‘प्रथिनांचे कोडे उलगडणे आवश्यक’ – डॉ. उदगावकर
संशोधन रिपोर्ट, ३ ऑक्टोबर २०१८

डॉ. उदगावकर यांच्या संशोधनाचा मुख्य विषय प्रोटीन फोल्डिंग असून, त्याच्या अभ्यासासाठी त्यांनी विकसित केलेल्या तंत्राला देशा- विदेशातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आपल्या व्याख्यानात डॉ. उदगावकर यांनी प्रोटीन फोल्डिंगचे विज्ञान आणि त्याच्या अभ्यासातून भविष्यात होणाऱ्या व्यावहारीक उपयोगांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. डॉ. उदगावकर म्हणाले, ”सजीवांच्या शरीरात अॅमिनो अॅसिड या मुख्य घटकापासून प्रोटीनच्या शृंखला तयार होताना रासायनिक आणि भौतिक प्रक्रियांमुळे त्यांना वळ्या पडतात. या त्रिमितीय वळ्या पडलेल्या शृंखलेतून निर्माण होणारा प्रोटीन जैविकदृष्ट्या सक्रिय असतो. अॅमिनो अॅसिडच्या क्रमवारीत अंतर्गत किंवा बाह्य कारणांमुळे एकाएकी बदल झाल्यास प्रोटीन फोल्डिंगमध्ये बिघाड होऊ शकतो. प्रोटीन फोल्डिंगमधील बिघाड पुढे अनेक रोगांना कारणीभूत ठरतो. प्रोटीन फोल्डिंगची प्रक्रिया नेमकी कशी घडते याचे विज्ञान उलगडले तर अल्झायमर, पार्किंसन, हनटिंग्टन, बोवाइन स्पॉंगिफोर्म एन्सेफलोपॅथी (मॅडकाऊ) यांसारख्या गंभीर आजारांवर उपचार करणे शक्य होऊ शकते.”
“प्रथिनांची अनफोल्डेड (उघडलेली) स्थिती हि अत्यंत विषम असते. तसेच, प्रोटीन फोल्डिंगच्या प्रक्रियेची सुरुवात कशी होते याची नेमकी माहिती अद्याप शास्त्रज्ञांना मिळलेली नाही. प्रोटीन फोल्डिंगच्या प्रक्रियेचा वेग अफाट असून, त्या वेगाशी सुसंगत निरीक्षण करून त्यांची रचना निश्चित करणे शास्त्रज्ञांसाठी अत्यंत आव्हानात्मक आहे. प्रोटीन फोल्डिंगची प्रक्रिया नेमकेपणाने समोर आल्यास अनेक आजारांवर वेळेत उपचार करणे शक्य होऊ शकेल,” असेही ते म्हणाले. कार्यक्रमात डॉ. उदगावकर यांच्या हस्ते सारिका सासवडे, विश्वास कुलकर्णी, संदीप कृष्णा जाधव, विनायक देवकर आदींचा सत्कार करण्यात आला. एनसीएलचे संचालक डॉ. अश्विन कुमार नांगिया यांनी स्वागत केले.
————————-