श्वसनसंस्था नसलेल्या प्राण्याचा शोध

सायली सारोळकर, २६ फेब्रुवारी २०२०

सर्व बहुपेशीय प्राण्यांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते, हे आपल्याला शाळेतच शिकवले जाते, परंतु, श्वसनसंस्था नसलेल्या एका प्राण्याचा नुकताच शोध शास्त्रज्ञांना लागला आहे. ‘प्रोसिडींग्स ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’ या जर्नलमध्ये याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. नव्या संशोधनानुसार श्वासोच्छ्वासासाठी आवश्यक असलेली जनुकीय रचनाच नसलेला प्राणी प्रथमच नोंदला जात आहे. ‘हेनेगुया सालमिनिकोला’ (Heneguya salminicola) असं या प्राण्याचं नाव आहे.

‘सालमन’ माशाच्या मांसावर जगणारा हा एक परोपजीवी प्राणी आहे. इस्राईलमधील शास्त्रज्ञ डोरोथी हुचन यांनी हा शोध लावला आहे. वनस्पती आणि प्राण्यांना ऊर्जेसाठी इंधनाची गरज असते. ऍडीनोसीन ट्रायफॉस्फेटच्या (एटीपी) माध्यमातून ती ऊर्जा शरीराला मिळत असते. पेशींमधील ‘मायटोकाँड्रीया’ या भागात एटीपी तयार होतो. परंतु, या प्राण्यामध्ये ‘मायटोकाँड्रीया’ तयार होण्यासाठी आवश्यक असलेली जनुकीय रचनाच नसल्याचे जनुकीय विश्लेषणातुन समोर आले आहे. त्यामुळेच त्याला ऑक्सिजनची आवश्यकता भासत नाही.

सुरुवातीच्या काळात या प्राण्यामध्ये श्वसनसंस्था अस्तित्वात असावी, आणि उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये ती नष्ट झाली असावी असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. परंतु श्वसनसंस्था नसेल तर या प्राण्याला ऊर्जा कुठून मिळते, असा प्रश्न सध्या शास्त्रज्ञांना पडला आहे. ‘हेनेगुया’शी साधर्म्य असणारे, त्याचे पूर्वज असू शकतील अशा इतर कोणत्याही प्राण्यामध्ये अद्याप अशा प्रकारची रचना दिसून आलेली नाही. इतर काही परोपजीवी जसे त्यांच्या यजमान प्राण्यावर जगतात तसे यालादेखील त्याच्या यजमान प्राण्यापासून ऊर्जा मिळत असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. अर्थात, पुढील अभ्यासाने भविष्यात याबद्दल आणखी माहिती मिळू शकेल.’हेनेगुया सालमिनिकोला’चे जनुकीय विश्लेषण सुरू असून त्याबद्दल इतक्यात अधिक काही सांगता येणार नसल्याचे डोरोथी यांचे म्हणणे आहे.

Please follow and like us:
Pin Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email