जानेवारी २०१८.. पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या वेज बेटावरील बीचवरून फिरताना तोन्या इल्मन या महिलेला वाळूने माखलेली, गर्द रंगाची, काचेची बाटली सापडली. शोभेची वस्तू म्हणून कपाटात छान दिसेल म्हणून तिने ती वाईनची बाटली घरी नेली. कुतूहल म्हणून घरच्यांनी बाटली उघडली तेव्हा त्यांना बाटलीमध्ये सिगारसारखा दिसणारा कागदाचा गुंडाळा सापडला. कागदाचा गुंडाळा उघडल्यावर त्यावर लिहिलेल्या मजकूराचा कोणालाही बोध झाला नाही. एवढे मात्र समजले की कागदावर जर्मन भाषेत काहीतरी लिहिले असून, त्यावर तारीख होती १२ जून १८८६.
बाटली आणि त्यामध्ये सापडलेला कागद घेऊन इल्मन कुटुंबाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियन म्युझियमशी संपर्क साधला. म्युझियमनेही तातडीने नेदरलँड आणि जर्मनीमध्ये संपर्क साधून त्याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. जर्मनीवरून त्यांना मिळालेल्या माहितीमुळे ती बाटली आणि त्या कागदाची नोंद थेट गिनीज बुकमध्ये झाली. इल्मन कुटुंबही रातोरात प्रसिद्ध झाले.
इल्मन कुटुंबाला मिळालेली बाटली आणि त्यामधील कागद हा आतापर्यंत सापडलेला सर्वात जुना म्हणजे १३२ वर्षांपूर्वीचा ‘बाटलीबंद संदेश’ असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली (या आधीचा विक्रम १०८ वर्षांचा होता). हा ‘बाटलीबंद’ संदेश म्हणजे एकोणिसाव्या शतकात सुरु करण्यात आलेल्या एका वैज्ञानिक प्रयोगाचा भाग होता.
इल्मन यांना जानेवारी २०१८ मध्ये सापडलेली बाटली ‘पाउला’ या जर्मन जहाजावरुन १२ जानेवारी १८८६ रोजी कार्डीफ, वेल्स ते मकस्सार, इंडोनेशिया या मार्गावरील प्रवासादरम्यान हिंदी महासागरात फेकण्यात आली होती. जहाजावरील हवामानाच्या नोंदवहीत ही बाटली फेकण्यात आल्याची कॅप्टनने केलेली नोंद जर्मनीमधील अधिकाऱ्यांना सापडली. नोंदवहीतील हस्ताक्षर आणि बाटलीत सापडलेल्या कागदावरील हस्ताक्षरही जुळत असल्याचे जर्मनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हिंदी महासागरात जिथे ती बाटली फेकण्यात आली होती, तिथून ज्या ठिकाणी ती बाटली सापडली हे अंतर बाटलीने साधारण वर्षभरात कापले असावे असा अभ्यासकांचा अंदाज आहे. मात्र, ती बाटली वाळूत गाडली गेली आणि जानेवारी २०१८ मध्ये वेज बेटावर आलेल्या वादळादरम्यान तिच्यावरील वाळू वाहून जाऊन बाटली दृष्टीस पडली असावी.
जर्मन नेव्हल ऑब्झर्वेटरीच्या पुढाकाराने जगभरातील समुद्र प्रवाहांचा अभ्यास करण्यासाठी १८६० ते १९३० या सत्तर वर्षांच्या काळात अशा हजारो बंद बाटल्या त्यांच्या जहाजांच्या माध्यमातून जगभरातील समुद्र मार्गांवर फेकण्यात आल्या. बाटलीमध्ये बंद केलेल्या संदेशामध्ये बाटली समुद्रात फेकण्याची तारीख, ठिकाण याची नोंद होती. तसेच बाटली ज्याला सापडेल त्याने जवळच्या जर्मन दूतावासाशी संपर्क साधून ती बाटली कधी आणि कुठे सापडली याची माहिती देण्याची विनंती करण्यात आली होती. या दोन्ही नोंदींच्या साह्याने बाटलीचा आणि पर्यायाने समुद्राच्या प्रवाहांचा प्रवास कसा होतो हे शास्त्रज्ञांना समजू शकणार होते. या प्रयोगातील हजारो बाटल्यांपैकी आतापर्यंत ६६२ संदेश वेधशाळेला प्राप्त झाले असून, संदेश देणाऱ्या कोणीही बाटली मात्र परत केली नाही. वेधशाळेला २०१८ च्या आधी १९३४ मध्ये संदेश मिळाला होता.
समुद्राचे प्रवाह अभ्यासण्यासाठी आज पाण्यावर तरंगू शकणारी, समुद्रात काही मीटरपर्यंत खाली – वर येऊ शकणारी आणि सतत सॅटेलाईटच्या संपर्कात राहणारी अत्याधुनिक उपकरणे कार्यरत आहेत. मात्र, अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नसताना, बंद बाटलीच्या संदेशाच्या आधारेच शास्त्रज्ञांना जगभरातील समुद्र प्रवाहांच्या दिशा, वेग, हिमनगांचा प्रवास यांबाबतची कल्पना येऊ शकली होती.
बंद बाटलीतील संदेशाचा असाच वापर ब्रिटिश शास्त्रज्ञांनीही समुद्राचे प्रवाह आणि सागरी जीवांचा अभ्यास करण्यासाठी केल्याची नोंद आढळते. २०१५ मध्ये जर्मनीच्या आमरून बेटावर १०८ वर्षांपूर्वीचा बंद बाटलीतील संदेश एका महिलेला सापडला. त्या संदेशात दिलेल्या पत्त्यावर म्हणजेच मरीन बायोलॉजिकल असोसिएशनला (एमबीए) तिने संपर्क साधून बाटली सापडल्याचे ठिकाण आणि तारीख याची माहिती दिली. आणि त्याबदल्यात जाहीर करण्यात आलेले एक शिलिंगचे बक्षिसही घेतले. एमबीएच्या अंतर्गत जॉर्ज पार्कर बिडर या शास्त्रज्ञाने अशा बंद बाटलीतील संदेशाच्याद्वारे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपातील समुद्र प्रवाह आणि प्लाईस माशाचे स्थलांतर अचूक दाखवून दिले होते. बिडर याने १९०४ ते १९०६ या दोन वर्षांत १०२० बंद बाटल्या समुद्रात फेकल्या होत्या. त्यांपैकी ५५ टक्के बाटल्या त्याला लोकांनी पुन्हा आणून दिल्या. हल्ली माशांवर मायक्रो चिपचे टॅगिंग करून सॅटेलाईटद्वारे त्यांचे स्थलांतर अभ्यासले जाते.
हवामान आणि समुद्राचे चोवीस तास निरीक्षण करणाऱ्या अत्याधुनिक यंत्रणा आज उपलब्ध आहेत. मात्र, त्यांच्या अभ्यासाची नेमकी दिशा काय असावी हे गेल्या दोन शतकांत केलेल्या अशाच साध्या – सोप्या मात्र वेळखाऊ प्रयोगांतून शास्त्रज्ञांना समजू शकले.