टीम संशोधन
तीव्र उन्हाळ्याचा अनुभव घेत असतानाच आता सर्वांना वेध लागले आहेत मॉन्सूनचे. एप्रिलमध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) यंदाच्या मॉन्सून हंगामातील पर्जन्यमानाचा पहिला अंदाज जाहीर केला. आता केरळमधील मॉन्सूनच्या आगमनाची तारीखही जाहीर झाली आहे. गेल्या वर्षीचा अपुरा पाऊस, राज्यात सुरू असलेली पाणी टंचाई या पार्श्वभूमीवर आयएमडीचे दोन्ही अंदाज दिलासादायक आहेत.
येत्या जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त; म्हणजे सरासरीच्या १०६ टक्के पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आणि देशाच्या सुमारे ८० टक्के भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असेही आयएमडीने म्हटले आहे. सांख्यिकी आणि डायनॅमिक अशा दोन्ही स्वरूपाच्या मॉडेलमधून यंदा मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे सरासरीच्या १०६ टक्के (कमी-अधिक ५ टक्के) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून हंगामातील देशभरातील पावसाची सरासरी ८७० मिलिमीटर आहे. येत्या हंगामात सरासरीपेक्षा जास्त किंवा अतिरिक्त पावसाची शक्यता तब्बल ६१ टक्के, तर सरासरीपेक्षा कमी किंवा अपुऱ्या पावसाची शक्यता फक्त १० टक्के असल्याचे आयएमडीच्या अंदाजात म्हटले आहे.
‘प्रशांत महासागरातील एल निनोची तीव्रता कमी होत असून, जुलैपासून तिथे ला निनाची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. हिंदी महासागरातील इंडियन ओशन डायपोल (आयओडी) मान्सून काळात पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता आहे. युरोप आणि आशियात डिसेंबर ते मार्च या काळात सरासरीपेक्षा कमी हिमवृष्टी झाली. या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणून यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो, असे आयएमडीचे म्हणणे आहे.’
यावर्षी ओडिशा, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांचा काही भाग, हिमाचल प्रदेश आणि लडाखचा काही भाग वगळता देशात इतरत्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो. महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी, घाट क्षेत्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचे आयएमडीच्या अंदाजात दर्शवण्यात आले आहे.
आयएमडीच्या दुसऱ्या अंदाजानुसार नैऋत्य मान्सून येत्या ३१ मे रोजी (कमी- अधिक चार दिवस) केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख एक जून असून, यंदा मान्सून एक दिवस आधीच देशाच्या मुख्य भूभागावरील प्रवास सुरू करू शकतो.
विषुववृत्त ओलांडून भारतीय उपखंडाच्या दिशेने नैऋत्येकडून वाहणाऱ्या मोसमी वाऱ्यांचा प्रवाह (क्रॉस इक्विटोरियल फ्लो) सध्या सक्रिय होऊ लागला आहे. १९ मे पर्यंत मान्सून दक्षिण अंदमानचा समुद्र, आग्नेय बंगालचा उपसागर आणि निकोबार बेटांवर दाखल होऊ शकतो, असे आयएमडीने म्हटले आहे. सर्वसाधारणपणे २२ मेला मान्सून अंदमानात दाखल होत असतो. त्यानंतरही मान्सूनसाठी हवामान अनुकूल राहण्याची चिन्हे दिसत असून, सर्वसाधारण तारखेच्या एक दिवस आधी, ३१ मे रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होऊ शकते.
आयएमडीतर्फे गेली १९ वर्षे मान्सूनच्या आगमनाचा अंदाज देण्यात येत आहे. त्यांपैकी २०१५ हे वर्ष वगळता इतर सर्व वर्षी अंदाज बरोबर आल्याचे आयएमडीचे म्हणणे आहे. मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवण्यासाठी पुढील घटकांना गृहीत धरण्यात आले आहे – १) वायव्य भारतातील किमान तापमान २) दक्षिण भारतातील मान्सूनपूर्व सरींचा उच्चांक ३) दक्षिण चीनच्या समुद्रपृष्ठावरून होणारे दीर्घ लहरींचे उत्सर्जन ४) नैऋत्य हिंदी महासागरावरील वातावरणाच्या खालच्या भागातील वाऱ्यांचे प्रवाह ५) पूर्व विषुववृत्तीय हिंदीमहासागरावरील वातावरणाच्या वरच्या भागांतील वाऱ्यांचे प्रवाह ६) आग्नेय प्रशांत महासागरावरून होणारे दीर्घ लहरींचे उत्सर्जन.
मॉन्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील हंगामी अंदाज मे महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाईल. सध्याच्या हवामानाच्या स्थितीकडे पाहिले, तर त्या अंदाजातूनही यंदा समाधानकारक पावसाची अपेक्षा ठेवता येईल.
———-
ला निना आणि मान्सूनचा पाऊस
– १९५४ ते २०२२ या ६८ वर्षांच्या काळात २२ वर्षे अशी होती, जेव्हा मान्सून काळात प्रशांत महासागरात ला निना स्थिती होती.
– या २२ वर्षांपैकी १९७४ आणि २००० ही वर्षे सोडल्यास इतर २० वर्षांमध्ये मान्सून काळातील पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त किंवा अतिरिक्त होते.
– १९५१ ते २०२३ या काळात एल निनो पाठोपाठ दुसऱ्या वर्षी ला निनाची स्थिती उद्भवली अशी नऊ वर्षे होती.
– त्यांपैकी दोन वर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त, पाच वर्षी अतिरिक्त, तर दोन वर्षी सरासरीच्या जवळ नोंदला गेला.
——–