मयुरेश प्रभुणे, १८ एप्रिल २०१९
देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मान्सूनचे असणारे महत्व आजचे नाही. किमान दोन हजार वर्षांपासून आगामी मान्सून कसा असेल याचे पूर्वानुमान वर्तवण्याचे प्रयत्न भारतात सुरु आहेत. या दोन हजार वर्षांत मान्सून अंदाज कसे विकसित होत गेले याची ही थोडक्यात ओळख-
मान्सून अंदाजाचा खटाटोप कशासाठी?
दरवर्षी एप्रिलमध्ये, त्यानंतर जूनमध्ये आणि मग मान्सून काळात दर महिन्याला आगामी पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) देण्यात येतो. हा अंदाज देण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च केले जातात. मान्सून अंदाजासाठी एवढा खटाटोप कशासाठी असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. त्याचं उत्तर मान्सूनवर आधारीत भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे. चांगला मान्सून म्हणजे चांगलं पीक. चांगल्या पिकामुळे शेतकऱ्यांच्या हाती पुरेसा पैसा येतो. ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित ऑटोमोबाईल, सिमेंट, बँकिंग, टेलिकम्युनिकेशन क्षेत्राला याचा थेट लाभ होतो. मान्सून चांगला बरसला नाही तर त्याचा थेट परिणाम कृषी उत्पादनावर होतो. पर्यायाने शेतकऱ्यांच्या हाती पुरेसा पैसा येत नाही आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसतो. दुसरीकडे बाजारात धान्याची किंवा भाज्यांची टंचाई निर्माण झाली की महागाई वाढते. ज्याचा पुन्हा थेट परिणाम हॉटेलिंग, पर्यटन क्षेत्रावर होतो. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतही करावी लागते. या व्यतिरिक्त दुष्काळी स्थितीत धरणांमध्ये पुरेसे पाणी जमा न झाल्यास जलविद्युत निर्मिती ठप्प होते ज्याचा थेट परिणाम लघु उद्योगांच्या उत्पादनावर होतो. पाणी टंचाईचा फटका बांधकाम व्यवसायालाही बसतो. देशाच्या अर्थव्यवस्थेतील बहुतेक घटक प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या मान्सूनवर अवलंबून असल्यामुळे आगामी मान्सून कसा असेल याची उत्सुकता संबंध देशाला लागलेली असते.
पारंपरिक अंदाज


बहावा पूर्णपणे बहरला की ४०- ४५ दिवसांनी मान्सूनचे आगमन होते असे मानले जाते. वराहमिहीर या हवामानशास्त्रज्ञाने बहावा आणि मान्सूनच्या आगमनाचा संबंध चौथ्या शतकात बृहदसंहितेत लिहून ठेवला होता. गुजरात कृषी विद्यापीठाने काही वर्षांपूर्वी बहावा पूर्ण फुललेल्या तारखांच्या अचूक नोंदी ठेवून मान्सूनच्या आगमनाच्या तारखेचा अंदाज चाळीस दिवस आधीच देण्यास सुरुवात केली. आश्चर्यकारकपणे त्यांनी वर्तवलेल्या तारखेच्या दोन – तीन दिवस अंतराने मान्सूनचे प्रत्यक्ष आगमनही झाले. अशाच प्रकारे गुढी पाडव्याला प्रसिद्ध होणाऱ्या पंचांगाचे वाचन आजही गावागावांत केले जाते. कृषी पराशर आणि बृहदसंहितेचा आधार घेऊन पंचांगात आगामी मान्सूनचे पूर्वानुमान दिलेले असते. संबंधित वर्षातील आकाशातील ग्रहांच्या स्थितीचा आधार घेऊन हा अंदाज दिला जातो. पंचांगात वर्तवण्यात आलेला पाऊस आणि त्या वर्षी प्रत्याक्षात झालेला पाऊस यांची चाचपणी करणारे संशोधन अनेकांनी प्रसिद्ध केले आहे. बहुतेक जणांच्या तपासणी मधून ७० टक्क्यांहून अधिक वेळा पंचांगातील मान्सूनचा अंदाज बरोबर आल्याचे आढळून आले आहे. अशाच प्रकारे देशाच्या विविध प्रांतात त्या भागातील निसर्गाचे दर्शक (इंडिकेटर) वापरून वर्षानुवर्षे पावसाचा अंदाजवर्तवण्यात येतो.
ब्रिटिशांचे योगदान

आयएमडीचे अंदाज

मात्र, मान्सूनशी संबंधित समुद्र आणि वातावरणातील घटना जशाच्या तशा मॉडेलमध्ये उतरवायचा तर त्यासाठी वातावरण आणि समुद्राची सखोल आणि सातत्याने निरीक्षणे घेणारी यंत्रणा हवी. विसाव्या शतकात भारताकडे स्वतःचे डायनॅमिक मॉडेल नसल्याचे हे मुख्य कारण होते. भारतीय अवकाश संशोधन संस्थेमुळे भारत हवामानशास्त्रीय उपग्रहांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. वर्षभर, चोवीस तास भारतीय उपखंडातील हवामानाच्या नोंदी घेणे भारतीय उपग्रहांमुळे (इन्सॅट) शक्य झाले. २००७ मध्ये स्वतंत्र भूविज्ञान मंत्रालय झाल्यावर आयएमडीचा ब्रिटिशकालीन चेहराही बदलू लागला. आयएमडीच्या आधुनिकीकरणाच्या योजनेतून देशभरात जमिनीवर आणि समुद्रात हवामानाच्या नोंदी घेणाऱ्या स्वयंचलित वेधशाळांचे जाळे निर्माण झाले. देशात ठिकठिकाणी रडार बसवण्यात आले. डायनॅमिक मॉडेलसाठी आवश्यक हवामानाच्या नोंदी घेणारी यंत्रणा निर्माण झाली. मात्र, त्या नोंदी एकत्र करून त्यांचे मॉडेल तयार करण्यासाठी अब्जावधी गणिते करणारा शक्तिशाली सुपरकम्प्युटर आपल्याकडे उपलब्ध नव्हता.
मान्सूनवर संशोधन करणाऱ्या पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरोलॉजीच्या (आयआयटीएम) नेतृत्वाखाली मान्सूनचे देशातील पहिले डायनॅमिक मॉडेल तयार करण्यासाठी केंद्र सरकारने मान्सून मिशनची २०१२ मध्ये सुरुवात केली. साडेचारशे कोटी रुपये खर्चाच्या या मिशनमधून डायनॅमिक मॉडेलच्या साह्याने मान्सून काळातील पावसाचा दीर्घकालीन (३० दिवस ते संबंध हंगाम), दहा दिवस ते महिनाभर, चार ते दहा दिवस आणि पुढील ७२ तासांचा स्वतंत्रपणे अंदाज देण्याचे उद्दिष्ट्य ठरवण्यात आले.
मान्सून मिशन
निश्चित केलेल्या पाच वर्षांच्या कालावधीत भारतीय हवामानशास्त्रज्ञांनी नॅशनल मान्सून मिशन यशस्वी करून पहिले भारतीय डायनॅमिक मॉडेल पावसाच्या अंदाजासाठी आयएमडीकडे सुपूर्तही केले. आयआयटीएममधील वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. ए. के. सहाय यांची मान्सूनचे डायनॅमिक मॉडेल तयार करण्यात महत्वाची भूमिका राहिली. डॉ. सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या हंगामी, तसेच दहा ते तीस दिवसांच्या अंदाजासाठी आयआयटीएमने अमेरिकेच्या क्लायमेट फोरकास्ट सिस्टीम (सीएफएस) या मॉडेलचा आधार घेतला. समुद्र आणि वातावरणातील घटना एकत्रितपणे (कपल्ड) व्यक्त करणाऱ्या या मॉडेलमध्ये आपल्या शास्त्रज्ञांना बऱ्याच सुधारणा कराव्या लागल्या. हवामानाची आणि समुद्राची निरीक्षणे घेणारे उपग्रह, रडार, वेधशाळांचे नेटवर्क यांच्याकडून नोंदी घेऊन आयआयटीएममधील आदित्य या सुपर कम्प्युटरच्या साह्याने मान्सूनचे पहिले डायनॅमिक मॉडेल बनवण्यात भारतीय शास्त्रज्ञ यशस्वी ठरले. २०१६ पासून या मॉडेलच्या साह्याने मान्सूनचा अंदाज देण्यास सुरुवात झाली. मान्सूनचा अंदाज देणारी जगभरात जी मॉडेल सध्या उपलब्ध आहेत, त्यात सर्वाधिक यशस्वी मॉडेल आयआयटीएमने बनवलेले आहे.

प्राचीन काळापासून उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आगामी मान्सून कसा असेल याची पूर्वकल्पना शेतकऱ्यांना यावी यासाठी भारतीय शास्त्रज्ञ प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. वराहमिहिरापासून आयआयटीएमच्या डायनॅमिक मॉडेलपर्यंतचे हे भारतीय मान्सून मिशन शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरले आहे.
———–
Please follow and like us: