सात ग्रहांच्या 'पृथ्वीमालेचा' शोध

ट्रॅपिस्ट-१ ताऱ्याभोवती जीवसृष्टीची शक्यता ; नासाची पत्रकार परिषदेत घोषणा

संशोधन रिपोर्ट; २३ फेब्रुवारी २०१७
e9a47e1a6015ea5baa6db1492cf0e4e6
आकाशात एक असा तारा आहे, ज्याच्या भोवती एक – दोन नव्हे तर चक्क सात पृथ्वीसदृश ग्रह फिरत आहेत. आश्चर्यकारक वाटणारा हा शोध बुधवारी (२२ फेब्रुवारी २०१७) नासाने जाहीर केला. ‘ही ‘पृथ्वीमाला’ आपल्यापासून ३९ प्रकाशवर्षे दूर असून, सूर्यापेक्षा अतिशय लहान, थंड आणि तरुण ताऱ्याभोवती हे सात ग्रह फिरत आहेत,’ असे नासाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाने बुधवारी जाहीर केले. ट्रॅपिस्ट आणि नासाच्या स्पिट्झर स्पेस टेलिस्कोपच्या साह्याने केलेल्या निरीक्षणांवरून हा शोध लावण्यात आला आहे.
कुंभ राशीतील ट्रॅपिस्ट-१ या ‘अल्ट्राकूल डवार्फ’ (कमी तापमानाचा खुजा/ बटू ) ताऱ्याभोवती सात पृथ्वीसदृश (जमीन असणारे) ग्रह अतिशय जवळून फिरत आहेत. त्यातील पहिल्या तीन ग्रहांवर पुरेसे उबदार वातावरण असून, त्या ग्रहांवर जीवसृष्टीसाठी पोषक वातावरण असल्याचे या शोधतील प्रमुख शास्त्रज्ञ प्रा. मायकेल गिलॉन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रा. गिलॉन यांच्या टीमच्या शोधाचे निष्कर्ष नुकतेच नेचर या प्रख्यात नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. ट्रॅपिस्ट-१ या ताऱ्याभोवती सापडलेल्या ग्रहांचे ट्रॅपिस्ट-१ – बी, सी, डी, इ, एफ, जी आणि एच असे नामकरण करण्यात आले आहे. आपल्या सूर्यमालेशी तुलना करता शुक्र ते मंगळ या भागातील तापमान जीवनासाठी पोषक असे मानले, तर ट्रॅपिस्ट-१ भोवती फिरणाऱ्या पहिल्या तीन ग्रहांवर अशाच प्रकारचे उबदार वातावरण असण्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
screenshot_2017-02-22-23-41-52
मात्र, आपल्या सूर्याशी तुलना केली, तर ट्रॅपिस्ट-१ हा तारा अतिशय वेगळा असल्याचे दिसून येते. फक्त ५० कोटी वर्षे (सूर्याचे वय सुमारे सहा अब्ज वर्षे) वय असणाऱ्या या ताऱ्याचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या तुलनेत फक्त आठ टक्के असून, त्याची त्रिज्या आपल्या सूर्याच्या केवळ ११ टक्के आहे. तसेच त्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे दोन हजार अंश सेल्सिअस आहे. असे असूनही, त्याच्या भोवती फिरणाऱ्या ग्रहांवर उबदार वातावरण असल्याचे कारण, हे सातही ग्रह त्या ताऱ्याच्या अगदी जवळून (आपल्या सूर्यमालेशी तुलना केल्यास- सूर्य ते बुध या अंतरापेक्षाही कमी अंतरावरून) फिरत आहेत. ट्रॅपिस्ट-१ बी हा ग्रह ताऱ्याभोवती फक्त दीड दिवसात एक फेरी पूर्ण करतो, तर सी या ग्रहाचे एक वर्ष पृथ्वीच्या फक्त अडीच दिवसांचे आहे. सर्वात दूर असणारा एच हा ग्रह सुमारे २० दिवसांत ट्रॅपिस्ट-१ या ताऱ्याभोवती एक फेरी पूर्ण करतो. ट्रॅपिस्ट-१ या ताऱ्याभोवती सापडलेल्या सर्व ग्रहांचे वस्तुमान जवळपास पृथ्वीइतकेच असल्याचे दिसून आले आहे.
screenshot_2017-02-22-23-42-06
पहिल्या तीन ग्रहांवर जीवसृष्टीसाठी पोषक वातावरण असण्याची दाट शक्यता असून, सध्या त्या ठिकाणी जीवसृष्टी नसल्यास भविष्यात मात्र, ती नक्की आकाराला येईल असे प्रा. गिलॉन यांनी सांगितले. हा सुपरकूल डवार्फ तारा अतिशय संथपणे हायड्रोजनचे ज्वलन करत असून, त्याचे आयुष्य आणखी तब्बल दहा हजार अब्ज वर्षे असणार आहे. त्यामुळे या ग्रहांवर कधीना कधी नक्की सजीव अवतरतील असे प्रा. गिलॉन यांचे म्हणणे आहे. ट्रॅपिस्ट-१ पासूनच्या पहिल्या दोन ग्रहांचा एक भाग कायम ताऱ्याकडे तोंड करून असल्यामुळे तेथील तापमान जास्त असण्याची शक्यता आहे. मात्र, त्या ग्रहांच्या अंधाऱ्या भागात (ताऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील) वातावरणातून तप्त हवा पसरली जाऊन त्या भागात जीवसृष्टीसाठी पोषक असे उबदार हवामान असू शकेल. पुढील वर्षी अवकाशात प्रक्षेपित होणाऱ्या जेम्स वेब टेलिस्कोपच्या साह्याने या ग्रहांच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे नासाच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
screenshot_2017-02-22-23-39-56
या ग्रहांचा शोध ट्रांझिटिंग प्लॅनेट्स अँड प्लॅनेटेझिमल्स स्मॉल टेलिस्कोपद्वारे (ट्रॅपिस्ट) लावण्यात आल्यामुळे ताऱ्याचे नाव ट्रॅपिस्ट-१ असे ठेवण्यात आले. हा तारा २०१० मध्ये सापडला असून गेल्यावर्षी त्याच्याभोवती फिरणाऱ्या तीन ग्रहांचा शोध शास्त्रज्ञांना लागला होता. सात ग्रह ताऱ्याभोवती फिरताना होणाऱ्या ग्रहणातून (अधिक्रमणातून) ताऱ्याचा प्रकाश कमी- अधिक होतो. ताऱ्याच्या प्रकाशामधील चढ- उतारांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी ग्रहांची ताऱ्याभोवतीची कक्षा, त्यांचे वस्तुमान, त्यांची घनता निश्चित केली. यातूनच ते ग्रह पृथ्वीसदृश आहेत हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. खगोलशास्त्रज्ञांना १९९२ पासून आतापर्यंत ३५०० हून अधिक बाह्य ग्रहांचा शोध लागलेला आहे. आपल्या आकाशगंगेत असे लाखो ग्रह असल्याचा शास्त्रज्ञांचा कयास आहे.
—-
Please follow and like us:
Pin Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email