डॉ. प्राजक्ता नाईक
एखादा सामान्य दिवस आठवा, असं म्हंटलं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचा दिवस डोळ्यांसमोरून सरकतो. या मध्ये दिवसभरात, आपल्याला अनेक सुगंध, किंवा दुर्गंध नकळतपणे भेटत असतात. अनेकदा हे सुगंध आपल्या मनात इतके भिनलेले असतात की, आपण त्याचा विचार देखील करत नाही. जसे की, उठल्याबरोबर दात घासताना वापरली जाणारी टूथपेस्ट, अंघोळीसाठी लागणारा साबण, हात धुताना वापरलेला हँड वॉश, तेल, फोडणी देताना येणारा सुवास, विविध परफ्युम अशी अनेक उदाहरणे देता येतील. हे सगळे सुगंध आपण गृहीत धरलेले असतात. म्हणजे काय, तर कोणता सुगंध कशामुळे येतो याचा आपण विचार देखील करत नाही. या लेखात आपण जाणून घेऊयात सुगंधी द्रव्यांबद्दल.
अनेक वर्षे संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञांनी या सुगंधी द्रव्यांची रासायनिक रचना तयार केलेली असते. प्रामुख्याने सुगंधी संयुगे (aromatic compounds) हे यात मुख्य घटक असतात. बेन्झीन हे रसायन बहुतांश सुगंधी संयुगांचा पाया आहे. त्याच बरोबर इस्टर, अल्कोहोल हे देखील सुगंधांसाठी कारणीभूत असू शकतात. सुगंधी द्रव्यांची बाजारपेठही मोठी आहे.
तप्त उन्हापासून काहीसा दिलासा देणारा पाऊस नुकताच पडून गेला. पाऊस म्हंटलं की, जवळ जवळ सर्वांनाच भिजलेल्या मातीचा हवाहवासा वाटणारा सुवास आठवतो. हा सुगंध का आणि कशामुळे येतो याचा विचार अनेक वेळा मनात आला असेल. त्या गूढ सुगंधाला ‘पेट्रीकोर’ असे म्हणतात. आणि त्यातील एक मुख्य घटक म्हणजे, ‘जिओस्मिन’ नावाचे सेंद्रिय संयुग. जे ओलसर मातीभोवती रेंगाळते. जिओस्मिन हा प्राचीन ग्रीक “जिओ” मधून आला आहे, म्हणजे पृथ्वी आणि “ओस्मे”, म्हणजे वास. आपण जे बीट रूट खातो, त्यात देखील जिओस्मिन हा एक प्रमुख घटक आहे ज्यामुळे बीट रूटला मातीसारखी चव येते.
आता आपण स्वयंपाकघराकडे वळलोच आहोत, तर फोडणी देताना येणारा सुगंध कशामुळे येतो हे पाहुयात. फोडणी देताना आपण तेलामध्ये मोहरी घालून ती तडतडल्यावर त्यात हिंग घालतो. मोहरीचे तडतडणे हे तेलाचे तापमान योग्य झाल्याचे प्रमाण असते. या अशा योग्य तापमान असलेल्या तेलात आपण जेव्हा हिंग किंवा इतर मसाले घालतो, तेव्हा त्यातील रासायनिक घटक हे तेलात शोषले जाऊन एक विशिष्ट सुगंध आणि चव पदार्थाला येते. म्हणूनच फोडणीची पद्धत बदलली की, त्यात घडणाऱ्या रासायनिक प्रक्रियेत बदल होऊन प्रत्येक पदार्थ हा वेगळ्या वासाचा आणि चवीचा होऊ शकतो.
जेवताना, अनेक लोक पदार्थाच्या वासावरून ठरवतात की, पदार्थ आपल्याला आवडू शकेल की नाही. याच कारणामुळे हॉटेल व्यवसायात पदार्थाच्या सुगंधी घटकाचा स्वतंत्रपणे आणि ग्राहकांच्या दृष्टीने विचार केला जातो. घरगुती वापराच्या अनेक गोष्टी आपण केवळ सुगंधावरून ओळखू शकतो. जसे की, टाल्कम पावडर. लहान मुलांसाठी गेली अनेक वर्षे जॉन्सन कंपनीची पावडर वापरली जाते. त्यांनी त्यात वापरला जाणारा सुगंध हा अतिशय गोपनीय ठेवला होता. सुगंधांवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी अनेक वर्षे त्यावर काम करून हा सुगंध गुलाब आणि व्हॅनिलामधील गंध एकत्र करून मिळवला जातो, असे शोधून काढले.
असाच एक ओळखीचा गंध म्हणजे नेल पॉलिशचा किंवा रंगांचा. यात प्रामुख्याने टॉलुईन (Toluene) हे रसायन वापरण्यात येते, ज्यामुळे तो विशिष्ट वास आपल्याला येतो. देवघरात चंदन उगाळल्यावर येणारा असाच एक मंद सुवास. चंदनाच्या खोडातुन स्टीम डिस्टिलेशन प्रक्रियेद्वारे मिळणारे घटक α-santalol आणि β-santalol हे प्रामुख्याने या सुगंधासाठी कारणीभूत आहेत. याच्याशी साधर्म्य असणारे सुगंध प्रयोगशाळेत निर्माण करण्यावर आता भर दिला जातो कारण नैसर्गिक सुगंध हा अतिशय महाग आहे आणि दुर्मिळही होत आहे. α-santalol आणि β-santalol हेच घटक प्रयोगशाळेत निर्माण करणे हा एक स्वाभाविक पर्याय असला, तरीही ते बनवण्यासाठी लागणारी क्लिष्ट पद्धती आणि मिळणारे कमी उत्पन्न, यामुळे ती वापरू शकत नाही.
जगातील सर्वांत आवडता गंध कोणता याचा जर शोध घेतला, तर व्हॅनिला असे दिसून येते. व्हॅनिलीन हे संयुग फिनॉलिक आल्डिहाइड (phenolic aldehyde) या प्रकारात येते. व्हॅनिलीन हे व्हॅनिला सुगंधामधील मुख्य घटक आहे. वेगवेगळ्या अन्न पदार्थांमध्ये प्रामुख्याने कृत्रिमरित्या तयार केलेले व्हॅनिलीन वापरले जाते. याचे कारण पुन्हा एकदा हेच आहे की, नैसर्गिक पद्धतीने व्हॅनिलीन मिळवणे ही प्रक्रिया खूप वेळखाऊ आणि खर्चिक आहे. या प्रक्रियेत व्हॅनिलाचे सत्व मिळवण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागतो.
सर्वांत आवडता किंवा सर्वांत प्रसिद्ध सुगंध तर आपण बघितला. पण त्याचबरोबर जगातील सर्वांत जास्त दुर्गंधी रसायन कोणते हे बघायला गेलो तर थिओऍसिटोन (thioacetone) हे रसायन प्रथम क्रमांक मिळवेल. यामध्ये गंधक हे मूलद्रव्य असते ज्यामुळे या रसायनाचा असह्य असा वास येतो. मनुष्याला ज्ञात असलेल्या वासांपैकी सर्वांत घाण वास अशी या रसायनाची ओळख आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी या रसायनाची वातावरणातील घनता जास्त असते तिथे याचा वास जाणवत नाही, पण जसे हे वातावरणात विरळ होत जाते, हाच वास तीव्र होत जातो.
१९६७ साली इएसएसओमध्ये काम करणाऱ्या शास्त्रद्यांनी या रसायनाबद्दलचा त्यांचा एक अनुभव सांगितला आहे. जेव्हा या रसायनाशी संबंधित काम त्यांच्याकडे सुरू होते, तेव्हा चुकून एका बाटलीचे झाकण काही सेकंदांसाठी उडाले. त्या काही क्षणात त्या जागेपासून दोनशे मीटरवर काम करत असलेल्या लोकांनी मळमळ आणि अस्वस्थ वाटण्याबद्दल तक्रार केली. या रसायनाशी अगदी काही सेकंद ज्या लोकांचा संबंध आला ते नंतर जेव्हा रेस्टॉरंटमध्ये गेले, तेव्हा तेथील सर्व लोकांनी त्यांना जवळ जवळ शत्रूसारखी वागणूक दिली. तेथील वेटरने त्यांच्या आजूबाजूला अत्तराचा फवारा मारून त्यांना एक लाजिरवाणा अनुभव दिला.
हे सगळे वाचून एक गोष्ट नक्की समजली असेल की, आपल्याला जाणवणारा गंध, मग तो हवासा असो किंवा नकोसा, हा विशिष्ट रसायनांमुळे येत असतो. म्हणूनच यापुढे जेव्हा एखादा सुगंध आवडेल तेव्हा नक्की शोध घ्या, की यामागील रसायन कोणते असू शकते.
————–