अशी आहे स्पेस एक्सची मानवी अवकाश मोहीम

मयुरेश प्रभुणे, ३० मे २०२०

स्पेस एक्स या अमेरिकी कंपनीने विकसित केलेल्या ‘क्रू ड्रॅगन डेमो २’ या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेचे प्रक्षेपण भारतीय प्रमाण वेळेनुसार ३१ मेच्या पहाटे १२:५२ ला पार पडणार आहे. दोन ॲस्ट्रोनॉटचा समावेश असलेली क्रू ड्रॅगन ही अवकाशकुपी फाल्कन ९ या रॉकेटच्या साह्याने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाणार आहे. काही आठवडे अवकाशात राहिल्यावर ऑगस्टच्या सुरुवातीला दोघा अवकाशवीरांसह क्रू ड्रॅगन अटलांटिक समुद्रात पॅराशूटच्या साह्याने अलगद उतरेल.

पार्श्वभूमी:

अमेरिकेच्या मानवी अवकाश मोहिमांत महत्वाची भूमिका बजावलेला ‘स्पेस शटल’ कार्यक्रम १९८१ ते २०११ या कालावधीत सक्रिय होता. अवकाशवीरांसह पृथ्वीजवळच्या कक्षेत भ्रमण केल्यावर जमिनीवर विमानांप्रमाणे उतरण्याची स्पेस शटलची क्षमता होती. नासाने स्पेस ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमअंतर्गत (एसटीएस) एंटरप्राईझ, कोलंबिया, चॅलेंजर, डिस्कव्हरी, अटलांटिस आणि एन्डेव्हर अशा सहा स्पेस शटलची निर्मिती केली होती. मात्र, मोठ्या खर्चाचे कारण देऊन २०११ मध्ये स्पेस शटल कार्यक्रम निवृत्त करण्यात आला. पृथ्वीजवळच्या कक्षेत किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर (आयएसएस) ॲस्ट्रोनॉट पाठवायचे असतील, किंवा साहित्याची ने आण करायची असेल, तर यापुढे खाजगी कंपन्यांच्या मदतीने अवकाशात पाठवावेत आणि नासाने संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करावे असा निर्णय अमेरिकी प्रशासनाने घेतला होता. त्याला अनुसरून स्पेस एक्स आणि बोईंग या कंपन्यांना रॉकेट आणि अवकाशकुपी विकसित करण्याचे कंत्राट मिळाले. नासाच्या देखरेखी खाली आणि तांत्रिक सहकार्याने या दोन्ही कंपन्यांनी आपापली रॉकेट आणि अवकाश कुपी विकसित केली. स्पेस एक्सने फाल्कन ९ हे शक्तिशाली रॉकेट, ॲस्ट्रोनॉटच्या वाहतुकीसाठी क्रू ड्रॅगन, तर साहित्याची ने आण करण्यासाठी कार्गो ड्रॅगन अवकाशकुपी विकसित केली. दुसरीकडे बोईंग कंपनीने लॉकहीडच्या मदतीने ॲटलास ५ हे रॉकेट आणि स्टारलाईनर अवकाशकुपी विकसित केली.

स्पेस शटल कार्यक्रम बंद झाल्यापासून अमेरिकी ॲस्ट्रोनॉटना अवकाशात पाठवण्यासाठी रशियाच्या सोयूझ यानाचा वापर केला जात होता. आता स्पेस एक्सचे रॉकेट आणि अवकाशकुपी दोन्ही तयार असल्यामुळे नऊ वर्षांनंतर पुन्हा अमेरिकी जमिनीवरून ॲस्ट्रोनॉट अवकाशात झेपावण्यासाठी सज्ज आहेत. ‘क्रू ड्रॅगन डेमो २’ मोहीमही मोहीम फक्त अमेरिकाच नाही तर खाजगी कंपनीच्या पुढाकाराने पार पडणारी जगातील पहिली व्यावसायिक मानवी अवकाश मोहीम आहे. स्पेस एक्स कंपनीचे रॉकेट आणि अवकाशकुपी वापरून नासा आपल्या दोघा ॲस्ट्रोनॉटना स्पेस स्टेशनवर पाठवून परत आणणार आहे. पहिलीच, प्रायोगिक मानवी मोहीम असल्यामुळे मोहिमेला डेमो २ म्हटले जात आहे. स्पेस एक्सची  डेमो १ मोहिम मानवरहित होती. मात्र डेमो १ ची अवकाशकुपी सुरक्षितपणे जमिनीवर आल्यावर पुढील प्रयोग सुरु असताना झालेल्या स्फोटात गेल्या वर्षी ती अवकाशकुपी नष्ट झाली. त्या प्रयोगाच्या नोंदी लक्षात घेऊन डेमो २ मोहिमेत आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. या मोहिमेला डेमो २ प्रमाणेच ‘लाँच अमेरिका’ असेही म्हणण्यात येत आहे. नऊ वर्षानंतर अमेरिकी जमिनीवरून होणारे हे प्रक्षेपण मात्र कोविडच्या साथीमुळे अवकाशप्रेमींना ऑनलाईन किंवा टीव्हीवरच पाहावे लागणार आहे. ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिकी जमिनीवरून मानवी अवकाश उड्डाणाचा मार्ग पुन्हा खुला होणार आहे. भविष्यातील अवकाश पर्यटनाचीही ही पहिली चाचणी मानली जात आहे.

प्रक्षेपण:

३० मे २०२०, १९:२२ (युनिव्हर्सल टाइम). भारतीय प्रमाणवेळेनुसार ३१ मे २०२०, पहाटे १२:५२या आधीचे २७ मे चे नियोजित उड्डाण खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आले होते.

प्रक्षेपण केंद्र:

केनेडी स्पेस सेंटर, लाँच कॉम्प्लेक्स ३९. याच लाँच पॅडवरून अपोलो ११ या पहिल्या मानवी चांद्रमोहिमेचे उड्डाण झाले होते.

सहभागी ॲस्ट्रोनॉट:

१) डग्लस गेराल्ड हर्ले: ५३ वर्षांचे हर्ले हे नासाच्या सध्या सक्रिय असणाऱ्या अनुभवी ॲस्ट्रोनॉटपैकी एक आहेत. एसटीएस १२७ आणि एसटीएस १३५ या दोन स्पेस शटल मोहिमांमध्ये त्यांचा पायलट म्हणून सहभाग होता. एसटीएस १३५ ही नासाच्या स्पेस शटल कार्यक्रमामधील शेवटची मोहीम होती. त्यांना अवकाशात एकूण ६८३ तास राहण्याचा अनुभव आहे. २०११ नंतर हर्ले यांनी नासाच्या व्यावसायिक मानवी अवकाश मोहिमांच्या विभागात काम केले असून, स्पेस एक्सच्या डेमो २ मोहिमेची जबाबदारी हर्ले यांच्या खांद्यावर असेल. या मोहिमेत ते स्पेसक्राफ्ट कमांडर आहेत.

 

२) रॉबर्ट लुईस बेंकन: ५० वर्षांच्या बेंकन यांना एसटीएस १२३ आणि एसटीएस १३० या दोन स्पेस शटल मोहिमांचा अनुभव आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी पीएचडी केली आहे. नासामध्ये येण्याआधी ते अमेरिकी हवाईदलात कार्यरत होते. अवकाशात एकूण ७०८ तास राहण्याचा त्यांना अनुभव असून, त्यांपैकी एकूण ३७ तास त्यांनी स्पेसवॉक केला आहे. नासाच्या ॲस्ट्रोनॉट ऑफिसचे प्रमुखपदही त्यांनी सांभाळले आहे. डेमो २ मोहिमेत त्यांच्यावर जॉईंट ऑपरेशन्स कमांडर ही जबाबदारी असेल.

रॉकेट:

फाल्कन ९ ब्लॉक ५: स्पेस एक्सच्या फाल्कन ९ या रॉकेटची क्षमतेनुसार आणि कामानुसार विविध रूपे विकसित करण्यात आली आहेत. त्यांपैकी ब्लॉक ५ हे सध्याचे सर्वाधिक क्षमतेचे रूप आहे. दोन स्तरांच्या या रॉकेटचा पहिला भाग उड्डाण सुरु असताना दुसऱ्या स्तरापासून विलग झाल्यावर पुन्हा जमिनीवर अलगद येऊन स्थिरावतो (रिकव्हरेबल). या रॉकेटमध्ये स्पेस एक्सच्या मर्लिन इंजिनांचा वापर करण्यात आला असून, त्यांमध्ये इंधन म्हणून द्रवरूप ऑक्सिजन आणि रॉकेटच्या दर्जाचे केरोसीन वापरण्यात येते. जमिनीलगतच्या कक्षेत तब्बल १५६०० किलो वजन वाहून नेण्याची क्षमता असून, भूस्थिर कक्षेकडे ५५०० किलो वजनाचा उपग्रह पाठवू शकते. या रॉकेटची आतापर्यंत २८ उड्डाणे झाली असून, सर्व उड्डाणे यशस्वी ठरली आहेत.

अवकाशकुपी:

ड्रॅगन २: स्पेस एक्सने विकसित केलेली ही अवकाशकुपी पुनर्वापर करता येण्यासारखी आहे. या अवकाशकुपीचे वापरानुसार दोन प्रकार आहेत. मानवी अवकाश मोहिमांसाठी क्रू ड्रॅगन तर साहित्याची ने आण करण्यासाठी कार्गो ड्रॅगन. मानवी मोहिमांमध्ये एका वेळेस सात जणांना वाहून नेण्याची क्रू ड्रॅगनची क्षमता आहे. या अवकाशकुपीचा वापर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये ॲस्ट्रोनॉटची ने आण करण्यासाठी आणि अवकाशप्रेमींना अवकाश पर्यटन करण्यासाठी केला जाणार आहे. क्रू ड्रॅगनमध्ये रॉकेटपासून विलग झाल्यावर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनशी जोडले जाणे, तसेच स्पेस स्टेशनपासून विलग होऊन जमिनीवर परतण्याची प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने होणार आहे. अर्थात आणीबाणीच्या प्रसंगी ॲस्ट्रोनॉट अवकाशकुपीची सूत्रे आपल्या हातातही घेऊ शकतात.

फाल्कन ९ रॉकेटच्या डोक्यावर बसवलेल्या क्रू ड्रॅगनला चार बाजूंना एकूण आठ शक्तिशाली इंजिन बसवण्यात आली आहेत. संकटसमयी अत्यंत वेगाने ही अवकाशकुपी रॉकेटपासून विलग होऊन ॲस्ट्रोनॉटना दूर सुरक्षित ठिकाणी उतरवू शकते. नव्या काळातील संगणक आणि अंतर्गत रचना हे या कुपीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. जुन्या अवकाश यानांमध्ये दिसणारा कंट्रोल्सचा पसारा क्रू ड्रॅगनमधून हटवण्यात आला असून, फक्त टचपॅडच्या साह्याने ॲस्ट्रोनॉट यानाचे नियंत्रण करू शकतात.  

असा असेल घटनाक्रम –

१) हर्ले आणि बेंकन या दोघा ॲस्ट्रोनॉटना ब्रेकफास्ट दिला जाईल. उड्डाणापूर्वीचे दोघांचेही मेडिकल चेकअप होईल.

२) उड्डाणाला चार तास राहिले असताना दोघे ॲस्ट्रोनॉट स्पेस एक्सने खास बनवलेला सफेद रंगाचा स्पेस सूट परिधान करतील आणि आपल्या कुटुंबीयांचा निरोप घेतील.

३) स्पेस एक्सने बनवलेल्या मॉडेल एक्स या इलेकट्रीक कारमधून दोघांना लाँच कॉम्प्लेक्स ३९ या ऐतिहासिक लाँचपॅडवर आणले जाईल.

४) २० मिनिटांच्या या प्रवासानंतर लिफ्टने दोघा ॲस्ट्रोनॉटना फाल्कन ९ रॉकेटच्या डोक्यावर बसवण्यात आलेल्या क्रू ड्रॅगन अवकाश कुपीमध्ये आणले जाईल.

५) जमिनीवरील कर्मचारी दोघा अवकाशवीरांना त्यांच्या खुर्च्यांमध्ये बांधतील आणि उड्डाणापूर्वीची शेवटची तयारी सुरु होईल.

६) उड्डाणाला दोन तास राहिले असताना अवकाशकुपीचा दरवाजा बंद होईल. संकटसमयी रॉकेटपासून विलग होण्याच्या यंत्रणेचे नियंत्रण ॲस्ट्रोनॉटकडे दिले जाईल.

७) उड्डाणाला ४५ मिनिटे राहिले असताना रॉकेटमध्ये इंधन भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.

८) हवामान अनुकूल असेल तर भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री १२:५२ ला फाल्कन ९ चे उड्डाण होईल.

९) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उड्डाण पाहण्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे

१०) उड्डाणानंतर २ मिनिटे ३३ सेकंदांनी रॉकेटच्या पहिल्या टप्प्याचा भाग दुसऱ्या टप्प्यापासून विलग होऊन पुन्हा जमिनीकडे येऊ लागेल. फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर तो अलगद उतरवला जाईल.

११) उड्डाणानंतर १२ मिनिटांनी क्रू ड्रॅगन अवकाशकुपी फाल्कन ९ रॉकेटच्या दुसऱ्या स्तरापासून विलग होईल.

१२) उड्डाणानंतर १९ तासांनी क्रू ड्रॅगन जमिनीपासून ४०० किलोमीटर उंचीवरून पृथ्वीभोवती फिरणाऱ्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला स्वयंचलित पद्धतीने जोडले जाईल. स्पेस स्टेशनमध्ये अमेरिकी ॲस्ट्रोनॉट क्रिस कॅसिडी, तसेच रशियन कॉस्मोनॉट अनातोली इव्हानिशीन आणि इव्हान व्हॅगनर हे आधीपासून राहत आहेत. हर्ले आणि बेंकन यांच्या आगमनानंतर आयएसएसमधील अवकाशवीरांची संख्या पाच होईल.

१३) ऑगस्टच्या सुरुवातीला क्रू ड्रॅगन जमिनीकडील प्रवास सुरू करेल. वातावरणाच्या खालच्या स्तरात आल्यावर अवकाशकुपीवरील मोठे पॅराशूट उघडतील. अवकाशकुपी अटलांटिक समुद्रात अलगद उतरेल.

——-

Please follow and like us:
Pin Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email