– अरविंद परांजपे (संचालक, नेहरू तारांगण, मुंबई)
येत्या शनिवारी संध्याकाळी (१७ एप्रिल) आकाशप्रेमींना पश्चिम आकाशात चंद्र आणि मंगळाचे पिधान (Occultation) बघायला मिळेल. हे एकप्रकारचे ग्रहणच (Eclipse) असून, सूर्यग्रहण ज्याप्रकारे पृथ्वीच्या विशिष्ट प्रदेशांमध्येच दिसते, त्याच प्रमाणे चंद्र आणि मंगळाचे पिधान काही ठरविक देशांमध्येच दिसेल. चंद्राने एखाद्या ग्रहाला झाकणे (Disappearance) आणि काही वेळानंतर तो ग्रह चंद्रामागून बाहेर पडणे (Reappearance) अशा दोन अवस्था पिधानामध्ये पाहता येतात. महाराष्ट्रासह भारताच्या पश्चिम भागातून पाहताना शनिवारी मंगळ चंद्रामागून बाहेर येत असल्याची (Reappearance) स्थिती व्यवस्थित पाहता येईल.
शनिवारी संध्याकाळी साधारण साडेपाचला चंद्र मंगळाला पूर्व बाजूने (अंधाऱ्या बाजूने) झाकेल. त्यानंतर साधारण दीड तासाने चंद्र पुढे सरकल्यामुळे मंगळ चंद्राच्या पश्चिम बाजूने (प्रकाशित बाजूने) बाहेर आल्याचे दिसून येईल. ही घटना दुर्मिळ नसली तरी, एका विशिष्ट प्रदेशात मंगळाचे पिधान सातत्याने दिसत नाही. या आधी १० मे २००८ ला भारतातून चंद्र आणि मंगळाचे पिधान दिसले होते.
महाराष्ट्रातून पाहताना चंद्राने मंगळाला झाकण्याची घटना (Disappearance) सूर्यास्ताआधी होणार आहे. त्यामुळे पिधानाचा पूर्वार्ध साध्या डोळ्यांनी दिसण्याची शक्यता नाही. त्यासाठी किमान लहान दुर्बिणीची गरज भासेल. मात्र, पिधानाचा उत्तरार्ध सूर्यास्तानंतर होणार असल्यामुळे चंद्राच्या प्रकाशित भागामागून बाहेर आलेला मंगळ साध्या डोळ्यांनाही दिसू शकेल. त्यानंतर पुढील सुमारे चार तास चंद्र- मंगळाची जोडी पश्चिमेच्या आकाशात पाहता येईल.
शनिवारी चंद्र आणि सूर्य यांचे आकाशातील एकमेकांपासूनचे अंतर साधारण ६० अंश असेल. आपल्याकडे बायनॉक्युलर्स किंवा टेलिस्कोप असल्यास संध्याकाळी पाच ते सव्वा पाचच्या दरम्यान आकाशात चंद्रकोर शोधण्याचा प्रयत्न करावा. चंद्र सापडल्यावर चंद्र कोरीच्या अंधाऱ्या भागाजवळ मंगळही दिसतो का ते पाहावे. आकाश किती निरभ्र आहे, त्यावर दिवसाच्या प्रकाशातही आपल्याला मंगळ स्पष्टपणे दिसतो का ते अवलंबून आहे. चंद्र- मंगळाची जोडी शोधताना कोणत्याही स्थितीत आपण सूर्याकडे पाहणार नाही याची काळजी घ्यावी.
पुण्यातून पाहताना शनिवारी संध्याकाळी ०५:३५:०८ ला चंद्राच्या अंधाऱ्या बाजूने मंगळाला झाकण्याची घटना सुरू होईल. मंगळ पूर्णपणे चंद्रामागे जाण्यासाठी साधारण नऊ सेकंदांचा कालावधी लागेल. त्यानंतर संध्याकाळी ०७:२२:२१ ला मंगळ चंद्राच्या प्रकाशित भागाच्या बाजूने बाहेर पडण्याची अवस्था पाहता येईल.
शहर | पिधान सुरुवात | पिधान शेवट |
पुणे | ०५:३५:०८ | ०७:२२:२१ |
मुंबई | ०५:३१:५२ | ०७:१९:४५ |
नागपूर | ०५:५३:५२ | ०७:२८:०४ |
नाशिक | ०५:३५:४३ | ०७:२०:३० |
औरंगाबाद | ०५:४०:४६ | ०७:२३:४१ |
अहमदनगर | ०५:३८:२३ | ०७:२३:३२ |
कोल्हापूर | ०५:३६:०६ | ०७:२४:२८ |
रत्नागिरी | ०५:३२:५१ | ०७:२२:११ |
(मराठी शब्दांकन: मयुरेश प्रभुणे)
——