संशोधन, ७ डिसेंबर २०२३
वर्षातील भरवशाचा मानला जाणारा मिथुन राशीतील ‘जेमिनीड’ उल्कावर्षाव बुधवारी (१३ डिसेंबर) रात्रभर दिसणार आहे. या वर्षी चंद्रप्रकाशाचा अडथळा नसल्यामुळे आकाशप्रेमींना जेमिनीडच्या अनेक तेजस्वी उल्का पाहता येतील, असे खगोल अभ्यासकांचे म्हणणे आहे.
‘३२०० फेथन’ या लघुग्रहाच्या असंख्य लहान तुकड्यांनी भरलेल्या कक्षेतून पृथ्वीचा प्रवास होताना ४ ते २० डिसेंबर या कालावधीत मिथुन राशीतील जेमिनीड उल्कावर्षाव दिसतो. धूमकेतूच्या कणांमुळे दिसणाऱ्या उल्कांपेक्षा जेमिनीडच्या उल्का काहीशा संथ आणि तेजस्वी असतात. १३ डिसेंबरच्या रात्री जेमिनीडच्या उल्कांचे प्रमाण ताशी १२० ते १६० उल्कांपर्यंत पोचत असल्याचे गेल्या काही वर्षांत नोंदले गेले आहे.
यंदा १२ डिसेंबरला अमावस्या असल्याने १३ डिसेंबरच्या रात्री अंधाऱ्या आकाशात जेमिनीडच्या उल्का दिसण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. शहरापासून दूर, प्रदूषण नसलेल्या ठिकाणाहून पाहिल्यास रात्रभरात किमान शंभर उल्का दिसू शकतात, असा खगोल अभ्यासकांचा अंदाज आहे. उल्कावर्षाव पाहण्यासाठी कोणत्याही उपकरणाची आवश्यकता नसून, साध्या डोळ्यांनी ही खगोलीय घटना पाहता येते.
उल्कादर्शन कार्यक्रम
जेमिनीड उल्कावर्षावाचे औचित्य साधून ‘संशोधन’ आणि ‘खगोल विश्व’तर्फे १३ डिसेंबरच्या रात्री शहरातील प्रकाश प्रदूषणापासून दूर अंधाऱ्या ठिकाणी उल्कादर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जेमिनीड उल्का दर्शनासोबतच टेलिस्कोपमधून शनी, गुरू, शुक्र, नेब्युला, क्लस्टर, गॅलेक्झी पाहण्याची संधी यावेळी आकाशप्रेमींना मिळणार आहे. कार्यक्रमाच्या नावनोंदणीसाठी ९७३००३५०१० या क्रमांकावर संपर्क साधावा.