उष्णतेची लाट कधी जाहीर केली जाते?
एखाद्या भागात उष्णतेची लाट पसरली आहे हे जाहीर करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) काही निकष लावले जातात. मैदानी प्रदेशात दिवसाच्या तापमानाच्या पाऱ्याने ४० अंश सेल्सिअस, किनारपट्टीच्या भागात ३७ अंश सेल्सिअस आणि पर्वतीय क्षेत्रात ३० अंश सेल्सिअस तापमान ओलांडले की खालील निकषांनुसार संबंधित भागांत उष्णतेची लाट जाहीर केली जाते.
१) संबंधित भागातील कमाल तापमान हे त्या काळातील कमाल सरासरी तापमानापेक्षा ४.५ ते ६. ४ अंश सेल्सिअसने जास्त असेल तर त्या भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे असे मानले जाते. जर तेथील कमाल तापमान हे त्या भागातील कमाल सरासरी तापमानापेक्षा ६.४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर ती स्थिती तीव्र उष्णतेच्या लाटेची मानली जाते.
२) मैदानी प्रदेशात कमाल तापमानाचा पारा ४५ अंशांवर पोचला, तर त्या भागात उष्णतेची लाट, तर ४७ अंश किंवा त्या पेक्षा जास्त तापमान असेल तर ती तीव्र उष्णतेच्या लाटेची स्थिती मानली जाते.
एका हवामानशास्त्रीय उपविभागामधील (उदा. मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आदी) किमान दोन हवामान केंद्रांवर, सलग दोन दिवस वरील निकषांनुसार तापमान नोंदले गेले असेल, तर दुसऱ्या दिवशी त्या भागात उष्णतेची किंवा तीव्र उष्णतेची लाट जाहीर केली जाते.
उष्णतेच्या लाटेची कारणे –
१) एप्रिल- मे महिन्यांत उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येणे ही असामान्य बाब नाही. २१ मार्च ते २१ जून या कालावधीत सूर्याचा विषुववृत्तापासून कर्कवृत्तापर्यंत (२३.५ अक्षांश) प्रवास होत असतो. तर २१ जून ते २२ सप्टेंबर हाच प्रवास उलट्या दिशेने होतो. या कालावधीत सूर्याची किरणे बराच काळ लंबरूप पडल्यामुळे उत्तर उष्णकटिबंधीय पट्ट्यात तीव्र उन्हाळा असतो. भारतात जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनमुळे बाष्पयुक्त वारे आणि ढगाळ हवामान असल्यामुळे या कालावधीतील उन्हाळ्याचा दाह जाणवत नाही. मात्र, एप्रिल- मेमध्ये ज्या दिवसांमध्ये कोरडे हवामान असेल त्यावेळी दिवसाचे तापमान वाढत जाते आणि उष्णतेची लाट पसरते.
येत्या २९ मेपर्यंत उष्णतेच्या लाटांची तीव्रता कायम राहण्याची चिन्हे असून, त्यानंतर कमाल तापमानाचा पारा सरासरीपर्यंत उतरण्याची शक्यता आहे, असे आयएमडीच्या अंदाजातून दिसून येत आहे.