्यात आहे हे लोकांपर्यंत पोहोचले. त्यानंतर मुक्तांगण विज्ञान शोधिकेचे काम सुरू झाले. आता टाटा ट्रस्टने दिलेल्या देणगीवर हे काम चालू आहे. या देणगी देण्यामागे टाटा ट्रस्ट अगदी सोपे विचारते. महानगरपालिकेच्या व गावाकडच्या किती शाळांसाठी संस्थेने काम केले आहे? त्याचे उत्तर मुक्तांगणकडे होते ते म्हणजे २५ शाळा. यातून मग शाळांना वर्कशाॅपसाठी आमंत्रित करणे सुरू झाले. वर्षभरात २०० वर्कशाॅप्स घेतली गेली. मुलांना १२ ते १५ वस्तू बनवायला यात शिकवल्या जातात आणि मुख्य म्हणजे मुले त्या वस्तू सोबत घेऊन जातात. घरी येताना नाचऱ्या पावलांनी मूल, “आई, शाळेत मी हे आज केले,” असे म्हणून वस्तू दाखवितात तेव्हाचा आनंद अवर्णनीय असतो.
पुस्तके…पुस्तके
कृतीशील विज्ञान शिक्षणासाठी साध्या सुध्या गोष्टींमधून खेळणी बनविणारे, ही गुप्ताजींची ओळख जगाला आहेच, पण पुस्तकांबद्दलचे त्यांचे कार्य तितकेच महत्त्वाचे आहे. जमाना ई-बुक्सचा आहे. जगातील उत्तमोत्तम साहित्य आता इंटरनेटवर उपलब्ध आहे व दररोज त्याची संख्या वाढते आहे. ‘Million books for billion people’ अशा योजनेखाली गुप्ताजींनी पुस्तके इंटरनेटवर आणायचे ठरविले. आयुकाकडे तेव्हा ब्रॉडबँड कनेक्शन होते. रोज ७०-८० पाने डिजीटाईज करून वेबसाईटवर टाकायची, असे काम गुप्ताजी स्वतः करत असत. मग त्यांना समीर भेटला. त्याच्याबद्दल या लेखात पुढे सविस्तर माहिती येईलच.
त्यांना कॉपीराईटचा कधी त्रास झाला नाही का, हा माझ्या मनात कायमचा एक प्रश्न होता. त्याचे उत्तर मिळाले की, एवढ्या पुस्तकांत त्यांना काॅपीराईट संदर्भात फक्त काही मोजकी पत्रे आली. Issac Asimov च्या पुस्तकांचे भाषांतर करण्यासाठी त्यांनी अमेरिकेत ३० पत्रे पाठविली. उत्तर मिळाले नाही. शेवटी त्यांनी ती पुस्तके मराठीत आणलीसुद्धा.
कॉपीराईट प्रकरणावरून एक मजेदार किस्सा आहे. उदय पाटील हे गुप्ताजींचे एक सहकारी, त्यांनी स्टोरी आॅफ अॅस्ट्रोनाॅमी हे नितांत सुंदर पुस्तक लिहीले आहे. त्यातील रेखाटने अतिशय सुरेख आहेत. त्यात त्यांनी ‘कॉपीराईट’सारखा ‘कॉपीलेफ्ट’ लोगो दिला आहे. हे पुस्तक नवकर्नाटक प्रकाशनाने सात भाषांमध्ये आणले आहे.
गुप्ताजींचे सहकारी म्हणजे विदुला, अशोक रुपनेर, शिवाजी माने. या मुलाखतीच्या परवानगीसाठी ईमेलला आलेल्या उत्तरालाही गुप्ताजींनी लिहीले होते की, “माझ्या सहकाऱ्यांबद्दल लिही. ते काम करतात व श्रेय मात्र मला मिळते.”
विदुला म्हैसकर
आजही काॅलेजमध्ये शिकत असावी असे तिच्याकडे बघून वाटते. अतिशय नम्र, निगर्वी, साध्या ड्रेसमधली मुलगी. कधीही गेले तर मिठी मारून स्वागत करणार. तिच्याबद्दल एक-एक माहिती कळली की आपण थक्क होत जातो. विदुलाने (स्टॅंडफोर्ड, कॅलिफोर्निया) येथून मायक्रोबायलाॅजीमध्ये पीएच.डी. व त्यानंतरचे संशोधन केले आहे. ती रोज बिबवेवाडीतून पुणे विद्यापीठात येते. तिने पुणे, बेंगलोर व मलेशियात मुलांसाठी वर्कशाॅप्स घेतली आहेत.
दैनंदिन कामात विदुला, अशोक, शिवाजी गुप्ताजींना अतोनात मदत करतात.
अशोर रुपनेर
श्रीरामपूरला असताना मधुकर देशपांडे यांच्या विज्ञानवाहिनीत काम केलेला हा उत्साही मुलगा. बी.एड. करताना त्याची मधुकर देशपांडे यांच्याशी ओळख झाली. त्यांच्यासोबत अशोकने आठ वर्षे काम केले. २००४ मध्ये अरविंद गुप्तांसोबत आयुकामध्ये काम करू लागला. साचेबंद आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याची त्याची इच्छा आता पूर्ण होत आहे, असे त्याने आवर्जून सांगितले.
दरवर्षी साऊथ आफ्रिकेत Scifest नावाचे सायन्स फेस्टिवल भरते. त्यात कृतीशील शास्त्रीय शिक्षणावर ६०० निरनिराळे कार्यक्रम असतात. अशोक व गुप्ताजी जे सादर करतात, त्याला बेस्ट इनोव्हेटिव्ह वर्कशाॅपचा दोनवेळा पुरस्कार मिळालेला आहे. या वर्षीच्या कार्यक्रमासाठी त्याला आवर्जून निमंत्रित केले आहे. अशोकने याबद्दल एक किस्सा सांगितला. या कार्यक्रमात सादरीकरणांसाठी लोक भरपूर सामान घेऊन येत असतात. अशोककडे फारसे काही सामानच नव्हते. कारण काडेपेटीतील काड्या, स्ट्राॅ, सायकलची ट्यूब वर्तमानपत्राचे व पोस्टकार्डचे कागद अशाच वस्तूंमधून ते खेळणी बनवून दाखवितात. ती जादूगराची पोतडी असली तरी आकाराने लहान असते. मग तेथील लोकांनी अशोकला तुमचे सामान कुठे आहे, असे विचारले तर तो म्हणाला,  ‘हे इतकेच’ आणि सर्वजण आश्चर्यचकित झाले.
शिवाजी माने
शिवाजी अतिशय गरीब कुटूंबातून आलेला. मात्र त्याचे खेळणी बनविण्याचे व ती सादर करण्याचे कौशल्य थक्क करणारे आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाऊन तो दर आठवड्याला एकटाच वर्कशाॅप्स घेतो. सातवीपर्यंतचे शालेय शिक्षण झालेल्या या मुलाचे वर्कशाॅप्स घेण्याचे कौशल्य एखाद्या पदवीधर माणसाला लाजवेल असे आहे.
समीर धुर्डे
समीर धुर्डे हे नाव मीही वेबसाईटवर (www.arvindguptatoys.com) वाचले होते. गुप्ताजींकडून त्याचे नाव अनेकदा एेकले होते. परवा मुलाखतीदरम्यान तो आला, तर एक तरूण कोवळ्या वयाचा, लाजरा बुजरा आणि चेहऱ्यावरूनच कलावंत वाटणारा मुलगा म्हणजे समीर असे कळले. त्याला अहो जाहो वगैरे म्हणणे केवळ अशक्य. आज वेबसाईटवर २००० पुस्तके व ४०० खेळणी बनविण्याच्या कृती आहेत. त्याचे डिझाईनिंगचे सगळे श्रेय समीरकडे जाते.
तसेच एनआयडीमधून मध्यंतरी मुंडन दलाल हा प्रोजेक्टच्या कामासाठी तीन आठवडे आयुकामध्ये आला होता. त्याने त्या काळात ८०० फोटो काढून वेबर टाकले. सध्या या टीमने learner’s library  नावाचे एक डिव्हिडी देणे सुरू केले आहे. त्यात १००० पुस्तके, ३००० खेळण्यांचे फोटोव ४०० खेळणी बनविण्याच्या फिल्म असे एकत्रित केलेले आहे. या सर्व गोष्टी www.arvindguptatoys.com वर उपलब्ध आहेत.
एकदा आयुकातील या मुक्तांगण विज्ञान शोधिकेत आलेला माणूस याचा एक हिस्साच बनतो. तो एकदम कृतीशील बनतो.
शोभा भागवत
बालभवनला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्द्ल आत्ता वर्तमानपत्रात आपण त्यांचे नाव रोज वाचत अाहोत. बालभवनाचे सहकार्य गुप्ताजींच्या कामाला सतत लाभले आहे. त्यांची काही पुस्तके बालभवनने छापली आहेत.
National Book on scientist या एका अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तकासाठी सध्या गुप्ताजी लेखन करत आहेत. Ted talks या नावाने यूट्यूबवर उपलब्ध असणारया काही फिल्मचे मराठी किंवा हिंदीत सबटायटल्स घालण्याचे काम चालू आहे. ते सबटायटल टाकण्याचे काम गुप्ताजी चोवीस तासांच्या आत शिकले व त्यांनी इंग्लिशच्या जागी हिंदी साबटायटल्स टाकल्याचे मला कळविले. मुलांना सतत काहीतरी चांगले देण्याचा त्यांचा ध्यास प्रत्येक कृतीतून दिसतो.
गुप्ताजींना आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. स्वतः लिहिलेल्या व त्यांनी भाषांतर केलेल्या पुस्तकांची यादी शंभरच्यावर आहे. या पुरस्कारांमधील आयआयटी कानपूरने २००० साली दिलेल्या  Distinguished Alumnus Award चे त्यांना जास्त कौतुक आहे. ३०० विद्यार्थांच्या बॅचमधील त्यांना हा पुरस्कार आयआयटीने दिला आहे. युरोप, अमेरिका, साऊथ आफ्रिका, पाकिस्तान अशा अनेक देशांमधील विज्ञान विषयक चर्चासत्रे, मुलांसाठी वर्कशाॅप्स त्यांनी घेतली आहेत. त्यांचा बायोडाटा पाहून आपण नतमस्तकच होतो.
अरविंद गुप्ता या माणसाबद्दल, त्यांच्या कामाबद्दल कितीही लिहीले तरी कमी पडेल. कृतीतून बोलणारी फार कमी माणसे आपल्या समाजात आढळतात. सरकारी लाल फित त्यांना आजपर्यंत कुठेही अडवू शकलेली नाही. आयुष्यात काय करायचे हे ज्यांना नीट समजलेले असते त्यांच्या प्रत्येक निर्णयात, कृतीत ते कसे डोकवते याचे गुप्ताजी हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
मुक्तांगणमध्ये तयार होणाऱ्या अनेक विज्ञान खेळण्यांच्या कृती छोट्या फिल्मद्वारे वेबसाईटवर टाकण्याचा एक उपक्रम गुप्ताजींनी हातात घेतला. १७ जून २००९ ला पहिली फिल्म यूट्यूबवर टाकली. बघता बघता आज १६ भाषांमध्ये या फिल्म उपलब्ध आहेत. आजपर्यंत १७ लाख लोकांनी या साईटला भेट दिली आहे. आणि रोज ही संख्या वाढतेच आहे. प्रभाकर नानावटी या मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषांवर प्रभुत्व असणारया माणसानं ३०० फिल्मस कन्नड भाषेत डब केल्या आहेत. तर मुक्तांगण भेट द्यायला आलेल्या ताझिमा या मुलीनं उझबेक, रशियन आणि ताझिक भाषांत या फिल्म्सचा अनुवाद केला आहे. सायन्स सिटी भावनगरला तयार व्हावी यासाठी गुप्ताजींची मदत मागणारया बलवंत पारेख या पिडिलाईटच्या मालकांनी या प्रयोगांच्या फिल्मची एक सीडी गुजराथी भाषेत तयार करून वाटली.
लायब्ररी डाॅट एनयू (LIBRARY.NU) या वेबसाईटवरही त्यांनी आता काही पुस्तके टाकायला सुरूवात केली आहेे. त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटला रोज भेट देणाऱ्यांची संख्या तर इतकी प्रचंड आहे की, तिथे जास्त ट्राफिक झाल्यामुळे गुप्ताजींना दर महिन्याला १०० डाॅलर्स भरावे लागतात.
त्यांच्या सहकाऱ्यांशी बोललं तर प्रथम जाणवतो तो, त्या सगळ्यांना गुप्ताजींबद्दल वाटणारा आदर आणि मुख्य म्हणजे जिव्हाळा. विदुला, अशोक, शिवाजी, ज्योती या सगळ्यांच एकमत झालं ते गुप्ताजी माणसातले गुण अचूक हेरून त्याला योग्य ते काम सांगतात या विषयावर. या सगळ्यांना प्रेरीत करणे, त्यांच्यातल्या सळसळत्या उत्साहाला दिशा देणे हे महत्त्वाचे काम गुप्ताजी अंगभूत गुणामुळे सहजपणे करत असतात. अशा लोकांना टीमवर्कचे धडे मॅनेजमेंटच्या ट्रेनिंगमध्ये घ्यावे लागत नसतात.
गुप्ताजी चालतात, बोलतात आतिशय जलद. मुक्तांगणमध्ये पाहिलं तर ते सतत काहीतरी करत असतात. क्षणात आलेल्या माणसांशी अतिशय अदबीनं अस्खलित हिंदी बोलतील, तर दुसऱ्या क्षणी कम्प्युटरवर कोणतीतरी फिल्म, ईमेल, पुस्तक वेबसाईटवर दाखवतील. तसंच ते अतिशय जलद निर्णय घेतात. त्यांना माणसं लागतात. गुप्ताजी जगन्मित्र आहेत. देशोेदेशीचे लोक त्यांच्याशी ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून संपर्क साधत असतात. इतक्या विविध देशातले विविध विषयातले लोक त्यांच्या मित्रांच्या यादीत आहेत, हे पाहून थक्क व्हायला होतं.
पुणे विदयापीठातल्या एक कोपऱ्यात आयुका आणि त्यात हे छोटसं मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र वसलंय. पण गुप्ताजींच्या जागतिक दृष्टीकोन व्यापक आहे. भांडवलदारी अर्थव्यवस्था, काॅर्पोरेट विश्वाबद्दलची उलटसुलट मतं, विनायक सेन अशा अनेक विषयांत त्यांच्याशी भरभरून संवाद साधता येतो. मात्र इतके गुण असून, इतके पुरस्कार मिळून ते स्तुतीने भारून, वाहवूून जात नाहीत. त्यांचे पाय सतत जमिनीवर आहेत.
आपल्याजवळ पुणे विद्यापीठात असे एक केंद्र आहे, त्यात मुलांसाठी तळमळीने काम करणारी माणसे आहेत हे पुणेकरांना आत्ता कुठे थोडेफार माहिती हेऊ लागले आहे.
संपर्कासाठी ईमेल – arvindguptatoys@gmail.com
वेबसाईट – www.arvindguptatoys.com
Please follow and like us:
Pin Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email