कोरोना विषाणू आणि कोविड १९ आजाराबद्दल सविस्तर माहिती 

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जारी केलेली माहिती ‘संशोधन’कडून मराठीत.

कोरोना व्हायरस म्हणजे काय?

कोरोना व्हायरस हा विषाणूंचा एक प्रकार आहे. यामध्ये अनेक विषाणूंचा समावेश होतो. या विषाणूंचा संसर्ग प्राणी आणि माणसांना होतो. विविध प्रकारच्या कोरोना विषाणूंमुळे श्वसनसंस्थेशी संबंधित आजार होतात. अगदी नेहमीच्या सर्दी- खोकल्यापासून ते २०१२ मध्ये समोर आलेला मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (मेर्स), सिव्हीर ऍक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स) हे कोरोना व्हायरसमुळे उद्भवणारे आजार आहेत.

कोविड १९ म्हणजे काय?

चीनमध्ये शोध लागलेल्या आणि सध्या जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचे नामकरण कोविड १९ असे करण्यात आले आहे. डिसेंबर २०१९ मध्ये साथ सुरू होण्याआधी नवा कोरोना विषाणू आणि त्यासंबंधीच्या साथीची कोणतीही नोंद नव्हती.

कोविड १९ ची लक्षणे कोणती?

या आजाराची प्रमुख आणि सर्वसाधारण लक्षणे म्हणजे ताप, थकवा आणि कोरडा खोकला. काही रुग्णांमध्ये अंगावर चट्टे उठणे, अंगदुखी, नाक चोंदणे, वाहते नाक, घसा खवखवणे, अतिसार आदी लक्षणेही दिसून येतात. या लक्षणांची तीव्रता एकाएकी वाढत नाही. काही रुग्णांना विषाणूचा संसर्ग होऊनही लक्षणे दिसून येत नाहीत आणि त्यांना आजारी असल्याचे जाणवतही नाही. संसर्ग झालेले सुमारे ८० टक्के लोक या आजारातून कोणत्याही उपचारांशिवाय पूर्ण बरे होतात. संसर्ग झालेल्या सहा जणांपैकी एकाला श्वसनसंस्थेसंबंधी गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. वयस्कर माणसे, उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह असणाऱ्या रुग्णांना या संसर्गामुळे गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते. ताप, खोकला आणि श्वास घेणे अवघड जात असल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवावे.

कोविड १९ कसा पसरतो?

कोविड १९ हा आजार नव्या कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून इतरांमध्ये पसरतो. कोविड १९ आजार झालेल्या व्यक्तीच्या नाक आणि तोंडातून उडणारे विषाणूयुक्त शिंतोडे (खोकणे, शिंकणे आदी क्रियांमधून) कोणत्याही वस्तूवर, पृष्ठभागावर पडले, त्या पृष्ठभागाला कोणा व्यक्तीचा स्पर्श झाला आणि तोच हात जर त्या व्यक्तीने आपल्या नाका – तोंडाला लावला तर त्या व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. संसर्गित व्यक्तीच्या खोकण्या – शिंकण्यातून हवेत उडणारे विषाणूयुक्त सूक्ष्म शिंतोडे थेट समोरच्या व्यक्तीच्या श्वसनावाटे तिच्या शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे आजारी व्यक्तीपासून किमान एक मीटर अंतर दूरच राहावे. नव्या कोरोना विषाणूचा प्रसार आणखी कशा प्रकारे होतो यावर अद्याप संशोधन सुरू आहे.

संसर्ग होऊनही लक्षणे दिसत नसलेल्या व्यक्तीकडून इतरांना कोविड १९ चा संसर्ग होऊ शकतो का?

तशी शक्यता कमी असली तरी नाकारता येत नाही असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. संसर्गित व्यक्तीच्या श्वासनलिकेतील द्रवामध्ये विषाणू असून, त्या द्रवाच्या तुषारांमधून इतरांपर्यंत विषाणूचा प्रसार होतो. लक्षणे दिसत नसली तरी विषाणूच्या प्रसाराची शक्यता किती याबाबत अद्याप संशोधन सुरू आहे.

संसर्गित व्यक्तीच्या मल- मूत्रावाटे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो का?

काही मोजक्या उदाहरणांमध्ये शास्त्रज्ञांना रुग्णांच्या विष्ठेमध्ये नव्या कोरोना विषाणूचे अस्तित्व दिसून आले आहे. मात्र, सध्याच्या आजाराचा प्रसार प्रामुख्याने श्वासनलिकेशी संबंधित आहे.

नवा कोरोना विषाणू आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या कोविड १९ आजारापासून मी स्वतःचे रक्षण कसे करू?   

  1. नव्या कोरोना विषाणूचा प्रसार जगभरात आणि आपल्या देशात, राज्यात कोठे झाला आहे याची माहिती घेऊन त्या ठिकाणी जाणे टाळावे.
  2. सातत्याने आणि खसखसून हात धुवावेत. हात धुताना साबण किंवा अल्कोहोलचा समावेश असणाऱ्या सॅनिटायझरचा वापर करावा. त्यामुळे हातावरील विषाणू मरू शकतात.
  3. खोकणाऱ्या, शिंकणाऱ्या व्यक्तीपासून किमान एक मीटर अंतर राखावे. समजा समोरील व्यक्ती कोरोना विषाणूने संसर्गित असेल, तर त्याच्या नाका- तोंडातून उडणारे तुषार आपल्या शरीरापर्यंत पोहचू नये याची खबरदारी घ्यायला हवी.
  4. नाक, तोंड आणि डोळ्यांना स्पर्श टाळावा. चुकून आपल्या हातावर कोरोना विषाणू चिकटला असल्यास नाक, तोंड आणि डोळ्यांवाटे तो शरीरात प्रवेश करू शकतो.
  5. शिंकताना, खोकताना तोंडासमोर रुमाल धरावा आणि आपल्या सोबतचे इतरही सर्वजण तसे करतील याची खबरदारी घ्यावी.
  6. ताप, खोकला, श्वास घेण्यास अडचण वाटत असल्यास घराबाहेर पडू नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राला त्याबाबत माहिती द्यावी. प्रशासनाच्या वतीने आपल्या आरोग्याची काळजी घेतली जाईलच. पण समजा कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर तो इतरांपर्यंत पसरणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल.

परदेश प्रवास सुरु असणाऱ्यांनी किंवा नुकत्याच प्रवासातून परत आलेल्यांनी कोणती काळजी घ्यावी?

परदेश प्रवासातून परत आलेल्या सर्वांनीच काही दिवस स्वतःला इतरांपासून विलग करून ठेवावे. या दरम्यान सौम्य ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे दिसून आल्यास तातडीने आरोग्य यंत्रणेला माहिती द्यावी. परदेश प्रवासात सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे दिसून आल्यास आपल्या टूर ऑपरेटरला त्याबाबत माहिती द्यावी. आपण असाल, त्या देशात आपल्याला वेळेत, योग्य ते उपचार मिळू शकतील.

मला कोविड १९ आजार होण्याची शक्यता किती ?

आपण नेमके कोठे आहात यावर कोविड १९ चा संसर्ग होऊ शकतो की नाही ते प्रामुख्याने अवलंबून आहे. ज्या प्रदेशांमध्ये साथ सुरू आहे त्या भागात आपण जाणार असाल तर आपल्याला या आजाराचा धोका असू शकतो. साथीचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. चीनमध्ये या आजाराचा प्रसार जवळ- जवळ थांबला आहे. मात्र, जगात इतरत्र साथी सुरू झाल्या आहेत. साथीचा प्रसार रोखण्याचा सर्वात प्रभावी उपाय गर्दी टाळणे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे विषाणू जाण्यापासून रोखला तर साथ पसरत नाही. कोविड १९ ची साथ संपेपर्यंत गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

कोविड १९ बाबत काळजी करण्यासारखी स्थिती आहे का?

लहान मुले, तरुण यांना या आजाराचा विशेष धोका नाही. सध्या संसर्ग झालेल्या पाचपैकी एका व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयाची मदत घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे. साथ पसरू नये यासाठी विषाणूला पसरू न देणे आपल्या सर्वांच्याच हातात आहे. सातत्याने हात धुणे, खोकताना, शिंकताना तोंडासमोर रूमाल धरणे आणि आजारी व्यक्तीबाबत आरोग्य यंत्रणेला वेळेत माहिती देणे या गोष्टी करून आपण सर्वच जण ही साथ रोखू शकतो.

कोविड १९ मुळे कोणाच्या आरोग्याला सर्वाधिक धोका आहे?

कोविड आजाराबद्दल अद्याप पूर्णपणे संशोधन झालेले नाही. मात्र, वयस्कर व्यक्ती, गंभीर आजाराची (उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर आदी) पार्श्वभूमी असणारी व्यक्ती यांना कोविड १९ मुळे श्वासनलिकेशी संबंधित गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

अँटिबायोटिक (प्रतिजैविके) कोविड १९ वरील उपचारांसाठी प्रभावी आहेत का?

नाही. कोविड १९ हा आजार नव्या कोरोना विषाणूमुळे होतो. अँटीबायोटिक हे जिवाणूच्या (बॅक्टेरिया) संसर्गासाठी वापरण्यात येते. त्यामुळे अँटिबायोटिक या आजारासाठी प्रभावी ठरत नाही. संसर्ग झाल्यावर अँटिबायोटिकचा उपयोग डॉक्टरच्या सल्ल्यानेच करावा.

कोविड १९ वर कोणती औषधे, लस किंवा उपचार उपलब्ध आहेत का?

हा नवा आजार असल्यामुळे अद्याप त्यावर कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यावर जगात अनेक ठिकाणी संशोधन सुरु आहे. काही लशींच्या चाचण्याही सुरू आहेत. संसर्ग झाल्यावर दिसणाऱ्या लक्षणांवर उपाय केले जातात. संसर्गाच्या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या यंत्रणा रुग्णालयात आहेत. मात्र, कोविड १९ हा आजार बरा करणारे औषध सध्या उपलब्ध नाही. हा आजार होऊ न देणे हाच त्यावर सध्या योग्य उपाय आहे.

कोविड १९ आणि सार्स या दोघांचा विषाणू एकच आहे का?

नाही. कोविड १९ साठी कारणीभूत ठरणारा विषाणू आणि २००३ मध्ये आलेल्या सार्स या आजाराचा विषाणू हे एकमेकांशी जनुकीय नाते सांगत असले तरी ते एक नाहीत. या दोन्ही आजारांची वैशिष्ट्येही वेगवेगळी आहेत. सार्स हा आजार अधिक गंभीर आणि घातक होता. मात्र, त्याचा प्रसार अधिक नव्हता. कोविड हा आजार तुलनेने कमी घातक आहे. मात्र, त्याचा प्रसार वेगाने होत आहे. सार्सचे रूग्ण २००३ नंतर आढळून आलेले नाहीत.

कोविड १९ पासून संरक्षणासाठी मी मास्क वापरावा का?

निरोगी असाल, तर मास्कची आवश्यकता नाही. तुमच्यामध्ये कोविड १९ची लक्षणे (ताप, सर्दी, खोकला) दिसत असल्यास मास्क वापरावा. तोही आपल्याकडून इतरांमध्ये आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी. विनाकारण मास्क वापरल्यास, ज्यांना मास्कची खरंच आवश्यकता आहे, त्यांना त्याची कमतरता भासू शकते. सतत हात धुणे, नाका – तोंडाला, डोळ्यांना हात न लावणे, खोकताना, शिंकताना नाका – तोंडासमोर रूमाल धरणे आणि कोणी खोकत, शिंकत असल्यास त्यांच्यापासून किमान एक मीटर अंतर राखणे एवढे या रोगापासून बचाव करण्यास पुरेसे आहे.

कोविड १९ ची लक्षणे दिसण्यासाठी किती कालावधी लागतो?

आपल्या शरीरात विषाणूने प्रवेश केल्यापासून आपल्याला कोविड १९ आजाराची लक्षणे दिसण्यापर्यंतच्या कालावधीला इन्क्युबेशन पिरियड म्हणतात. सर्वसाधारणपणे हा कालावधी एक ते १४ दिवस इतका आहे. बहुतांश केसेस मध्ये हा कालावधी पाच दिवसांचा आहे.

कोविड १९ हा आजार प्राण्यांपासून माणसामध्ये आला आहे का?

कोरोना प्रकारातले विषाणू हे सर्वसाधारणपणे प्राण्यांमध्ये आढळून येतात. हा विषाणू जसा माणसाकडून माणसाकडे प्रसारीत होतो, तसा तो प्राण्याकडून माणसाकडेही प्रसारीत होऊ शकतो. सार्स या आजारामागील कोरोना विषाणू सिवेट कॅट या मार्जार कुळातील प्राण्यापासून माणसामध्ये आला होता. तसेच, मेर्स आजाराला कारणीभूत कोरोना विषाणू उंटांपासून माणसामध्ये आला होता. कोविड १९ या आजाराला कारणीभूत असणारा कोरोना विषाणू नेमका कोणत्या प्राण्यापासून माणसात आला याचा शोध अद्याप लागलेला नाही.

मला माझ्या पाळीव प्राण्यांपासून कोविड १९ आजार होऊ शकतो का?

नाही. पाळीव प्राण्यांना हा आजार झाल्याचे आणि त्यांच्यापासून हा आजार माणसात आल्याचे कोणतेही उदाहरण नाही.

कोरोना विषाणू कोणत्याही पृष्ठभागावर किती काळ जिवंत राहू शकतो?

कोविड १९ साठी कारणीभूत ठरणारा नवा कोरोना विषाणू कोणत्याही पृष्ठभागावर किती काळ तग धरून राहू शकतो या बाबत अद्याप नेमके निष्कर्ष उपलब्ध नाहीत. मात्र, तो इतर कोरोना विषाणूंसारखाच बाह्यपृष्ठभागांवर राहत असावा असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. त्या पृष्ठभागाचे स्वरूप कसे आहे(खडबडीत/ चकचकीत), तेव्हाचे तापमान, आर्द्रता आदी बाबींनुसार तो एखाद्या पृष्ठभागावर काही तासांपासून काही दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो. आपला हात लागेल असे पृष्ठभाग/ वस्तू सॅनिटायझरने पुसून घेऊन ते निर्जंतुक करावेत.

कोविड १९ ची साथ असणाऱ्या भागातून येणाऱ्या वस्तू खरेदी कराव्यात का?

कोविड १९ ने आजारी असणाऱ्या व्यक्तीकडूनच वस्तू हाताळली जाऊन ती आपल्यापर्यंत येणे ही अत्यंत दुर्मिळ शक्यता आहे. अनेक ठिकाणांहून, विविध तापमान, स्थितीमधून आलेल्या वस्तूवर विषाणू टिकून राहून त्यापासून आपल्याला संसर्ग होणे याची शक्यताही कमी आहे.

कोविड १९ ची साथ सुरू असताना मी काय करणे टाळावे ?

खालील बाबींमुळे कोविड १९ हा आजार होणार नाही असे नाही. मात्र, त्याचे परिणाम बरेच कमी करता येऊ शकतात.

धूम्रपान करणे टाळावे

एकावर एक लावलेले मास्क टाळावेत

अँटिबायोटिक घेणे टाळावे

ताप, सर्दी, खोकला असल्यास डॉक्टरकडे जावे. कोविडची १९ची तीव्र लक्षणे दिसत असल्यास आपल्या किंवा जवळच्या व्यक्तीच्या नुकत्याच झालेल्या प्रवासाची माहिती आरोग्य यंत्रणेला द्यावी.

—————-

Please follow and like us:
Pin Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email