कंकणाकृती सूर्यग्रहणाविषयी सर्वकाही 

  • मयुरेश प्रभुणे

येत्या २६ डिसेंबरच्या सकाळी दक्षिण भारतातील काही भागांतून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूवरून जाणारा १६४ किलोमीटर रुंदीचा पट्टा सोडल्यास देशात इतरत्र हे ग्रहण खंडग्रास अवस्थेत दिसेल. या ग्रहणानंतर सहा महिन्यांनी, २१ जूनला उत्तर भारतातून आणखी एक कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी भारतातील आकाशप्रेमींना मिळेल. भारतीय आकाशनिरीक्षकांना अशी संधी एका दशकाच्या कालावधीनंतर मिळणार असून, येत्या दोन कंकणाकृती ग्रहणांनंतर थेट २१ मे २०३१ ला दक्षिण भारताच्या टोकावरून कंकणाकृती सूर्यग्रहण आणि २० मार्च २०३४ ला लडाखच्या काही भागांतून खग्रास सूर्यग्रहण दिसेल. म्हणूनच २६ डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण ग्रहणाच्या मुख्य पट्ट्यात जाऊन पाहण्याची संधी आकाशप्रेमींनी सोडू नये.

कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय?

सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्राची गोलाकार, गडद सावली पृथ्वीवर पडते. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आणि पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे ही सावली वेगाने जमिनीवरून प्रवास करते. पृथ्वीच्या ज्या भागांवरून ही सावली प्रवास करते, त्या भागांमध्ये खग्रास किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते. म्हणजे सूर्य अमावस्येच्या चंद्रामागे काही काळ लपलेला दिसून येतो. सर्वसाधारणपणे पृथ्वीवरून पाहताना चंद्र आणि सूर्याचा आकाशातील व्यास एकसारखाच म्हणजे अर्धा अंश असतो. मात्र, चंद्र पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेतून फिरताना काही वेळा त्याचे पृथ्वीपासून कमी, तर काही वेळा जास्त असते. त्यामुळे चंद्राच्या आकाशात दिसणाऱ्या व्यासामध्येही फरक पडतो. पृथ्वीसुद्धा सूर्याभोवती फिरताना सूर्यापासून कमी किंवा जास्त अंतरावर असते. त्यामुळे आकाशात सूर्याच्या दिसणाऱ्या व्यासातही फरक पडतो.

सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका प्रतलात, एका रेषेत असताना चंद्र पृथ्वीपासून जवळच्या अंतरावर असेल तर त्याचा आकार सूर्याच्या आकाराएवढा किंवा त्याच्या पेक्षा जास्त असतो. अशा वेळेस चंद्र सूर्याला आपल्यामागे काही काळ पूर्णपणे झाकतो. या घटनेला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. मात्र, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका प्रतलात, एका रेषेत असताना चंद्र पृथ्वीपासून दूर अंतरावर असेल तर चंद्राचा आकार सूर्यापेक्षा कमी राहतो. अशा वेळेस सूर्याच्या समोर येऊनही तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशा वेळेस चंद्र सूर्यासमोर आलेला असताना सूर्याचा काही भाग चंद्राच्या सर्व बाजूंनी झळाळताना दिसतो. तेजस्वी बांगडीसारख्या दिसणाऱ्या या घटनेला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. अमावस्येचा गोलाकार चंद्र त्याच्यापेक्षा आकाराने मोठ्या असणाऱ्या सूर्यासमोरून सरकतानाचे हे दृश्य काही मिनिटे दिसते. मात्र ते पाहण्यासाठी चंद्राच्या गडद सावलीच्या मार्गावर जावे लागते.

येत्या कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळेस पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील अंतर १४७१२८५२३ किलोमीटर राहणार असून, सूर्याचा व्यास ०.५४२ कोनीय अंश असेल. तर, पृथ्वी आणि चंद्रामधील अंतर ३८४२४१ किलोमीटर राहणार असून, चंद्राचा व्यास ०.५१८ कोनीय अंश ते ०. ५२६ कोनीय अंश असेल. भारतातून ग्रहणाच्या मध्यरेषेवरून पाहताना चंद्राने सूर्याला अधिकाधिक ९३ टक्के झाकलेले दिसून येईल. ग्रहणाच्या मध्य अवस्थेत सूर्याचा उर्वरित सात टक्के भाग गोलाकार तेजस्वी बांगडीसारखा दिसून येईल.

असा असेल २६ डिसेंबरचा घटनाक्रम –

सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था सर्वप्रथम सौदी अरेबियाच्या पूर्व भागात बघायला मिळेल. त्यानंतर चंद्राच्या सावलीचा पूर्व दिशेने प्रवास सुरु होईल. कतार, यूएई, ओमननंतर चंद्राची सावली अरबी समुद्र ओलांडून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दक्षिण कर्नाटक आणि उत्तर केरळच्या भागांत धडकेल. त्यानंतर उटी, कोईम्बतूर मार्गाने तामिळनाडूमधील करैकुडी, कोट्टाईपट्टीनमवरून पुढे सरकत बंगालच्या उपसागरावर प्रवेश करेल. त्यानंतर आग्नेय आशियाई देशांतील मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, उत्तर मारियाना बेटे आणि गुआमपर्यंत सावली जमिनीवर असेल. चंद्राची सावली सौदी अरेबिया ते गुआमपर्यंतचा १२,९०० किलोमीटरचा प्रवास फक्त तीन तास २० मिनिटांमध्ये पूर्ण करेल. गडद सावलीच्या मार्गावर भारतात विविध ठिकाणी साधारणपणे दोन मिनिटांपासून ते साडेतीन मिनिटांपर्यंत कंकणाकृती अवस्था पाहायला मिळेल. ग्रहणाचा मध्य सिंगापूरच्या नैऋत्येला होणार असून, तिथे कंकणाकृती अवस्था सर्वाधिक काळ म्हणजे तीन मिनिटे ४० सेकंदांसाठी बघायला मिळेल. कंकणाकृती ग्रहणाचा मुख्य पट्टा सोडून भारतासह आशिया खंडाच्या बहुतांश भागातून, तसेच ऑस्ट्रेलियाच्या मोठया भागातून सूर्यग्रहण खंडग्रास अवस्थेत दिसेल.

 

सूर्यग्रहण सुरक्षितपणे कसे पाहावे?

आपण कंकणाकृती ग्रहणाच्या पट्ट्यात असलो किंवा खंडग्रास ग्रहण दिसणाऱ्या भागात; सूर्यग्रहण पाहण्यासाठी कायम सुरक्षित पद्धतींचाच वापर करावा लागतो. सूर्याकडून येणाऱ्या प्रखर आणि अतिनील किरणांमुळे (अल्ट्रा व्हायोलेट) डोळ्यांना कायम स्वरूपी इजा पोहचू शकते. त्यामुळे सूर्याशी संबंधित आकाशात घडणारी कोणतीही घटना उघड्या डोळ्यांनी कधीच पाहू नये. कंकणाकृती अवस्थेत चंद्र पूर्णपणे सूर्य बिंबावर आला असताना आपल्याला सूर्यप्रकाश कमी झाल्याचे भासेल. मात्र, त्यावेळीही सूर्याकडून येणारे किरण डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. कंकणाकृती अवस्थेतही सूर्यग्रहण पाहण्यासाठी सुरक्षित पद्धतीचाच वापर करावा.

अप्रत्यक्ष पद्धती 

अप्रत्यक्ष पद्धतीने सूर्याचे निरीक्षण करताना सूर्याकडून येणारा प्रकाश थेट आपल्या डोळ्यात जात नाही. ‘पिनहोल कॅमेरा’ बनवणे अत्यंत सोपे असून त्यासाठी फक्त काळा कार्डशीट पेपर, फॉईल पेपर, ट्रेसिंग पेपर आणि फेविकॉल इतक्याच साधनांची आवश्यकता असते. काळ्या कार्डशीट पेपरच्या नळीच्या एका बाजूला फॉईल पेपर, तर दुसऱ्या बाजूला ट्रेसिंग पेपर लावला जातो. फॉईल पेपरला पाडलेल्या छोट्याशा छिद्रातून सूर्याचा प्रकाश दुसऱ्या बाजूकडील ट्रेसिंग पेपरवर पडतो. ट्रेसिंग पेपरवर पडलेली सूर्याची उलटी प्रतिमा असते. आपल्याकडे लहानसा टेलिस्कोप असल्यास टेलिस्कोपला कोणत्याही स्थितीत डोळा न लावता टेलिस्कोप सूर्याकडे रोखून धरावा. टेलिस्कोपच्या आयपीसमधून येणारा सूर्याचा प्रकाश आयपीसपासून थोडा दूर एका कागदावर घ्या. कागदावर सूर्याची प्रतिमा दिसून येईल. एका मध्यम आकाराच्या प्लास्टिकच्या चेंडूवर लहानसा आरसा चिकटवा. त्यावर काळ्या रंगाचा कागद चिकटवून त्या कागदाचा गोलाकार भाग असा कापून काढा, ज्याने आरशाचा फक्त गोलाकार भाग खुला राहील. सूर्याकडून येणाऱ्या प्रकाशाचे परावर्तन या चेंडूवर लावलेल्या आरश्याने दूर अंतरावर, मात्र सावली असेल अशा भिंतीवर घेतल्यास सूर्याची प्रतिमा दिसून येईल.

प्रत्यक्ष पद्धती 

बाजारात मिळणारे ‘सोलार एक्लिप्स गॉगल’ सूर्यग्रहण पाहण्यासाठी सर्वात सुरक्षित. आधी गॉगल डोळ्याला लावून मगच सूर्याकडे पाहावे आणि सूर्याकडून नजर हटवल्यावर मगच गॉगल डोळ्यावरून बाजूला करावा. ग्रहणाचा मध्य सुरु असेल तरी गॉगल लावूनच सूर्यग्रहण बघावे. ५० ते ६० रुपयांपर्यंत असे गॉगल बाजारात उपलब्ध आहेत.  गॉगलसाठी वापरण्यात येणारी सोलार फिल्म टेलिस्कोपला किंवा कॅमेराला लावण्यासाठीही उपलब्ध होते. टेलिस्कोपद्वारे ग्रहण प्रत्यक्ष बघायचे असेल किंवा कॅमेराने फोटो काढायचे असतील, तर बाजारात मिळणारे सोलार फिल्टर टेलिस्कोप किंवा कॅमेराच्या पुढे लावूनच निरीक्षण करावे. टेलिस्कोपसाठीचे सोलार फिल्टर साधारण १२००/- ते १५००/- रुपयांना उपलब्ध होतात.

विविध शहरांमध्ये २६ डिसेंबरचे सूर्यग्रहण कधी आणि कसे दिसेल?

कंकणाकृती अवस्था दिसेल अशी काही शहरे [ठिकाण, (भारतीय प्रमाण वेळ) सुरुवात, मध्य, शेवट, चंद्र सूर्याला अधिकाधिक किती टक्के ग्रासेल]
कन्नूर, केरळ ०८:०४:५३, ०९:२६:२०, ११:०५:३४, ९३.०९%
मेंगळुरु, कर्नाटक ०८:०४:२४, ०९:२५:१५, ११:०३:३६, ९३.०४%
कासारगोड, कर्नाटक ०८:०४:३२, ०९:२५:३३, ११:०४:१०, ९३.०६%

कोझिकोड, केरळ ०८:०५:१७, ०९:२७:११, ११:०७:०४, ९३.१३%
उटी, तामिळनाडू ०८:०५:५३, ०९:२८:४१, ११:०९:४३, ९३.१७%
कोईम्बतूर, तामिळनाडू ०८:०६:१०, ०९:२९:१७, ११:१०:४५, ९३.१९%
दिंडीगल, तामिळनाडू ०८:०७:०५, ०९:३१:१९, ११:१४:१५, ९३.२६%

तिरुचिरापल्ली , तामिळनाडू ०८:०७:३५, ०९:३२:३०, ११:१६:१६, ९३.२८%
करैकुडी, तामिळनाडू ०८:०७:५०, ०९:३२:५७, ११:१७:००, ९३.३०%

महाराष्ट्राच्या विविध शहरांतून दिसणारी खंडग्रास अवस्था [ठिकाण, (भारतीय प्रमाण वेळ) सुरुवात, मध्य, शेवट, चंद्र सूर्याला अधिकाधिक किती टक्के ग्रासेल]

पुणे ०८:०४:३२, ०९:२३:०७, १०:५७:४६, ७८.४९ %

मुंबई ०८:०४:०४, ०९:२१:४६, १०:५५:०७, ७८.४२ %

नागपूर ०८:१०:५८, ०९:३१:५०, ११:०८:४३, ६२.१२ %

नाशिक ०८:०५:१०, ०९:२३:०७, १०:५६:४१, ७४.०६ %

औरंगाबाद ०८:०६:२१, ०९:२५:२५, ११:००:२८, ७१.८४ %

अहमदनगर ०८:०५:२७, ०९:२४:२६, १०:५९:३२, ७५.२५ %

सातारा ०८:०४:२१, ०९:२३:२१, १०:५८:४१, ८०.८२ %

कोल्हापूर ०८:०४:१४, ०९:२३:४३, १०:५९:४९, ८३.५० %

सांगली ०८:०४:३०, ०९:२४:११, ११:००:३३, ८२.४६ %

सोलापूर ०८:०५:४८, ०९:२६:१५, ११:०३:२९, ७७.६५ %

लातूर ०८:०६:४१, ०९:२७:१८, ११:०४:३८, ७४.३० %

नांदेड ०८:०७:४५, ०९:२८:३५, ११:०६:००, ७०.८३ %

परभणी ०८:०७:१८, ०९:२७:४०, ११:०४:२९, ७१.३७ %

अकोला ०८:०८:२४, ०९:२८:०९, ११:०३:५२, ६६.६९ %

अमरावती ०८:०९:२०, ०९:२९:२७, ११:०५:३२, ६४.८३ %

यवतमाळ ०८:०९:२०, ०९:३०:०२, ११:०६:५९, ६५.८२ %

जळगाव ०८:०७:१४, ०९:२५:५३, ११:००:०९, ६८. २ %

धुळे ०८:०६:२९, ०९:२४:४०, १०:५८:२२, ६९.७१ %

रत्नागिरी ०८:०३:४१, ०९:२२:२१, १०:५७:२०, ८४.१७ %


कृपया नोंद घ्यावी: बाजारात कमी दर्जाचे आणि असुरक्षित सोलार गॉगल आले आहेत. ज्यामध्ये सोलार फिल्टर म्हणून साध्या ॲल्युमिनिअम फॉईलचा वापर करण्यात आला आहे. अशा फेक गॉगलमुळे डोळ्यांना इजा पोहचू शकते.

सूर्यग्रहणाच्या सुरक्षित आणि दर्जेदार गॉगलसाठी संपर्क: 

कुतूहल- संडे सायन्स स्कुल – ८३८००१५८९६, ८३८००१५८९८

ईमेल – contact.kutuhal@gmail.com

सूर्यग्रहणाविषयी शाळा – महाविद्यालयामध्ये वर्कशॉप किंवा व्याख्यान आयोजित करण्यासाठी संपर्क:

संशोधन – ९७३००३५०१०, ९९२२९२९१६५

Please follow and like us:
Pin Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email