पुण्यातील ‘एनसीआरए’ आणि ‘टीसीएस’च्या सहभागातून ‘टेलिस्कोप मॅनेजर’ विकसित
संशोधन, ८ ऑगस्ट २०१८
स्क्वेअर किलोमीटर अॅरे (एसकेए) या जगातील सर्वात मोठ्या रेडिओ टेलिस्कोप समूहाच्या उभारणीमध्ये भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी नुकताच महत्वाचा टप्पा गाठला आहे. एसकेए अंतर्गत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये उभारण्यात येणाऱ्या शेकडो रेडिओ अँटेनांचे नियंत्रण आणि संचालन करणारी ‘टेलिस्कोप मॅनेजर’ ही सॉफ्टवेअर प्रणाली भारताच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय समूहाने यशस्वीरीत्या विकसित केली असून, त्यात पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स (एनसीआरए) आणि टीसीएस रिसर्च अँड इनोव्हेशन यांचा प्रमुख सहभाग आहे. ‘टेलिस्कोप मॅनेजर’ ही यंत्रणा एसकेएच्या मेंदू आणि मज्जासंस्थेप्रमाणे काम करेल.
टेलिस्कोप मॅनेजर विकसित करणाऱ्या आंतरराष्ट्रीय समूहाचे नेतृत्व एनसीआरएचे संचालक प्रा. यशवंत गुप्ता करीत आहेत.
येत्या दशकात खगोलशास्त्रात अनेक महाप्रकल्प आकाराला येणार आहेत. रेडिओ खगोलशास्त्राचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असणारा स्क्वेअर किलोमीटर अॅरे (एसकेए) हा त्यांपैकी एक. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया येथे उभारण्यात येणाऱ्या एसकेएच्या दोन्ही टप्प्यांची निर्मिती २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून, हा प्रकल्प भारताच्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपपेक्षा (जीएमआरटी) किमान ३० पट अधिक क्षमतेचा असणार आहे. भारतासह १२ देशांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा महाप्रकल्प साकारला जात आहे. एसकेएच्या पहिल्या टप्प्यासाठी साधारण आठ हजार कोटी रुपये खर्च येणार असून, त्यामध्ये भारताचे पाच टक्के योगदान असेल. पृथ्वीच्या जवळ असलेल्या सूर्यापासून ते विश्वाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा निर्माण झालेल्या ताऱ्यांचा वेध घेण्याची क्षमता एसकेएकडे असेल.
भारतातील एनसीआरए आणि टीसीएस रिसर्च अँड इनोव्हेशन यांच्यासह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इटली, पोर्तुगाल, साऊथ आफ्रिका आणि इंग्लंड आदी देशांतील संशोधन संस्था आणि कंपन्यांनी या महाप्रकल्पाचे संचालन आणि नियंत्रण करणारी सॉफ्टवेअर प्रणाली – ‘टेलिस्कोप मॅनेजर’ यशस्वीरीत्या विकसित केली आहे.
Prof. Yashwant Gupta- Director NCRA
प्रा. गुप्ता यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी प्रकल्पात सहभागी प्रमुख शास्त्रज्ञ प्रा. योगेश वाडदेकर, डॉ. तीर्थंकर राय चौधरी, टीसीएसचे सुब्रोज्योती राय चौधरी आदी उपस्थित होते. टेलिस्कोप मॅनेजरच्या निर्मितीबाबत प्रा. गुप्ता म्हणाले, ‘जगातील सर्वात मोठ्या रेडिओ टेलिस्कोपचे नियंत्रण आणि संचालन करणारी सॉफ्टवेअर यंत्रणा आम्ही वेळेत पूर्ण केली याबाबत अभिमान वाटतो. आम्ही विकसित केलेल्या यंत्रणेला एसकेएच्या क्रिटिकल डिझाईन रिव्ह्यू कमिटीने नुकतीच मान्यता दिली. एसकेए हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये साकारला जाणार असून, पहिल्या टप्प्यात दक्षिण आफ्रिकेत तीनशे डिश अँटेना, तर दुसऱ्या टप्प्यात ऑस्ट्रेलियामध्ये सुमारे तीस हजार डायपोल अँटेनांचा समूह उभारण्यात येईल. या सर्व अँटेनांचा समूह एकत्रितरित्या एका टेलिस्कोप प्रमाणे काम करेल. ‘टेलिस्कोप मॅनेजर’ या आम्ही विकसित केलेल्या सॉफ्टवेअरद्वारे या सर्व अँटेनांचे नियंत्रण आणि संचालन केले जाणार असून, ही यंत्रणा एसकेएच्या मेंदू आणि मज्जासंस्थेप्रमाणे काम करेल.’
प्रचंड डेटा साठवायचा कसा ?
एसकेए हा रेडिओ टेलिस्कोपचा महाप्रकल्प प्रत्यक्षात आल्यावर त्यातून दरवर्षी प्रचंड प्रमाणात शास्त्रीय नोंदी (सायंटिफिक डेटा) जमा होणार आहे. ही माहिती साठवणे हे प्रकल्प उभारणीतील प्रमुख आव्हान असल्याचे प्रा. वाडदेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘एसकेएच्या नोंदींचा प्रचंड साठा जगभरात सहा केंद्रांवर विभागला जाणार असून, त्यात दरवर्षी सुमारे तीन लाख टेराबाईट माहिती जमा होईल. एसकेएच्या नोंदींचे एक केंद्र भारतात उभारण्यात येणार असून, त्याचे छोटे प्रारूप येत्या काळात पुण्यातील एनसीआरएमध्ये विकसित करण्यात येणार आहे.’