मॉन्सूनने देश व्यापला  

सर्वसाधारण वेळेच्या १६ दिवस आधीच वायव्य भारतात प्रवेश
संशोधन, २९ जून २०१८
—–
अनुकूल हवामानामुळे वेगाने प्रवास करीत सर्वसाधारण तारखेपेक्षा १६ दिवस आधीच शुक्रवारी (२९ जून) मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले. मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापण्याची सर्वसाधारण तारीख १५ जुलै आहे. येत्या आठवड्यात पावसाचे प्रमाण सर्वसाधारण राहून त्यापुढील आठवड्यात महाराष्ट्रासह देशभर पावसाचा जोर वाढेल असे आयएमडीच्या पुढील दोन आठवड्यांच्या अंदाजात म्हटले आहे.
जूनच्या मध्यात साधारण दहा दिवस विश्रांती घेतल्यानंतर उत्तर भारतात मॉन्सूनची प्रगती वेगाने झाली. शुक्रवारी मॉन्सूनने राजस्थान आणि गुजरातच्या पश्चिम भागामध्ये प्रवेश करत संपूर्ण देश व्यापल्याचे आयएमडीने जाहीर केले. मॉन्सूनची संपूर्ण देश व्यापण्याची सर्वसाधारण तारीख १५ जुलै आहे.
मान्सूनच्या सद्यस्थितीबाबत आयएमडीच्या क्लायमेट सर्व्हिसेस आणि रिसर्चचे प्रमुख डॉ. ए. के. सहाय म्हणाले, ‘मान्सूनच्या प्रवाहाचा जोर सध्या अनुकूल असून, पश्चिम किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा (ऑफ शोअर ट्रफ), तसेच देशाच्या अनेक भागांत वातावरणाच्या वरच्या थरात चक्रीय स्थिती (सायक्लोनिक सर्क्युलेशन) निर्माण होत आहे. यामुळे बहुतेक भागांत पावसाचे प्रमाण सरासरीइतके राहिले आहे.’
‘आतापर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये जास्त तीव्रता असलेले कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले नाही. जी क्षेत्रे तयार झाली त्यांची तीव्रता आणि कालावधीही कमी होता. मात्र, मान्सूनचा प्रवाह तीव्र असल्यामुळे पावसाच्या प्रमाणावर परिणाम झाला नाही. पुढील दोन आठवड्यांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे तयार होण्याची शक्यता मॉडेलमधून समोर येत आहे. त्याला अनुरूप महाराष्ट्रासह देशात इतरत्रही पावसाच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येईल,’ असेही डॉ. सहाय यांनी नमूद केले.
जूनमध्ये देशात १० टक्के कमी; राज्यात २९ टक्के जास्त पाऊस 
 जून महिन्यात देशभरात सरासरीच्या ९० टक्के पावसाची नोंद झाल्याची आकडेवारी आयएमडीने जाहीर केली आहे. एक ते २८ जून या कालावधीत ३६ पैकी २८ हवामानशास्त्रीय विभागांमध्ये सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. उत्तर आणि पूर्वेकडील आठ विभागांमध्ये अपुरा पाऊस नोंदला गेला आहे. महाराष्ट्रात चारही विभागांमध्ये पावसाने जूनची सरासरी ओलांडली आहे. राज्यात जूनमध्ये या महिन्याच्या सरासरीपेक्षा २९ टक्के जास्त पाऊस झाला आहे. कोकणात सरासरीपेक्षा ५२ टक्के, मध्य महाराष्ट्रात १९ टक्के, मराठवाड्यात ४३ टक्के, तर विदर्भात सरासरीपेक्षा चार टक्के जास्त पाऊस नोंदला गेला आहे.
—–
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email
Facebook
Twitter