– रमेश पडवळ
आपल्याच गुणवैशिष्ट्यांनी उजळून निघालेलं नाशिक एक अनोखं शहर आहे. कुंभमेळा, राजेरजवाड्यांचा प्राचीन इतिहास अन् यातून पुढील पिढ्यांसाठी निर्माण झालेला वारसास्थळांचा दरवळ या शहराच्या वारसायणाची महती सांगतो. सिंहस्थ कुंभमेळा हा या शहराचा आत्मा असला तरी या शहराचा अध्यात्मिकभाव एका विशिष्ट विचारांना वाहिलेला नाही. म्हणूनच येथील वारसास्थळांनीही पुढील पिढ्यांमध्ये समाजभान निर्माण करण्यासाठी बौद्ध, जैन, हिंदू लेण्या, प्राचीन मंदिरे, विविध पंथांचे मठ, गडकिल्ले, वाडे आणि उत्सवांनी आपल्यातील वैविध्यपूर्णता अंगी बाणली आहे. म्हणूनच येथील वारसायण नासिकला समृद्ध करतो.
तपोभूमी म्हणजे अशी भूमी की, जेथे श्रीरामसह ऋषीमुनी, साधुमहंत, राजेमहाराजे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी नासिकमध्ये आले अन् जगाला अलौकिक इतिहास देऊन गेले. गोदावरीच्या साक्षीने अगदी अश्मयुगापासून येथे मानवाने आत्मियतेने जनसंस्कृती वसवली अन् गुण्यागोविंदाने नांदवली असल्याची उदाहरणे नासिकच्या प्राचीन इतिहासाला झळाळी देतात अन् नासिक शोधता शोधता आपण साठ हजार वर्ष मागे जातो. याच इतिहासानं नासिकला जगाच्या नकाशावर स्थान मिळवून दिले आहे. हा इतिहास येथे बहरायला सर्वप्रथम कोणी मदत केली असेल तर ती आहे गोदावरी. त्रिंबकेश्वराच्या डोंगरातून दूडूदूडू धावणारी गोदावरी १,४५० किलोमीटर प्रवास करीत बंगालच्या उपसागराला पावन करते. गोदावरी ही लांबीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची असून, तिच्या प्रवासात येणाऱ्या या राज्यांना ती सुजलाम् सुफलाम् करीत जाते. म्हणूनच या राज्यांच्या एकूणच धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक घडामोडीतही गोदामाईला विषेशस्थान आहे.
पुरातत्त्वीय दृष्ट्या गोदावरीचे महत्त्व मोठे आहेच शिवाय मानवाच्या धार्मिकभावनेच्या वृद्धीतही मोलाची भर घालणारी ही एक महत्त्वाची नदी आहे. म्हणूनच तिला दक्षिण गंगा या नावानेही ओळखले जाते. त्र्यंबकेश्वर ते तपोवनापर्यंत असंख्य कुंडांनी गोदेतील स्नानाचे एक वेगळं महत्त्व निर्माण केलेलं दिसतं ते अगदी सिंहस्थातील पर्वण्यांपर्यंत. म्हणूनच या शहराला धर्मपीठाचा दर्जाही लाभला होता. यामुळेच नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा हा आता एक जागतिक महोत्सव ठरतो आहे. सिंहस्थकाळात आखाड्यांचा साज अन् जगभरातून आलेल्या भक्तांचा उत्साह अनुभवण्यासारखा असतो. हा सोहळा शहरासाठी मोठी आर्थिक उलाढाल, पर्यटन, धार्मिक व अध्यात्मिक मंथनही घडून आणतो. वर्षभर चालणारा या सोहळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होत असल्याने सिंहस्थ एक धार्मिक वारसास्थळच ठरत असल्याने नासिकच्या गुणवैशिष्ट्यांना लकाकी देण्याची संधी या उत्सवातून मिळते.
नासिकच्या वारसायणातील एक अनोखा ऐतिहासिक दुवा म्हणजे त्रिरश्मी डोंगरावरील पांडवलेणी. ही बौद्ध लेणी साधारण दोन हजार वर्षे प्राचीन असून, नासिक या शहराला तेव्हापासून नासिक (‘श’ नव्हे) म्हटले जात होते, हा पुरावा या लेणीने आजही कातळात जपला आहे. पांडवलेणीतील २६ लेणींमधील २९ ब्राह्मीलिपीतील शिलालेख सातवाहन व क्षत्रपांचा इतिहास सांगतात. या शिलालेखातून सातवाहनांचा वैभवशाली काळ समोर आला आहे. सातवाहनांच्या व बौद्ध धर्माच्या वैभवशाली काळाची तसेच सातवाहन, क्षत्रप, अभीर या राज्यांच्या कारर्किदीवर प्रकाश टाकणारी ही एक महत्त्वाची पाऊलखुणच ठरली आहे. तेव्हाचे लोकजीवन, बँकिंगपद्धती, व्यावसाय, ज्ञान, धर्म, पराक्रम, शौर्य, दान, शिल्प, लिपी या घटकांवरही ही लेणी प्रकाश टाकते. त्यामुळे जगभरातील इतिहासात पांडवलेणीमुळे समोर आलेला इतिहासाला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. पांडवलेणी हे फक्त वारसा स्थळ अथवा फक्त बौद्ध लेणी नाही तर नासिककरांचे एक स्पंदन आहे. या शहरानं असंख्य लढाया, कटकारस्थाने अन् पराक्रमाच्या विजयांच्या गुढ्या उभारल्या आहेत. या भूमीने कधी कोणाला पराजित होणे शिकविले नाही. हा वेगळा संदेश ही लेणी देते. अशी एक प्राचीन लेणी म्हणजे तपोवनातील तपोवनलेणी.
नाशिक जिल्ह्यात जैन व हिंदू लेणीचा वारसा समृद्ध आहे. साडेतीनशेहून अधिक काळ नासिकवर अधिराज्य गाजविणाऱ्या सातवाहनांनंतर, अभिरांनी या परिसरावर राज्य केलं. कर्नाटकातील गंग राजवंशांचाही नासिकशी संबंध आल्याचे ताम्रपटावरून दिसते. त्यानंतर त्रैयकुटकांनी (त्रिकुट) नासिकचा वारसा पुढे नेला. त्यानंतर आलेले कलचुरी, सातव्या शतकातील बदामी चालुक्य, शिलाहार, कदंब, राष्ट्रकुटांनी नासिकला शिल्पवैभव दिलं. त्यानंतर आलेला यादव वंश तर मुळचा नासिकचाच. तसे सातवाहन, अभिर, त्रिकुट, यादव हेही नासिकचेच. या राजघराण्यांनी फक्त नासिकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर आपला ठसा उमटविलेला दिसतो तो मंदिरांमुळे. यादवपूर्व व यादवकाळात नासिकमध्ये मंदिर शिल्पांना आलेले सुवर्णदिवस आजही आपण अनुभवतो आहोत. सिन्नर, झोडगे, देवळाणे, देवठाण, देवळीकऱ्हाड, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथील तसेच नासिकच्या गोदाघाटावरील मंदिरे ही नासिकच्या वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये उभी राहिली अन् आजही नासिकचा इतिहास पुढे नेत आहेत.
गोदाघाट हा तर नासिकच्या इतिहासाला कायम पूरक ठरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण अनुभवलेला हा गोदाघाट इतिहासाला किती समृद्ध करत गेला हे अनुभवताना छातीचा घेर इंचइंच वाढतो. गोदाघाटावरील सुंदरनारायण व कपालेश्वर या प्राचीन मंदिरांबरोबर उभ्या असलेल्या मराठा कालखंडातील शंभरहून अधिक मंदिरांची रांगोळी नासिककरांमध्ये दररोज ऊर्जा भरताना दिसते. याच गोदाघाटावर मराठा कालखंडात सरदार रंगराव ओढेकरांनी काळाराम मंदिर बांधले. काळाराम मंदिर नासिककरांचा श्वास आहे. नासिकमध्ये देशविदेशातील पर्यटक येतात तेव्हा काळाराम मंदिर त्यांना हमखास दाखविले जाते ते त्यावरील प्रेमापोटीच. तशीच नासिकची वाडा संस्कृती येथील इतिहासाची साक्षीदारच म्हणावी लागेल. मार्च १६३१ मध्ये नासिकचे ठाणेदार म्हणून शहाजी राजांची नेमणूक करण्यात आली अन् शहाजी राजे नासिकला राहण्यास आले. त्यावेळी छत्रपती शिवाजी राजे एक वर्षांचे होते. गोदावरीच्या दक्षिणेला असलेले व टेकडावर वसलेले जुन्या नासिकमध्ये ते वास्तव्यास होते. तेव्हा ते जुन्या गढीवरील मोगलांच्या सरकारी वाड्यात (गढीत) राहत होते. तसेच ते जवळील बालशिवाजीसह भैयासाहेब कोठावळे यांच्या वाड्यातही राहिले असल्याचा संदर्भ इतिहासाच्या पानांमध्ये मिळतो. हा वाडा संस्कृतीचा पहिलाच संदर्भ आजही अनुभवता येतो. १६९६ मध्ये मराठ्यांना नासिकच्या काही भागावर अंमल बसविण्यात यश आले अन् पुढे नासिकवर मराठ्यांचे वर्चस्व वाढले. मराठे सरदार नासिकमध्ये राहण्यास आले. त्यांनी आपल्या सोयीसाठी वाडे बांधण्यास सुरूवात केली हीच नासिकच्या आताच्या वाड्यांची नांदी होती. नगराच्या पश्चिम भागात खडकाळी येथे नारोशंकर वाडा होता. हा सर्व वाड्यात जुना वाडा म्हणून ओळखला जातो. ही इमारत नासिकमधील सर्वात मोठी इमारत समजली जात होती, अशी नोंद नासिक गॅझेटियरमध्ये मिळते. १७४७ मध्ये सरदार नारोशंकर यांनी रामेश्वर मंदिर (आताचे नारोशंकर मंदिर) बांधले. यादरम्यानच सरदारांचे वाडे नासिक साकारले जाऊ लागले. याचदरम्यान, नवापुरा वसला.
१७५१ मध्ये गुलशनाबाद पुन्हा नासिक झाले. त्यावेळी गोदेच्या पश्चिम काठावर आजच्या नासिकचा पत्ताच नव्हता. हे आजचे नासिक पेशव्यांनी १७५३ मध्ये वसवले अन् याच दरम्यान नाशिकमध्ये वाडा संस्कृती बहरली. तशीच ती जिल्हाभरात मराठा सरदारांनी फुलवली. नाशिकसह चांदवड, येवला, पेठ, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, निफाड, दिंडोरी, मालेगाव अशा तालुक्यांमध्येही असंख्य वाडे पहायला मिळतात. होळकरांचा चांदवडमधील वाडा, पेशव्यांनी मातोश्री गोपिकाबाईंसाठी गंगापूरमध्ये अन् कामकाजासाठी सरकारवाडा बांधला, तर विंचूरकरांनी विंचूरमध्ये वाडा बांधला. राजेबहाद्दर नारोशंकरांनी तर वाडा बांधता बांधता मालेगावात किल्लाच बांधला. सिन्नरमधील देवपूरचा राणेखानाचा वाडा, सोनांबे येथील हिरेखाणाचा वाडा, दिंडोरीतील देशमुखांचा वाडा, अशा असंख्य वाड्यांच्या इतिहासाने नासिकचा इतिहास शहारला आहे. हे वाडे आता देह ठेऊ लागले आहेत. कालांतराने वाड्यांचे शहर म्हणून असलेली ओळख मागेही पडेल; मात्र, वाडे संस्कृतीचा नासिककरांच्या मनावर उमटलेला साज काय अनुभवायला मिळेल आणि हेच नासिकचे वेगळेपण आहे.
दिल्ली ही भारताची राजधानी आहे हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु, दिल्ली भारताची राजधानी नसती, तर कोणते शहर राजधानीसाठी योग्य असते? या प्रश्नाचे उत्तर आहे नासिक! होय, अगदी खरे आहे. अभेद्य घाटमाथे, सह्याद्रीच्या डोंगररांगा, आल्हाददायक वातावरण, अनेक नद्या, पुरेसे पाणी, पूर्व-उत्तर-दक्षिणेला जोडणारा रेल्वेमार्ग, उत्कृष्ट द्राक्षे, इटालियन चवीची वाइन, बुद्धिवंत मंडळी अशा वैविध्यांनी नटलेले नासिक शहर भारताची राजधानी व्हावे, यासाठी सन १८६५ मध्ये सर जॉर्ज कॅम्पबेल यांनी दिलेल्या प्रस्तावावर ब्रिटिश प्रशासनात दीर्घकाळ चर्चा झाल्याची नोंद समोर आली आहे. हा प्रस्ताव स्वीकारला गेला असता, तर वाइन कॅपिटल म्हणून मिरवत असलेले नासिक भारताची राजधानी म्हणूनही मान्यता पावले असते. यामागे दडलेले गुपित म्हणजे नासिकची वैभवशाली भौगोलिकता. ४० नद्यांनी समृद्ध व साधारण ८० हून अधिक गडकिल्ल्यांनी समृद्ध असे नाशिक सर्वाधिक धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. लोकजीवन या अंगानेही नाशिककडे पाहायचं म्हटलं तरी लोकसंस्कृती, आदिवासी कला, उत्सव, बोहाडा, गोदाकाठचे उत्सव, रामरथ, त्र्यंबकेश्वरतील धार्मिक उत्सव, संतांची मांदियाळीने समृद्ध अध्यात्मिक लोकजीवन नासिकमध्ये पाहायला मिळतं. याबद्दल लिहावं तितकं कमीच म्हणावं लागेल. युद्धभूमीपासून कलेच्या क्षेत्रात पराक्रम गाजविले नासिककर सर्वात सुख माणसात गणला गेला तर नवल नसावे.
नासिकची ओळख जशी गोदाघाटावरील मंदिरे, पांडवलेणी, वाडे अन् पराक्रम गाजविणाऱ्या असंख्य राजे, महाराजे, ऋषीमुनी, साधू, महंत, संत, सरदार, कवी, शाहीर, सामाजिक चळवळी, आदिवासी अन् स्वातंत्र्यसैनिकांपासून काळाराम सत्यागृहात लढलेल्या लढवय्यांनी निर्माण केली आहे. तशी ती नासिकच्या या वारसायणाला जपणाऱ्या संस्थांनीही निर्माण केल्याचे दिसते. नासिकला नाण्यातून, पोथ्यांतून, वस्तूसंग्रहातून, कवीतातून, कादंबरीतून खेळातून जपणाऱ्या नाशिककर हा खरा तेथील वारसादार आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ आणि उंच कळस असलेलं मंदिर नासिककर जसा उराशी बाळगूण आहे तसात तो आशिया खंडातील एकमेव अंजनेरीतील नाणीसंग्रहालयही बाळगुण आहे. खिशातील कोऱ्या नोटांचा आणि तोफांच्या सलामीचाही नाशिककर साक्षीदार आहे. अजून किती सांगू आमचं नासिक बेस्ट आहे. तर येताय ना नासिक अनुभवायला.
(लेखक नासिकचे इतिहास व पुरातत्त्व अभ्यासक आहेत.)