संशोधन, १९ जून २०१८
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) विकसित केलेले लिथियम आयन बॅटरीचे तंत्रज्ञान देशातील उद्योगांना व्यावसायिक उत्पादनासाठी खुले करण्यात आले आहे. भारताच्या उपग्रहांना ऊर्जा पुरवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या आणि उच्च दर्जाच्या लिथियम आयन बॅटरी आता मोबाईलपासून इलेक्ट्रिक कारपर्यंत अनेक ठिकाणी वापरता येऊ शकतील. सध्या पूर्णतः परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या बॅटरीच्या देशांतर्गत उत्पादनामुळे मोठी आर्थिक बचत होतानाच रोजगार निर्मिती आणि २०३० पर्यंत शंभर टक्के इलेक्ट्रिक वाहनांचे सरकारचे उद्दिष्ट्यही साधले जाणार आहे.
लिथियम आयन बॅटरीच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यासाठी इस्रोने देशातील उद्योगांना आणि स्टार्टअप कंपन्यांना नुकतेच आवाहन केले असून, नियमांची पूर्तता करणाऱ्या कंपन्यांना व्यावसायिक उत्पादनासाठी हे तंत्रज्ञान देण्यात येणार आहे. त्यासाठी कंपन्यांना सुरुवातीला एकदाच एक कोटी रुपये शुल्क भरावे लागेल. २०३० पर्यंत देशातील सर्व वाहने इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे इस्रोने म्हटले आहे.
अवकाशात कृत्रिम उपग्रहांना अखंड ऊर्जा पुरवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उच्च दर्जाच्या लिथियम आयन बॅटरीचे तंत्रज्ञान इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरने विकसित केले असून, त्यानुसार बनवलेल्या बॅटरीच भारतीय उपग्रहांमध्ये वापरल्या जातात. इस्रोने उपग्रहांसाठी लागणाऱ्या बॅटरीच्या उत्पादनासाठी नुकताच भारत हेवी इलेक्ट्रिकल्ससोबतही (भेल) करार केला आहे. आता हेच तंत्रज्ञान मोबाईलपासून इलेक्ट्रिक कारपर्यंत सर्व प्रकारच्या दैनंदिन वापरातील वस्तूंसाठी खुले करण्यात आले आहे.
येत्या १३ जुलैला इच्छूक कंपन्यांची परिषद बेंगळुरू येथे होणार असून, १४ ऑगस्टला तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी निवडलेल्या कंपन्यांची यादी जाहीर करण्यात येईल. सध्या चीन, कोरिया आणि तैवानमधून लिथियम आयन बॅटरीची आयात होते. या बॅटरीच्या देशांतर्गत उत्पादनामुळे मोठ्या प्रमाणात बचत होऊन नवे रोजगारही निर्माण होण्याची अपेक्षा आहे. स्वच्छ आणि हरित ऊर्जेसाठी २०३० पर्यंत सर्व वाहने इलेक्ट्रिक ऊर्जेवर आणण्याचे सरकारने उद्दिष्ट्य ठेवले आहे. हे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी लिथियम आयन बॅटरीचे देशांतर्गत उत्पादन होणे गरजेचे असल्याचे नीती आयोगाने म्हटले होते. त्याला अनुसरूनच इस्रोने हा निर्णय घेतला आहे. लिथियम आयन बॅटरी प्रमाणेच आणखीही औद्योगिक उपयुक्ततेची तंत्रज्ञाने उद्योगांसाठी खुली करत असल्याचे इस्रोने नमूद केले आहे.
—–
Please follow and like us: